– लक्ष्मी यादव

प्रति,

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

विषय: “बाप्पा, आम्हाला कधी पावणार?” असा प्रश्न आपणास विचारणेबाबत

मी आशा करते की आपण ठीक असणार. (खरं तर असणारच आहात, कारण महाराष्ट्रात बरंच काही सुरू आहे. मात्र तुम्हीच काही दिवसांपूर्वी “आपल्याला काय? बोलायचं आणि निघून जायचं,” असं म्हणालात. असं म्हटल्याने कदाचित शरीरावर, मनावर ताण येत नसावा आणि आरोग्य चांगले राहत असावे).

महाराष्ट्रासाठी तुम्ही मुख्यमंत्री तारणहार, बाप्पा आहात (जनतेचे सेवक वगैरे नको) म्हणून मी या पत्रात तुम्हाला बाप्पा म्हणणार आहे. बाप्पा हा शब्द इतक्या वेळा ऐकायला यायला लागला आहे की, जणू बाप्पा हे प्रत्येकाच्या घरी जन्माला आलेलं गोड बाळ, जवळचा, सखा, पिता आहे असं प्रकर्षानं वाटू लागलं आहे. हा शब्द सगळ्यांच्या आवडीचा असल्याने वापरत आहे. आज तुमच्याकडे काही मागणं मागणार आहे, तुम्हाला साकडं घालणार आहे आणि प्रश्नही विचारणार आहे.

तर बाप्पा, काही दिवसांपूर्वी रात्री मला तुझी प्रकर्षाने आठवण झाली. मी रात्री दहा वाजता झोपणारी आणि सकाळी सहाला उठणारी सामान्य नागरिक. मात्र रात्री दहाला झोपल्यावर अचानक लहान मुले आणि मोठ्यांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने झोपमोड केली. उठून खिडकीतून पाहिले तर चार पाच मुले, पाच सहा मोठी माणसे कारमधून गणपती मूर्ती घेऊन येत होती. चार पाच मिनिटे त्यांनी बिल्डिंगखाली ‘गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम’च्या जोरजोरात घोषणा दिल्या आणि मग ते घरात गेले.

कशीबशी मला अर्ध्या तासाने झोप लागली. पुन्हा काही वेळाने जोरजोरात टाळांचा गजर कानात घुसला, ह्रदयात धडकी भरली. मी उठून बसले. शेजारी झोपलेलं लेकरू वळवळलं. कामावरून दमून झोपलेला नवरा दचकला. घड्याळात दीड वाजले होते. शेजारच्या बिल्डिंगमधील गणपती. वाटलं पोलिसांना फोन करावा की तुम्ही अशी रात्री अपरात्री गणपती आणायची परवानगी कशी देता? पण लक्षात आलं की बाप्पा तूच तर गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिलेली आहे आणि तुझी आठवण झाली बघ. “आता गणेशोत्सव बिंधास्त साजरा करा” अशा आशयाच्या बातम्या टीव्हीवर झळकत असतील तर लोकांचा गैरसमज होणं साहजिक आहे की कधीही काहीही केलं की चालेल (आणि आजकाल चालतं खरं तर. काही तक्रार करायला गेलं की आम्ही धर्म, संस्कृती द्वेष्टे ठरवलो जातो आणि लगेचच देशद्रोहीसुद्धा. आजकाल भीतीच वाटायला लागली आहे की आपण काय केलं आणि बोललं की तो देशद्रोह ठरेल सांगता येत नाही. जनता भीतीच्या सावटाखाली असणं व्यवस्थेच्या फायद्याचं असतं. असो.)

“बाप्पा इथेही थोडसं पाव रे!”

तू सत्तेत आल्यापासून भक्तांची खूप काळजी घेत आहेस बघ. अनेक निर्णय तू किती झटपट घेतले. गणेश मंडळ समन्वय समितीने दिलेल्या जवळजवळ सर्व सूचना मान्य करण्यात तू किती तत्परता दाखवली. अशा तत्पर मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमानच आहे. (पर्यावरणावरचे आणि इतर अनेक महत्वाचे अहवाल अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत, ते बघायला वेळ मिळाला नसेल असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे ना बाप्पा?) गणपतीच्या उंचीवर मर्यादा नाही असे तू म्हटल्याचे समजले. बाप्पा तू पावलाच म्हणायचं भक्तांना. इकडे काही भक्तांकडे इतके पैसे आहेत की कुणाचा गणपती किती उंचीचा यावरून आस्थेची, श्रद्धेची उंची ठरवली जात असल्याने “आमच्याच मंडळाचा गणपती उंच” अशी चढाओढ सुरू आहे. दुसरीकडे मात्र पावसाळ्यातसुद्धा गरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, भांडी कुंडी,पोरांची दप्तरं, सगळा संसार उघड्यावर. इथे तू बाप्पा का पावत नाही कळत नाही. अशावेळी बाप्पाला, अर्थातच तुला म्हणावं वाटतं, “बाप्पा इथेही थोडसं पाव रे!” गणेश आगमन आणि विसर्जन मार्गांवरील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश तू दिले असे समजले. दर महिन्याला अनेक गावांमध्ये रस्ता नसल्यामुळे अनेक गरोदर महिलांचे मृत्यू होतात. त्यांना रस्ते कधी मिळणार रे बाप्पा? खड्ड्यांमध्ये स्कूटी उलटून तरुण मुलगी मेल्याचे दुख अजून तिच्या आई बापांना पचले नाही. त्यांना न्याय कधी मिळणार बाप्पा?

