उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्हय़ावर अजूनही टंचाईचे सावट

मराठवाडय़ातील जायकवाडी व विष्णुपुरी ही दोन मोठी धरणे वगळता अन्य धरणांमध्ये अजूनही पुरेसा साठा झालेला नाही. जायकवाडी जलाशय आता ४३.७७ टक्क्यांवर गेले असल्याने माजलगाव धरणात पाणी सोडून परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच, औरंगाबाद शहरातील उद्योगाची पाणी कपातही रद्द होऊ शकते, असे सांगितले जात आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्हय़ातील अनेक धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा झालेला नाही. परिणामी बीड जिल्हय़ातील आष्टी व पाटोदा तालुक्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. चार हजारांहून टँकरची संख्या आता २१ वर आली आहे.

मराठवाडय़ात सर्वत्र पिकांची स्थिती चांगली असली तरी पुरेसा पाणीसाठा नाही. नाशिक जिल्हय़ातील अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरण ४० टक्क्यांहून अधिक भरले असल्याने औरंगाबाद, जालना या जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी उस्मानाबाद जिल्हय़ावरील टंचाईचे संकट पूर्णत: दूर झालेले नाही. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पात अजूनही पाणीसाठा नाही. माजलगाव धरणातही पाणीसाठा नाही. दरम्यान दुष्काळात केलेल्या खर्चाची बरीच रक्कम सरकारकडून मिळणे बाकी असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या खरिपात झालेल्या नुकसानीपोटी द्यावयाच्या अनुदानातील १२३ कोटी १९ लाख रुपये अजून मिळालेले नाहीत. तसेच पाणीपुरवठय़ाच्या विविध योजना व टँकरने पाणीपुरवठय़ाचे १९३ रुपये मिळणे बाकी आहे. थेट मदतीतून वगळण्यात आलेल्या कापसाची रक्कमही शासनाने दिलेली नाही. बागायती पिके, फळपीक आणि कापसाच्या अनुदानाची एक हजार ७१ कोटी रुपये मिळालेले नाहीत.

ही रक्कम मिळावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत म्हणून ही रक्कम दिली जाणार होती. पिकांचे पंचनामे व इतर माहिती उपलब्ध करुन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, ही रक्कमही मिळाली नाही.

जलयुक्त शिवार योजनेत स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असले तरी धरणांच्या साठय़ात वाढ झाली नसल्याने मराठवाडय़ातून पिण्याच्या पाण्याचे संकट पूर्णत: दूर झाले नाही, असेच चित्र आहे.

मराठवाडय़ातील प्रमुख धरणातील पाणीसाठा

  • जायकवाडी- ४३.७७
  • निम्मदुधना- ५३.८२
  • येलदरी- ८.३७
  • सिद्धेश्वर- १८.६९
  • माजलगाव- शून्य
  • मांजरा- शून्य
  • पैनगंगा- ३२.४७
  • मानार- १०.६७
  • निम्नतेरणा- शून्य
  • विष्णुपुरी- ८६.५३
  • सीनाकोळेगाव- शून्य
  • शहागड बंधारा- ९.७५
  • खडका बंधारा- १७.२८ (खडका बंधाऱ्यातून औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा होतो.)