Devendra Fadnavis : महाभारतातला एक अस्वस्थ तरीही चिरंजीव असलेला जीव म्हणजे अश्वत्थामा. दुर्योधनाच्या मांड्या भीमाने फोडल्या आणि तो मृत्यूशय्येवर होता. त्यावेळी पांडवांचा वध करणार आणि तुला दाखवणार असं वचन अश्वत्थाम्याने दुर्योधनाला दिलं होतं, तो खरोखर पाच मुंडकी घेऊन आला, पण ती पांडवांची नव्हती, त्यांच्या मुलांची होती. यासाठी दुर्योधनानेही अश्वत्थाम्याला माफ केलं नाही. अश्वत्थाम्याचं दुसरं पातक म्हणजे उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र चालवून पांडवांचा वंश नष्ट करण्याचा प्रयत्न. यासाठीची त्याला मिळालेली शिक्षा भयंकर होती. कृष्णाने त्याच्या कपाळावर असलेला मणी कापून काढला आणि त्याला त्या भळभळत्या जखमेसह अमरत्वाचा शाप दिला. हा अश्वत्थामा आजही कपाळवरच्या जखमेसाठी तेल मागत हिंडतो असं म्हणतात. हे सगळं आठवण्याचं कारण आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकारणातल्या महाभारतात झालेली देवेंद्र फडणवीसांची ( Devendra Fadnavis ) अवस्था. भळभळणाऱ्या एक नाही अनेक जखमा घेऊन ते सध्या शांतपणे वावरत आहेत, अर्थात त्यांना अमरत्व मिळालेलं नाही, पण अवस्था अश्वत्थाम्यासारखीच आहे.

मी अभिमन्यू नाही, चक्रव्युहातून बाहेर पडणं मला जमतं-फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, “मला सातत्याने विरोधक टार्गेट करत आहेत. चक्रव्यूह रचून मला अभिमन्यू करु पाहात आहेत मात्र मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्युहात शिरायचं कसं आणि बाहेर कसं पडायचं हे दोन्हीही माहीत आहे.” खरंच आहे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले अभिमन्यू निश्चितच नाहीत. पण नीट विचार केला तर हा प्रश्न निर्माण होतो की देवेंद्र फडणवीसांचा अश्वत्थामा झाला आहे का? देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द तीन वर्षांत विस्तारलेली आहे. ती समजून घेऊन या प्रश्नाचा विचार करता येतो.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
dombivali dahihandi celebration
सण..संस्कृती आणि पुढची पिढी!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Eknath Khadse Joining BJP
Eknath Khadse on Devendra Fadnavis: “…म्हणून माझा भाजपाप्रवेश थांबला”, एकनाथ खडसेंचा मोठा दावा; थेट देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची नावं घेत म्हणाले…

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले

२०१४ च्या पूर्वी म्हणजेच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीचा काळ लक्षात घेतला, तर एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची ओळख. गोपीनाथ मुंडेंचे पट्टशिष्य आणि नितीन गडकरींच्या विचारांशी फारसं जुळवून न घेणारे असंही त्यांच्याबाबत बोललं जात असे. मात्र पुढे त्यांनी हा समज त्यांच्या कृतीतून खोडून काढला. २०१४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महत्त्वाची होती. या निवडणुकीत भाजपाने १२२ जागा जिंकल्या. पूर्ण बहुमतापासून भाजपा फक्त २३ जागा दूर होती. इतकी चमकदार कामगिरी करण्याचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) निश्चितच जातं. पण त्यावेळी ते मुख्यमंत्री होतील अशी चर्चा नव्हती. विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे अशा नावांची चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलं, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) पक्षाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरली. दिल्लीतून महाराष्ट्रावर प्रशासक नेमला असता तर तो जसं काम करेल तसं काम सुरुवातीच्या दिवसांमध्ये करुन देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातलं स्वतःचं स्थान बळकट केलं. पक्षातल्या विरोधी कारवाया आणि विरोधकांच्या विरोधी कारवाया यातून स्वतःला अत्यंत शिताफीने वाचवत देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम राजकारणी म्हणून याच कालावधीत उदयाला आले. त्यांची तुलना शरद पवारांच्या राजकारणाशीही केली गेली. देवेंद्र फडणवीस यांचा कुशल आणि कर्तबगार राजकारणी म्हणून सुरु असलेला राजकीय प्रवास आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख दोन्ही उंचावत राहिलं. देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व तेव्हा एकसंध असलेल्या शिवसेनेलाही पटलं होतं. त्यामुळेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) पाहुणे म्हणून गेले होते. तसंच कुठल्याही विषयाची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन ते विरोधकांची शब्दशः पिसं काढत. गृहखातं त्यांच्याकडे असल्याने पोलिसांवरचा वचक काय असतो तो देखील त्यांनी दाखवून दिला. ज्याचा फायदा पुढे विरोधात बसल्यावरही त्यांना झाला.