गेल्या वर्षी पण तू भक्तांना अनेक आशीर्वाद दिले होते. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत, यासाठी खेटे घालायला लागू नये, म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाइन परवानग्या दिल्या असे वाचनात आले. चांगलेच आहे, मात्र इथे सरकारी दवाखान्याच्या दारात आत न घेतल्याने गरीब बाई बाळंत होते, अनेक सरकारी कामांसाठी अजूनही सामान्य लोकांना हेलपाटे घालावे लागतात, एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत, दुसरीतून तिसऱ्या खिडकीत पाठवले जाते. लाच देऊनही कामं लवकर होत नाहीत. (काळा पैसा बाहेर काढू, ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा बाप्पा तू दिली नाही हे एक बरे झाले; नाही तर उगीच पंचाईत झाली असती.) इथे कधी पावणार बाप्पा?

या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत, त्यांना शुल्कातून सूट दिली आहे, असंही तुझ्याकडून भक्तांना आश्वस्त करण्यात आलं. सरकारी हॉस्पिटलची अॅम्ब्युलेन्स न पुरवली गेल्यानं आणि खासगी अॅम्ब्युलन्ससाठी पैसे नसल्यानं सायकलवरून आपल्या लेकराचे, बायकोचे निर्जीव शरीर सायकलवर वाहून नेणार्‍या गरीब माणसाला, स्पर्धा परीक्षा, तलाठी भरतीसाठीच्या फीसाठीचे काही शे रुपये नसल्याने परीक्षा देऊ न शकल्याने आपली स्वप्ने धुळीस मिळालेल्या मुला मुलींना कधी सूट मिळणार बाप्पा? मागील अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाचं आयोजन करणाऱ्या मंडळांना एकदाच ५ वर्षांसाठी परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना तू दिल्या. या निर्णयामुळं राज्यातील हजारो गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असणार. खरे आहे दिलाशाबद्दलचे.

या वर्षी पाऊसकाळ प्रचंड कमी झाला आहे. आधीच तोट्यात चालणारी शेतीची कूस उजवेनासी झाली आहे. शिक्षणासाठी बापाकडे पैसे नाहीत म्हणून शेतकर्‍याच्या पोरीने आधीच जीव दिला आहे. तिचा बाप फाशी घेण्यासाठी झाडाला कासरा बांधून तुमच्याकडून काहीतरी दिलासा मिळेल याची डोळ्यात प्राण घेऊन वाट पाहत आहे. त्याचा जीव वाचवणार की नाही बाप्पा?

अरे हो, आणखी एक बोलायचेच राहिले बाप्पा. मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत कधीच गणपती अथवा कोणताही सण, उत्सव (१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सोडून) साजरा केला गेला नाही (जायलाच नको); तरी माझ्या गावात सर्व धर्मसमभाव होता. आता एक आई, पालक म्हणून मला काळजी वाटते आहे की, शाळांमध्ये गणेशाची स्थापना सरसकट केली जात आहे, मुलांकडून गणपती आरती संविधानातील प्रस्ताविकेसारखी पाठ करून घेतली जात आहे. मुलांना प्रश्न पडत नसेल का बाप्पा की, आपल्याकडून एकाच धर्माची प्रार्थना का म्हणून घेतली जात आहे? मागे एका शाळेत एक हिंदू धर्म सोडून इतर धर्माची प्रार्थना गायली गेली असे म्हणून आपल्या भक्तांनी तिथल्या गुरूला मारहाण केली होती.

शाळा हे धार्मिक शिक्षण देण्याचे ठिकाण नाही, हे मलाही मान्यच आहे; पण तुझी हीच भूमिका सगळ्यांसाठी समान का नाही? मध्यंतरी पुण्यातील एका कॉलेजमध्ये एका शिक्षकाला हिंदू धर्मावर टीका केली असे म्हणून ‘बवाल’ केला गेला. ती टीका नव्हती, समीक्षा होती हे तुलाही माहिती आहे ना रे बाप्पा. त्यावर तू काहीच का बोलला नाहीस? हे निवडक मौन होतं का रे? तुझ्या राज्यात शिक्षकांना अशी वागणूक का रे बाप्पा? संत तुकाराम, गाडगेबाबा यांनीही केलेली धर्माची चिकीत्सा धर्म सुधारणेसाठी असते हे लोकांना सांगशील का? त्या उत्तर परदेशात एक शिक्षिका कोवळ्या मुलांना एकमेकांना धर्मावरून मारायला सांगते. दिल्ली, बेंगलोरमध्ये शिक्षक मुस्लीम मुलांना पाकिस्तानला जायला सांगत आहेत.

