News Flash

Statue of Unity: खरंच स्मारकं हवीत का?

बऱ्याच जणांनी गळे काढायला सुरुवात केलीये, कि हा पैशाचा अपव्यय आहे, पैशाची नासधूस आहे, परंतु...

– चेतन दीक्षित

आज नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांच्या भव्यदिव्य स्मारकाचे लोकार्पण केले, जे जगातले सर्वात उंच स्मारक म्हणून नोंदवले गेले. बऱ्याच जणांनी गळे काढायला सुरुवात केलीये, कि हा पैशाचा अपव्यय आहे, पैशाची नासधूस आहे. खरंतर आज नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात या स्मारकांमुळे हजारो जणांना किती आणि कसा रोजगार मिळेल हे अगदी व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलेले आहेच. त्यामुळे ते पुन्हा परत मी इथे लिहीत नाही…

इतिहासलेखन हे कदाचित वैचारिक कल डोक्यात ठेऊनच होत असेल किंबहुना ते तसेच होतेच. त्यामध्ये वाद घालण्याचे काहीच प्रयोजन नाही. पण ह्यामुळे इतिहासाचे प्रकरण हे कदाचित ‘वैचारिक पातळीवर विचार करून सोडून द्यायचा विचार’ म्हणून प्रस्थापित होऊ शकतं. जे होणं धोक्याचं आहे. “जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका” ही मानसिकता अनिष्ट रितीचालींच्याच बाबतीत लागू व्हावी. समस्त इतिहासाच्या बाबतीत नव्हे. समस्त इतिहास हा कधीच स्मृतिपटलाआड जाता कामा नये.

बाबासाहेब पुरंदरेंची एक मुलाखत राज ठाकरेंनी घेतली होती, राजगडावर. तेंव्हा पुरंदरेंनी फार सुंदर विचार व्यक्त केला होता.. ते म्हणाले होते, “इतिहासात कोळसेही आहेत आणि हिरेही आहेत. तर मग कोळसे उगाळायचे कि हिऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायची?”. फार महत्वाची गोष्ट आहे ही. कोळसे कोणते आणि हिरे कोणते? म्हटले तर हे ओळखणे खूप सोपे आणि म्हटले तर खूप अवघड.. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचा तौलनिक अभ्यास तेंव्हाच होऊ शकतो जेंव्हा आपली ओळख सर्वांशी होईल.. एकाच बाजूची नव्हे.. म्हणून ही अशी स्मारके गरजेची..

हे असे इतिहासातले हिरे, पुढच्या पिढीला कळणार कसे? इतिहास घडत असताना पायात पायात गेलेले अथवा घातले गेलेले चिरे दुर्लक्षित करणे आणि सर्वांचे लक्ष केवळ आणि केवळ ‘त्या” कळसाकडे लागून राहणे, ही त्या चिऱ्यांच्या, त्या हिऱ्यांच्या, योगदानाशी प्रतारणा होणार नाही का? हा इतिहासाला योग्य न्याय देणे म्हणता येईल का? निश्चितच कोणताही सद्सद्विवेकी माणूस ह्याचे उत्तर ‘नाही’ असेच देईल.

दिवसेंदिवस सध्याची पिढी इतिहासाबद्दल बऱ्यापैकी उदासीन होतीये. जो इतिहास त्यांना शिकवला जातोय तो केवळ ठराविक नावांपुरता शिकवला जातोय. त्यापलीकडे त्यांची झेप पोहोचू शकत नाही. पाठयपुस्तकांपलीकडेही एक फार मोठा इतिहास, फार मोठा ‘जाज्वल्य’ इतिहास अजून जिवंत आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी स्मारके गरजेची..

इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो. इतिहास हा चुका कळून येण्यासाठी असतो. इतिहास हा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असतो. कारण आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो. आणि कालचा इतिहास पुन्हा भविष्याचा मुखवटा धारण करून आपल्यासमोर येण्याची शक्यता दाट असते. हे असे चक्र निरंतर चालू आहे. चालू राहील. म्हणून इतिहासाचे जेवढे कंगोरे अभ्यासता येतील तेवढे अभ्यासले गेलेच पाहिजेत.. दर वेळेस ‘ट्रायल अँड एरर’ परवडत नसतं..

दरवेळेस ‘आदर्शांच्या कमी होत असलेल्या अस्तित्वाची’ बोंब मारली जाते. मारलेली बोंब ऐकली जाते. यात कितपत अर्थ आहे, हा वाद मला इथे मांडायचा नाही. पण जे आदर्श आपल्यापुढे आहेत ते तरी आपल्याला कितपत माहित आहेत? ते माहित होण्यासाठी ही स्मारके महत्वाची.
आदर्श वाचले, अभ्यासले, काही अंशी अंगिकारले, कि विषय संपत नसतो.. ते आदर्श पुढच्या पिढीत संक्रमित व्हायला हवेत.. त्यासाठी ही स्मारके महत्वाची..

