मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवडय़ात होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे लातूर जिल्हय़ातील भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व सुधाकर भालेराव या दोघांपकी नेमकी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही आमदार निवडून द्या, मंत्रिपद देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर उमेदवार निवडून येण्यासाठी अशी आश्वासने द्यावीच लागतात, असे सराईत राजकारण्यांचे उत्तर त्यांनी देऊन टाकले. मंत्रिपदाची संख्या मर्यादित असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना चांगलीच कसरत करावी लागते आहे. १९९५ च्या वेळी राज्यात भाजप-सेनेचे सरकार होते तेव्हाही लातूर जिल्हय़ाला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. तेव्हा बीडचे जयसिंगराव गायकवाड हे लातूरचे पालकमंत्री होते. २०१४ मध्ये राज्यात नव्याने सत्तांतर झाले तेव्हा तरी लातूरला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. लातूरला ठेंगा दाखवत बीडच्या पंकजा मुंडे यांच्याकडे लातूरच्या पालकमंत्रिपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे घाटत असताना लातूर जिल्हय़ातील निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्यापकी एकाला मंत्रिपद मिळावे अशी लातूरकरांची अपेक्षा आहे. दोघांचीही आमदारकीची दुसरी टर्म आहे. जिल्हय़ात भाजपची शक्ती वाढवायची असेल तर जिल्हय़ातील मंडळींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे अन्यथा बाहेरच्या टेकूवरच लातूरचा डोलारा सांभाळावा लागणार आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.