News Flash

स्विंगच्या बादशाहाकडून नेमकी चूक कुठे झाली?

स्विंगचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणकडून नेमकी चूक कुठे झाली?

– नामदेव कुंभार

दोन दिवसांपूर्वी इरफान पठाणने सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बातमी ऐकून फारसं आश्चर्य वाटलं नाही. कारण, गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघात नव्हता शिवाय आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा कमी झाला होता. पण इरफानच्या निवृत्तीची बातमी ऐकल्यानंतर त्याची एक ट्विटरची पोस्ट डोळ्यासमोर आली आणि मन पुन्हा एकदा सुन्न झालं. देशासाठी क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द त्या पोस्टमधून दिसतेय.

इरफान पठाणचं भावनिक ट्विट
२०१० ची गोष्ट आहे. माझ्या कंबरेला पाच फ्रॅक्चर झाले होते. माझ्या फिजिओनं म्हटले होते की, ‘कदाचित यापुढे तू क्रिकेट खेळू शकणार नाही. स्वप्नं पाहणं बंद करायला हवं.’ त्यादिवशी मी फिजिओला म्हटले होते, ‘मी कोणतेही दुख: सहन करू शकतो. पण देशासाठी क्रिकेट न खेळण्याचं दुख: सहन करू शकत नाही.’ मी खूप कष्ट घेतले. मी पुन्हा मैदानावर क्रिकेट तर खेळायला लागलोच. शिवाय भारतीय संघात पुनरागमनही केलं. क्रिकेट करियर आणि जीवनात मी अनेक समस्या आल्या, पण मी कधीही हार मानली नाही. यापुढेही माझा हाच विचार आहे. जीवनात पुन्हा एकदा माझ्यासमोर अशीच समस्या उभी राहिली तर त्यातूनही मी बाहेर निघेन. मला अजूनही पाठिंबा दर्शवणाऱ्या चाहत्यांसाठी मी माझं मन मोकळं केलं आहे.

 

ही भावनिक आणि प्रेरणादायी पोस्ट वाचून इरफान पठाणचं दहा-बारा वर्षाचं करियर डोळ्यासमोर येतं. देशासाठी २९ कसोटी, १२० एकदिवसीय, २४ टी-२० सामने खेळणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूला वांरवार डावललं गेलं. स्विंगचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणकडून नेमकी चूक कुठे झाली? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. भारतीय संघात आता आपण पुनरागमन करू शकत नाही असे वाटल्यानंतर वयाच्या ३५ व्या वर्षी इरफान पठाणने क्रिकेटला रामराम ठोकला. निवृत्ती घेताना इरफानने आपल्या मनातील नाराजी बोलून दाखवली. “श्रीलंकेविरुद्ध २००८मध्ये जिंकल्यानंतरही आपल्याला का वगळले हे मला कळले नाही. देशासाठी सामना जिंकल्यानंतर कुणाला वगळले जाते? तेही कोणतेही कारण न देता?” अशी खंत त्यानं बोलून दाखवली.

एकमात्र खरं आहे इरफान एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता होता राहिला. त्याला अनेक कारणे असतील. पण आजही भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कोण? असं कोणी विचारल्यानंतर डोळ्यांसमोर सर्वात आधी कपील देवचं येतो. त्यानंतर इरफान दिसतो. मशीदीत झाडू मारता मारता पाहिलेलं इरफानचं स्वप्न पूर्ण झालं. खूप कमी जण असतात, ज्यांची स्वप्न सत्यात उतरतात. त्यापैकीच एक इरफान पठाण आहे.

इरफानचा संघर्ष –
बडोद्यामध्ये राहणाऱ्या इरफान पठाणची १९ व्या वर्षी भारतीय संघात एण्ट्री झाली. मशीदीमध्ये झाडू माराताना पाहिलेलं त्या लहानग्याचं स्वप्न सत्यात उतरले होते. सचिन, सेहवाग, गांगुली, कुंबळे, द्रविडसारख्या दिगज्जांबरोबर तो खेळणार होता. पण त्यामागील संघर्ष भलामोठा होता. इरफानचं घर इतकं छोटं होतं की घरात बाथरूमही नव्हते. घरामध्ये इरफान आणि युसूफ असं दोघे जण होते आणि सायकल एक. त्याच सायकलने घरातून शाळा, शाळेतून मैदान, मैदानातून कोचच्या घरी. आणि तेथून घरी. असा प्रवास दोघा भावांडांना करावा लागत होता. युसूफ वयाने मोठा असल्यामुळे इरफानवर दादागिरी करायचा. त्यामुळे दररोज सायकल इरफानला चालवायला लागायची. दररोज सायकल चालवल्यामुळे इरफानचे पाय मजबूत झाले. मेहनतीमुळे इरफानने युसूफच्या आधी भारतीय संघात प्रवेश मिळवला होता.