हे पण वाचा- Eknath Khadse on Devendra Fadnavis: “…म्हणून माझा भाजपाप्रवेश थांबला”, एकनाथ खडसेंचा मोठा दावा; थेट देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची नावं घेत म्हणाले…

२०१९ ची निवडणूक, औट घटकेचं मुख्यमंत्रीपद आणि…

यानंतर आली २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली. भाजपा-शिवसेना महायुतीने निवडणूक लढली. या निवडणुकीत भाजपाच्या १०५ जागा आल्या आणि शिवसेनेच्या ५६ जागा निवडून आल्या. महायुतीला स्पष्ट बहुमत होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे सगळे पर्याय खुले म्हणत अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. मात्र आमदार जास्त असल्याने सेनेला मुख्यपद देताच येणार नाही असं फडणवीस ठामपणे सांगत होते. तसंच उद्धव ठाकरेंना कुठलंही वचन दिलेलं नाही असंही त्यांनी वारंवार सांगितलं. अमित शाह यांच्याशी बोलल्याचा संदर्भही त्यांनी अनेक मुलाखतींमधून दिला. शेवटी फडणवीसांना अंदाज आला की उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर जाऊ शकतात, त्यामुळे तो ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी पार पडला. मात्र यावेळचं मुख्यमंत्रिपद हे पाच वर्षांचं नाही तर औट घटकेचंच ठरलं. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेचा प्रचार, त्यानंतर त्यांची उडवण्यात आलेली यथेच्छ खिल्ली, तसंच सरतेशेवटी महाविकास आघाडीचं सरकार येणं आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधात बसावं लागणं या गोष्टी पुढे क्रमाक्रमाने घडल्या. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) नोव्हेंबर २०१९ च्या शेवटाकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

विरोधी पक्षनेतेपद आणि मविआतील तीन विकेट

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री म्हणून जितके शांत, संयत आणि धोरणी राजकारणी आहेत, त्यापेक्षा अधिक आक्रमक ते विरोधी पक्षनेते म्हणून आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद स्वीकारुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नामुष्कीचा अध्याय लिहिला. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या कारकिर्दीतला हा कालावधी त्यांची कारकीर्द उंचावणारा ठरला यात काही शंकाच नाही. १०० कोटींच्या खंडणीचं प्रकरण, सचिन वाझेला दिलेलं टार्गेट यावरुन त्यांनी अनिल देशमुखांची विकेट काढली. त्याआधी संजय राठोड यांची विकेट काढली. या दोघांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसंच नवाब मलिक यांना तुरुंगात जावं लागलं. या सगळ्यात विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. करोनाचा काळ, उद्धव ठाकरेंना नसलेला प्रशासकीय अनुभव, त्यांचं घरी बसणं, फेसबुक लाइव्ह या सगळ्याचा फायदा देवेंद्र फडणवीस यांना झाला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात बसून महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचं काम लीलया करुन दाखवलं. अडीच वर्षे गेल्यानंतर उजाडली २१ जून २०२२ ही तारीख.

२१ जून २०२२ ला काय घडलं?

