औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या जेवणावळीत वाढप्या म्हणून भूमिका बजावली. ते परळी येथील प्रभागनिहाय भेटीगाठीही घेत आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडेही यांनीही संपर्क वाढविला असून गोपीनाथ गडावरील कार्यक्रमासाठी त्यांनी आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनाही आमंत्रण दिले आहे.

परळी नगरपालिकेवर मागील दहा वर्षांपासून धनंजय मुंडे यांची एक हाती सत्ता आहे. सलग तिसऱ्यांदा पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा त्यांचा प्रयत्न असून सध्या त्यांनी कार्यकर्ते, निराधार व सर्वसामान्य नागरिकांची थेट भेट घेऊन अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी जोरदारपणे संपर्क अभियान राबवले आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी, वॉर्डमध्ये जेवणही घेण्यावर भर आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरीच जेवण घेण्यासारखी नीती अवलंबली आहे. जुन्या, ज्येष्ठ मंडळींच्या भेटी-गाठी घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही संपर्क अभियानातून केली जात आहे.

अलीकडेच वैद्यनाथ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख प्रा. काळे यांची भेट घेतली. प्रा. काळे यांचे घरी जाऊन दर्शन घेण्यासह त्यांच्यासमोर खाली बसलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांची समाजमाध्यमावरील छायाचित्रे चर्चेचा विषय ठरला होता. निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खास जेवणावळीचा कार्यक्रम आखून त्यात चक्क वाढप्याची भूमिकाही मंत्री मुंडे यांनी निभावली. त्याचीही चर्चा झालेली असून विरोधकांच्याही भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यावर मंत्री मुंडे यांनी भर दिल्याचे सक्रिय कार्यकर्ते सांगत आहेत.

माजी पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनीही परळीशी पुन्हा संपर्क वाढवला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य विसरून जनसंपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. येत्या ३ जून रोजी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त परळीजवळील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचीही आखणी सुरू आहे. पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांना दिवंगत मुंडेंच्या स्मृतिनिमित्त परळीत आणण्याचे नियोजन पंकजा मुंडे यांनी केल्याची माहिती आहे. या निमित्तानेही त्यांनी परळीत संपर्क वाढवला आहे. अलीकडेच पार पडलेल्या ईद सणानिमित्त मुस्लीम मतदार बांधवांच्या घरी जाऊन पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. ईद का चाँद निकलासारख्या ओळी लिहून छायाचित्रे काढण्यात आली. त्याचीही समाजमाध्यमावर चर्चा झाली. परंतु गोपीनाथ मुंडे हयात असतानाचा भाजपचा परळीतील जनाधार आता ओसरलेला असून दुरावलेल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांच्या फळीची बांधणी करण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे. सध्या त्यांच्याकडील कार्यकर्त्यांची एक फळी ढासळलेली आहे. त्यात पक्षाचे राष्ट्रीय सचिव, मध्य प्रदेशचे सहप्रभारीपदाशिवाय स्थानिक कार्यकर्त्यांना लाभ मिळवून देता येईल असे अन्य कुठलेही पद नसल्याने एखादी फळी जोडून प्रचारात त्यांना उतरवण्यासाठी कसरत त्यांना करावी लागणार आहे.