छत्रपती संभाजीनगर : येत्या वर्षभरात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करावयाचे असून कोकणातून समुद्राकडे वाहून जाणारे व गुजरातकडेही वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाडय़ासह अवर्षणग्रस्त भागाकडे वळवण्याचा विचार सुरू आहे. नदीजोड प्रकल्पही वेगाने राबवायचा असून नव्या ३५ सिंचन प्रकल्पाला मान्यता देऊन देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असताना २० हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. 

महापालिकेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संदिपान भुमरे, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, सतीश चव्हाण, विक्रम काळे, मुकुंद भोगले आदींची उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, मराठवाडय़ासह चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासकामे करावयाची आहेत. विकासाच्या अजेंडय़ावर सरकार काम करते आहे. राज्यासह मराठवाडय़ात रेल्वेचे जाळे विस्तारले जावे, प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असायला हवे, शेतीला पाणी मिळायला हवे. उद्योग आले पाहिजे, यासाठी सरकार काम करते आहे. अमृत महोत्सवी वर्षांनंतर शतक महोत्सवाकडे वाटचाल करण्याची नवी सुरुवात होत आहे. खरिपाचे पीक हातचे गेले आहे. सिंचन क्षेत्र वाढले तरच विकास शक्य असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले, गोदावरीवर नाथसागरापासून ते बाभळीपर्यंत बॅरेज टाकण्याचा निर्णय विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांजरावर बॅरेजेस टाकले आहेत. आता सिंदफणावर बॅरेज करायचे आहेत. शेवटी पाणी मिळाले तर त्या भागाचा कायापालट होतो. त्यासाठी सरकार म्हणून काही निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.  कोकणातून पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळण्याचा विचार सुरू आहे. एकंदरीत गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी तुमच्या-माझ्या महाराष्ट्रातील मराठवाडय़ाच्या गोदावरीकडे वळवण्यावर लक्ष आहे. राज्यात अनेक लहान-मोठी धरणे येथे उभी राहिली आहेत. जलसंधारणाचेही अनेक प्रकल्प राबवलेले आहेत. येत्या वर्षभरात १०४ प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत, असेही पवार म्हणाले.