छत्रपती संभाजीनगर : मुखेड तालुक्यातील गोणेगावात आता शेतीत मातीच राहिली नाही. ती सारी खरवडून गेली. मुखेड तालुक्यात १ हजार ५३७ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेती तर आहे, पण त्यात मातीच नाही. २ हजार २५८ हेक्टर जमिनीचा अक्षरश: नाला झाला आहे.
बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. जमीन खरवडून गेल्यानंतर शेतीची नुकसानभरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम आहे हेक्टरी फक्त ४७ हजार रुपये. मराठवाड्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १९ लाख ७० हजार ४२२ एवढी आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पुढे कोणी तरी रेटतो आणि माध्यमांमध्ये आरक्षणाचीच चर्चा अधिक होते, अशी तक्रार आता केली जात आहे.
मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव म्हणाले, ‘सहा दिवस २२ गावे पाण्याखाली होती. अनेक शेतांत पाणी शिरले होते. तिरू नदीचे पाणी सोडले गेले. त्याच वेळी लेंडी प्रकल्पाचे पाणी आले. गावेच्या गावे पाण्याखाली होती. त्यामुळे जमीन खरवडून जाण्याचे प्रमाण अधिक अधिक आहे. नांदेड जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
गोणगावचे पांडुरंग राजुरे म्हणाले, ‘‘एक हेक्टर शेती होती. लेंढी प्रकल्पाच्या वर एक तळ झालं. ते जमिनीला समांतर होतं. त्या तळ्यातील पाणी वाढलं आणि सगळी शेतीच खरवडून गेली. बागायत जमीन होती. मोटार, पाइपलाइन होती. काही शिल्लक राहिले नाही. सगळी माती वाहून गेली. आता शेतात वाळू आहे. नाला झाला आहे. पुढं कसं जगायचं असा प्रश्न आहे.’ राजुरे यांना दोन मुले आहेत. एक मुलगा विज्ञान शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतो आहे. मुलगी बी. फार्मसी करते आहे. या मुलांना कसे शिकवायचे आणि कसे राहायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असे अनेक शेतकरी सध्या मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. १३३२ जनावरे दगावली आहेत. सुमारे ४१३३ घरांची पडझड झाली आहे. पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. नव्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. राेज बाधितांचे आकडे वाढत आहेत. अनेक भागांत अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. जगण्याचा मोठा प्रश्न आणि तुटपुंजी मदत अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत करू, असे आश्वासन मंत्री देत असले, तरी नुसताच सातबारा आणि खरवडून गेलेली जमीन असे चित्र नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यांत दिसून येत आहे.