छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला मागास प्रवर्गातून आरक्षण मिळणार की नाही, याविषयीच्या शंका आणि संभ्रम असताना आंदोलक मनोज जरांगे यांनी मात्र मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला ते लागू होईलच असा दावा केला. शासन निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तसा बदल करून घेऊ, तसा शब्द मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, आंदोलनानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगे यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी रांगच लावली. खासदार संदीपान भुमरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

आंतरवली सराटीसह मुंबईत आंदोलन करून जेव्हा येता तेव्हा अभ्यासक हाती काही लागलेच नाही, असे सांगतात. असे का होते, यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, मी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. काही कार्यकर्ते यांचा अभ्यास चांगला आहे, असे सांगतात. त्यांना विचारात घेतो. पण नंतर ते टांग देतात. पण मी ज्यात लक्ष घालतो ते काम सरकारकडून पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वांना ओबीसीतून आरक्षण लागू होईलच, असे जरांगे म्हणाले.

मुंबईतील आंदोलन आम्ही शांततेत केले. जे अभ्यासक संभ्रम निर्माण करत आहेत ते आंदोलनादरम्यान कोठे होते, असा प्रश्नही त्यांनी केला. दरम्यान, मराठा आंदोलनातील कार्यकर्ते शिवानंद भानुसे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा मराठा समाजास काही एक लाभ होणार नाही, असे ते म्हणाले.