‘सॅमसंग’ ही एक टेक कंपनी; तर ‘ह्युंदाई मोटर्स’ ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. एक कंपनी अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स; तर दुसरी कंपनी ग्राहकांसाठी वाहनांची नवनवीन मॉडेल्स बाजारात लॉंच करीत असते. तर, आता या दोन्ही कंपन्या मिळून ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहेत. सॅमसंग कंपनीने जाहीर केले आहे की, ते इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) समर्थन देण्यासाठी ह्युंदाई मोटर्स ग्रुपबरोबर भागीदारी करणार आहेत.
दोन्ही कंपन्या एकत्र येऊन ‘होम-टू-कार’ आणि ‘कार-टू-होम’ अशी सेवा प्रदान करणार आहेत. या सेवा विकसित करण्यासाठी दोन्ही कंपन्या म्हणजेच ह्युंदाई आणि तिचा कोरियन भागीदार किआच्या (Kia’s) सॅमसंगच्या स्मार्ट थिंग्ससह (Smart Thing) कनेक्टेड कार तंत्रज्ञानासाठी एकत्र काम करणार आहेत. होम-टू-कार आणि कार-टू-होम या सेवा भविष्यात लोकांची घरे आणि वाहने यांना एका सिस्टीमसह जोडणार आहेत; ज्यामुळे दोन्ही ठिकाणी असताना तुम्ही रिमोट कंट्रोलद्वारे अनेक गोष्टी करू शकणार आहात.
Smart Things प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक घरी असताना स्वत:ची कार सुरू करून पाहणे, स्मार्ट एअर कंडिशनिंग नियंत्रित करणे, कारच्या खिडक्या उघडणे व बंद करणे, त्यांची चार्जिंग स्थिती तपासणे आदी गोष्टी करू शकणार आहेत. तसेच ग्राहक कारमध्ये बसून घरातील टीव्ही, एअर कंडिशनर व ईव्ही चार्जर आदी घरगुती उपकरणांवरदेखील नियंत्रण ठेवू शकणार आहेत.
हेही वाचा…२०२४ मध्ये भारतात होणार ‘या’ आठ सुपरबाईक्सची एंट्री! प्री-बुकिंगसुद्धा सुरू…
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष चॅनवू पार्क म्हणाले, “हे कम्युनिकेशन होम-घर-टू-कार आणि कार-टू-होम या सेवा प्रदान करील; ज्या भविष्यासाठी उपयोगी ठरतील. स्मार्ट थिंग्ज प्लॅटफॉर्म घर आणि कार दोन्हीमध्ये ग्राहकांचा अनुभव लक्षणीयरीत्या वाढवणार आहे. म्हणजेच वापरकर्ते एकाच वेळी अधिक डिव्हाइस सॅमसंग SmartThings सह ऑपरेट करू शकणार आहेत. उदाहरणार्थ- जेव्हा सॅमसंग गॅलॅक्सी स्मार्टफोनमधील सकाळचा अलार्म बंद होतो, तेव्हा पडदे, दिवे, दूरदर्शन आपोआप चालू होतील. जेव्हा वापरकर्ते कामासाठी बाहेर जाण्यासाठी तयार होतात, तेव्हा वापरकर्त्याची कार तापमान सेट करते. तसेच स्मार्टफोन आणि टीव्ही स्क्रीन ईव्हीची उर्वरित बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज यांसारखी माहिती प्रदर्शित करील. कनेक्टेड कारच्या कार-टू-होम आणि होम-टू-कार सेवा विविध क्षेत्रांमध्ये सोईस्कर बनविण्याची ही एक संधी आहे,” असे ह्युंदाई आणि कियाच्या इन्फोटेन्मेंट डेव्हलपमेंट सेंटरचे उपाध्यक्ष हाययुंग क्वॉन म्हणाले. येत्या काळात या दोन कंपन्यांमुळे आपल्याला स्मार्ट कारचा अनुभव घेता येणार एवढे नक्कीच खरे!