एखादा सुपरस्टार चित्रपटाच्या पहिल्या दिवशी तिकिटबारीवर बक्कळ कमाई करतो तसेच काहीसं इरफान बाबत झालेलं. इरफानने आपल्या डेब्यूच्या सामन्यात सर्वांना आश्चर्यचकित केलं होते. पहिल्याच सामन्यात इरफानने गिलखिस्टसारख्या दिग्गज फलंदाजाला बाद केलं होते. ज्या दिवशी इरफानने निवृत्ती घेतली त्याच दिवशी म्हणजे चार जानेवारी २००४ रोजी सिडनीच्या मैदानावर एक स्टार खेळाडू भारताला मिळाला होता. पाकिस्तानविरोधातील पहिल्या तीन चेंडूवर घेतलेली हॅट्ट्रीक असो किंवा भारताला पहिला टी-२० विश्वचषक मिळण्यात असलेला सिंहाचा वाटा असो. थोड्या कालावधीत इरफानने सर्वच भारतीयांच्या आणि क्रीडा जगतावर आपला ठसा उमटवला होता. पण नियतीने दुसरंचं काही लिहलं होते. काही काळासाठी इरफानचा फॉर्म गेला. (प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा काळ एकदा तरी येतोच) पाठदुखीमुळे गोलंदाजीचा वेग कमी झाला. त्यामुळे त्याला संघाबाहेर फेकण्यात आलं.

इरफानचं नेमकं चुकलं कुठं?

असेही म्हटले जातेय की, इरफानने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे गोलंदाजीची धार गेली होती. काही क्रीडा विश्लेक्षकाच्या मते तर, इरफान सुरूवातीला आपल्या मनाने गोलंदाजी करत होता. पण नंतर त्यानं वसीम आक्रमसाख्या दुसऱ्या गोलंदाजाकडून टीप्स घेतल्यामुळे गोलंदाजी रॉ झाली. त्यामुळे त्याला संघाबाहेर बसावं लागले. काहींच्या मते तर जिममध्ये तयार झालेले मसल्स इरफानच्या गोलंदाजीच्या मध्ये आले. मसस्लमुळे इरफानच्या गोलंदाजीच्या एक्शनमध्ये बदल झाला. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार बिघडली. यामधील काही गोष्टी सत्य असतील किंवा खोट्या असतील.

इरफानचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

२००६ पर्यंत इरफान पठाण भारतीय संघाचा नियमत सदस्य होता. २००६ मध्ये इरफान भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तयावेळी इरफानची खूप चर्चा होती. इरफानसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीमध्ये ढिगानं असल्याचे पाकिस्तानमधील काहींनी म्हटले होते. इरफानने कराची कसोटीमध्ये हॅट्ट्रिक करून त्यांची तोडं बंद केली होती. कसोटीच्या पहिल्याच षटकात घेतली गेलेली एकमेव हॅट्ट्रीक आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, इरफान पठाण भारतीय संघासाठी फार काळ खेळू शकला नाही.

२००३ मध्ये १९ व्या वर्षी कसोटीमध्ये करियर सुरू करणाऱ्या इरफानने भारतासाठी २००८ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी तो २४ वर्षाचा होता. ज्या वयात काही खेळाडू क्रिकेट खेळायला सुरू करताता त्या वयात इरफानने शेवटचा सामना खेळला होता.२०१२ मध्ये इरफान पठाणने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तोही टी-२०. इथंचं इरफानचा क्रिकेटमधील प्रवास संपला. २०१२ नंतर इरफानने अनेकदा भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली नाही. एक मात्र खरं, इरफान पठाण एक चांगला आणि सर्वौत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता हाता राहिला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:18 pm

Web Title: irfan pathan story heart touching nck 90
Next Stories
1 रॉस टेलरचा धमाकेदार विक्रम; फ्लेमिंगला टाकलं मागे
2 गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर
3 IND vs SL : जेव्हा अख्खं स्टेडियम एकत्र ‘वंदे मातरम’चा जयघोष करतं…
Just Now!
X