मध्ये ह्या पुतळ्यांच्या संदर्भात, स्मारकांच्या संदर्भात विटंबनेच्या काही घटना घडल्या.. दुर्दैवीच होतं ते. त्यापार्श्वभूमीवर एक विचार नेहमी पुढे येतो, कि ह्या स्मारकांची जर काळजी घेतली जात नसेल, त्यांची विटंबना होत असेल तर ही स्मारके नकोच.. वरकरणीसुद्धा हा विचार योग्य नाही.. ही स्मारके, महापुरुषांचे पुतळे ही आपल्याला सदैव आदर्शांची जाणीव करून देणारी असतात.. ती असायलाच हवीत..

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एक स्तुत्य उपक्रम राबवला गेलाय. शहरातील सर्व पुतळे काढून बार्शीच्या न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहेत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात.. हे चित्र जर सर्व ठिकाणी दिसले तर ह्या पुतळ्यांची, स्मारकांची विटंबना नक्कीच थांबेल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणेवर जास्त ताण सुद्धा पडणार नाही..

घर असतं. घरामध्ये देऊळ असतं. त्या देवळाकडे फार कोणाचे लक्ष जात नाही. कधी त्याची फारशी पूजा होत नाही. म्हणून काही झालं तरी ते देऊळ कोणी हटवत नाही. त्याचे आस्तित्व मान्य केलं जातं. इतिहासाच्या गर्भात अशी असंख्य देवळं आहेत, ज्यांच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही किंबहुना दुर्लक्षच केलं जातं. म्हणून त्यांचं आस्तित्व कोणी नाकारत नाही. उलट जिथे देव असतो तिथे हात जोडलेच गेले पाहिजेत. त्यांची पूजा केलीच गेली पाहिजे ह्या अश्या देवांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल म्हणजे ही स्मारके.. काही ठिकाणी विटंबना केली जाते म्हणून सरसकट स्मारके बंद करा ही मागणी आततायी वाटते..

सरदार पटेलांचं हे स्मारक बांधलं गेलंय.. जगात संदेश प्रसारित केला गेलाय.. आता सर्वाना सरदार पटेलांच्या कर्तृत्वाची, देशाप्रती असलेल्या योगदानाची अजून नव्याने माहिती होईल. भविष्यकाळ ह्यासाठी सदैव कृतज्ञ राहील, एक इतिहासातलं एक भव्यदिव्य व्यक्तिमत्व त्याच्याशी सदैव जोडलं गेलंय म्हणून..

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ही कोण्या एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, तर कित्येक अगणित भारतीयांचे त्यात अतुलनीय योगदान आहे.. सर्वांचा सन्मान केला गेला पाहिजे.. जागोजागी अशी स्मारके उभी केली गेली पाहिजेत.. आज सरदार पटेलांच्या भव्य स्मारकाचे उदघाटन करताना मोदींनी एक फार सुंदर विचार ठेवलाय..

सरदारांनी स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर, जिथे हा देश असंख्य संस्थानांमध्ये विभागला होता, सर्व संस्थानिकांना एकाच झेंड्याखाली येण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला बहुसंख्य संस्थानिकांनी अनुकूल प्रतिसाद दिला होता, जे संस्थान शेकडो वर्ष त्यांच्या हातात होतं..

साधी पाच वर्षांची स्थानिक निवडणूक जिंकेलेल्याला सुद्धा जर आपण एक वर्ष आधी अधिकार सोडायला सांगितलं तर तो ऐकणार नाही. शेकडो वर्षे संस्थानांवर एकाधिकारशाही असूनसुद्धा केवळ एका व्यक्तीच्या आवाहनावर, तो अधिकार सोडून देशात विलीन होण्याचा संबंधित संस्थानिकांचा निर्णय हा एक सर्वश्रेष्ठ त्यागाचे निदर्शक आहे.. त्यांचा सुद्धा गौरव व्हायला हवा.. त्यांचे एक व्हर्च्युअल स्मारक व्हायला हवे.. कारण त्यांचेसुद्धा योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नाही.

जात, धर्म, पंथ, भेद सारं सारं विसरून कशी लोकं एकत्र आली आणि एकाच ध्येयाप्रती कशी झटली ह्याची वारंवार जाणीव आपल्यामध्ये रुजायला हवी.. रुजलेली जाणीव सतत प्रफुल्लित राहायला हवी.. प्रफुल्लित असलेली जाणीव पुढच्या पिढीमध्ये संक्रमित व्हायला हवी… आणि म्हणूनच..

आदर्शांचे, मूल्यांचे अवमूल्यांकन होणाऱ्या काळामध्ये…

स्मारकेही हवीतच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2018 3:04 pm

Web Title: statue of unity and importance of munuments
Next Stories
1 BLOG: अंत्यविधीचे दिग्दर्शक!
2 BLOG: सचिन तेंडुलकरचं नाव ठेवलं या संगीतकारावरुन
3 Blog: साक्षात ‘देवा’ची भेट
Just Now!
X