२१ जून २०२२ ही तारीख महाराष्ट्र कधीच विसरणार नाही कारण एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतला गेल्याच्या बातम्या झळकल्या त्या याच दिवशी. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. एकनाथ शिंदेंचं हे बंड शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. कारण सत्तेत असलेले शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेले. अर्थात या सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता तो देवेंद्र फडणवीस यांचाच. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुढचे मुख्यमंत्री तेच होतील असं वाटत असतानाच सगळ्यांना धक्का देत एकनाथ शिंदेंचं नाव जाहीर केलं. इतकंच नाही तर मी सत्तेत राहणार नाही, मी बाहेर राहून पक्ष मजबूत करेन असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितलं. मात्र अवघ्या काही तासांमध्ये पक्षाचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांची तेजस्वी कारकीर्द झाकोळण्यासाठी केलेला हा पहिला प्रयत्न होता यात काही शंकाच नाही. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना फडणवीसांच्या चेहऱ्यावरची निराशाच हे सगळं सांगून जात होती. ही घटना देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीच्या उतरत्या आलेखाचा केंद्रबिंदू ठरली. पक्षाचा आदेश डावलू शकत नसणारे देवेंद्र फडणवीस हे शांत राहिले पण त्यांनी नंतर पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली हा आरोप त्यांच्या माथी मारला गेला. महाभारतातल्या आधुनिक अश्वत्थाम्यावर करण्यात आलेला हा पहिला वार होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. अजित पवार २ जुलै २०२३ या दिवशी महायुतीबरोबर आले आणि उपमुख्यमंत्री झाले. यामुळे शरद पवारांच्या पक्षाकडूनही देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadnavis ) यथेच्छ टीका झाली. अजित पवारही ४१ आमदार बरोबर घेऊन आले. मात्र त्यांना घेऊन कशी चूक झाली हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दबक्या आवाजात बोलत असतातच. देवेंद्र फडणवीस यांची अवस्था मात्र एका अर्थाने वाईट झाली. उद्धव ठाकरे यांनीही त्यांचा उल्लेख फडतूस असा केला. एक नाही दोन पक्ष फोडल्याचं बालंट फडणवीसांच्या माथी आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.

DCM Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे असं चित्र निर्माण झालं आहे. (फोटो-देवेंद्र फडणवीस, फेसबुक पेज)

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले गिरीश कुबेर?

“देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची आत्ताची अवस्था ही खूप वेदनादायी आहे. सगळ्या वाहत्या जखमा घेऊन वावरावं लागत असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना. त्यांच्या संस्कारानुसार पक्षातल्या अंतर्गत घडामोडींबाबत ते काहीही बोलणार नाहीत. भाजपामध्ये अशी परिस्थिती आली आहे की जेवढा तुमचा अपमान होईल तेवढं चांगलं भवितव्य असेल. अशी परिस्थिती आणणाऱ्या नेत्याचाच जर उतरणीचा काळ सुरु झाला असेल तर या अपमान, उपेक्षा सहन कराव्या लागणाऱ्यांचं भवितव्य काय? हा प्रश्न असेल. देवेंद्र फडणवीस यांना जर पक्षासाठी विधानसभा लढायला सांगितली तर ते लढतीलही, पण भाजपा नेत्यांना ते आवडेल का? कारण लढून काही मिळणार नसेल तर आपण का लढायचं या मानसिकतेत भाजपाचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे सध्याच्या घडीचे विदग्ध राजकारणी आहेत असं मला त्यांच्याविषयी वाटते. यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की त्यांच्या पक्षातून झालं आहे.” असं मत गिरीश कुबेर यांनी मांडलं आहे.

सगळा रोष देवेंद्र फडणवीसांवरच

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याबाबतची सद्यस्थिती अशी आहे की काहीही वाईट घडलं तरीही खापर फुटतं ते देवेंद्र फडणवीसांवर. मनोज जरांगेंचा विरोध, रोष एकट्या देवेंद्र फडणवीसांवर आहे. जो दूर करण्यासाठी मी मराठा आरक्षणात आडकाठी केली आहे असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन हे देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावं लागलं. बदलापूरमध्ये एक घटना घडली त्यावेळी गृहमंत्री कुठे आहेत? हा प्रश्न विचारला गेला. देवेंद्र फडणवीस तेव्हा दिल्ली दौऱ्यावर होते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका झाली. संजय राऊत यांनी तर देवेंद्र फडणवीसांना ‘अनाजीपंत’, ‘शिवरायांनी निर्माण केलेलं मराठ्यांचं राज्य संपवणाऱ्या पेशवाईचे उत्ताराधिकारी’, महाराष्ट्राचे खलनायक, ‘औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन’ अशी असंख्य बिरुदं त्यांना लावली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का?

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या मागच्या दहा वर्षांतील कारकिर्दीचा विचार केला तर त्यांचा उतरता काळ सुरु झाला आहे. दोन पक्ष फोडल्याच्या आरोपांपासून ते प्रत्येक आरोपांनंतर टीकेचे धनीच झाले आहेत. पक्षाने उपमुख्यमंत्री करुन छाटलेल्या पंखांचं दुःख एकीकडे आणि दोन फोडलेले पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दुसरीकडे तर विरोधकांनी केलेले टीकेचे वार झेलणं हे तिसरीकडे अशी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय महाभारतात देवेंद्र फडणवीस यांचा अश्वत्थामा झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आणि २१ जून २०२२ नंतरच्या घटनांचे संदर्भ लक्षात घेतले तर या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं मिळतं यात शंका नाही.