छत्रपती संभाजीनगर : न्यायालयात पत्नीची प्रत्यक्ष दहोपस्थिती (हेबियस कॉर्पस) करण्यासाठी केलेल्या अर्जावरील कार्यवाहीतून एका पतीला त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्यांना आईचे छत्र लाभले. कुटुंबात निर्माण झालेला बेबनाव न्यायालयातच चर्चेअंती मिटला असून, विखुरलेले एक कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा सुखद अनुभव न्यायालयात उपस्थितांना सोमवारी आला.

आपल्या बेपत्ता पत्नीचा शोध घेण्यासंदर्भात एका पतीने ‘मिसिंग’ अंतर्गत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु संबंधित पोलीस ठाण्याकडून कार्यवाही न झाल्यामुळे ‘हेबियस कॉर्पस’ अंतर्गत पतीने रिट याचिका न्यायालयात दाखल केली.

या अनुषंगाने पोलिसांनी तक्रारदार पतीच्या बेपत्ता पत्नीचा शोध घेऊन तिला उच्च न्यायालयात हजर केले. या वेळी पती-पत्नीमध्ये असलेला बेबनाव स्पष्ट झाला. न्यायालयाने कक्षात उभयतांशी वाद सोडवण्याविषयी चर्चा केली. उभयतांची वाद मिटावा, इच्छा अशी होती. त्यांच्याकडून अनुकूलता मिळाल्याने वादावर चर्चेअंती तोडगा काढण्यात आला. यामुळे पती, पत्नी एकत्र आले आणि मुलांपासून दुरावलेल्या लहान मुलांना त्यांच्या आईचे छत्र मिळाले.

या प्रकरणी तक्रारदाराने आपल्या बेपत्ता पत्नीचा शोध घेण्यासाठी १५ मे रोजी सोनपेठ (जि. परभणी) पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रार करुन तीन महिने उलटूनही पोलिसांनी कार्यवाही केली नसल्यामुळे पतीने खंडपीठात याचिका सादर केली होती. गृह विभागाच्या प्रधान सचिवांसह परभणीच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावल्यानंतर ‘मिसिंग’ तक्रारमधील हरवलेली महिला स्वत: दुसऱ्या पुरुषासोबत राहत असल्याचे निवेदन पोलिसांनी खंडपीठात सादर केले होते.

मात्र, या महिलेस न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित महिलेस व तिच्या पतीस त्यांच्या वकीलांसह चर्चेकरीता कक्षात बोलावले. या चर्चेत संबंधित महिलेला तिची चूक लक्षात आली व दोन मुले व पतीसोबत राहण्याची इच्छा तिने व्यक्त केली. याबाबत लेखी हमीपत्र खंडपीठात अॅड. डी. बी. पवार पाथरेकर यांच्यामार्फत सादर केले. या समन्वयामुळे ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.