महाराष्ट्रातील मुस्लीम पोरं पोरी ते व्हिडीओ पाहून घाबरली आहेत. जात धर्माची समीक्षा करणार्‍या शिक्षकांकडून मुलांना धोका नाही, मात्र जात धर्माचा द्वेष करणार्‍या शिक्षकांकडून नक्कीच आहे, हे कळते न तुला बाप्पा? या भयभीत लेकरांना थोडासा धीर द्यायला जमेल बाप्पा? माहिती आहे, तू खूप कामात असतोस; तरीही आपल्या राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जात धर्माचा द्वेष शिकवू नये यासाठी घटकाभर शिक्षकांशी पण बोलशील का बाप्पा?त्यांना तू सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेला होतास हे उदाहरण सांगशील का? संविधानातून ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ शब्द हेतूपूरस्सर वगळणार्‍या लोकांना ‘माणसांची जैवविविधता’ समजावून सांगण्याची हिंमत तू करू शकशील बाप्पा? श्रद्धा म्हणजे ‘सांस्कृतिक दहशतवाद’ कसा नव्हे हेही भक्तांना जरा उलगडून दाखवशील का?

गेल्या कित्येक वर्षात मी राहते त्या परिसरात लहान मुले कधी रात्री ११ वाजेपर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत जागी राहिली नाहीत रे बाप्पा! ना कधी दीड वाजता लोकांनी गणपती घरी आणून आवाजाने लहान मुले, वयस्क, आजारी माणसांची ह्रदय बंद पडले नाही की ध्वनि प्रदूषणामुळे कुत्र्यांनी स्थलांतर केले नाही. मिरवणुकीतील अतिरेकी आवाजामुळे ह्रदयाचे ठोके वाढून हार्ट अटॅक येऊन तरुण मुले मरत आहेत, लहान मुलांवर त्याचा किती परिणाम होत असेल बाप्पा? आता मुलांचा खेळण्याचा, काहीतरी कल्पक बनविण्याचा वेळ गणपतीच्या मंडपात दिवसभर बसण्यात, मोठ्यांसोबत ‘या रावजी’ वरच्या लावण्यात मुलींना नाचवले जाताना पाहण्यात, गणपतीमागे पत्त्यांचा डाव रंगलेला शिकण्यात आणि ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ अशी गाणी गाण्यात वेळ जात आहे.

अशी मुलं ऑलिम्पिकमध्ये जातील, शास्त्रज्ञ होतील? की हा देश बुवा बाबांचा म्हणून ओळखला जाईल (आधीही तो तसाच ओळखला जात होता. पण आता त्याची तीव्रता वाढली आहे.) बाप्पा, तुला प्रश्न असा आहे की, आता ही लहान मुले विवेकी, तर्कशुद्ध विचार करायचे सोडून कर्मकांडांच्या नादी लागून आयुष्याचे मातेरे करून घेणार काय? मुलं मिरवणुकीत नाचतात, शॉक लागून मृत्यूमुखी पडतात. ना त्या पोरांचा दोष, ना पालकांचा. व्यवस्थेने आस्था घरातून रस्त्यावर आणली आहे. या वर्षीच्या आयएएसच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मुले मुली किती टक्का आहेत? हा टक्का वाढवण्यासाठी तू काय करायचं ठरवलंय का बाप्पा? आपली मुले (तीही फक्त विशिष्ट समुदायातील) ढोल ताशा, दंगल करण्यात बिझी आहेत, त्यांच्याकडे वेळच नाही काहीतरी उपयोगाचे करण्यासाठी.

मुळात आपण करतो त्यात काहीतरी कर्तृत्व आहे असे एरवीही घरीदारी काहीही भरीव न करणाऱ्या बर्‍याच तरुणांना वाटले नाही, तर नवलच. आपल्या राज्यातील तरुण पिढी अशी ढोल ताशाच्या तालावर धुंद (दारू पिऊन) होऊन नाचत राहिलेली तुला तरी बरी वाटते का बाप्पा? डॉ. बाबासाहेबांनी ज्या प्रथा, परंपरा, कर्मकांडांमुळे हिंदू धर्म सोडला, त्या कर्मकांडाचे प्रस्थ समाजात माजले असताना आपण गप्प का? तरुण देशाचे वर्तमान आणि भविष्य असतात, त्यांच्याही बुद्धीत जरा भर घालशील का?

लग्न झाल्यावर इतर कलेतल्या पॅशन मुली सोडून देत आहेत, मात्र ढोल वाजवण्याच्या पॅशनसाठी त्या संघर्ष करत आहेत, असे मुलीने आनंदाने आणि गर्वाने सांगितल्याचे पाहिले. या मुली ढोल वाजवण्यालाच सबलीकरण समजत आहेत. (ढोल वाजवणे एक ‘तथाकथित मर्दानी’ साचा मोडणे असू शकते, पण चुकीचे साचे मोडण्यात तसाही काही अर्थ नाही.) बाप्पा, त्यांनाही सावित्रीबाईने कशासाठी शिकवले याची आठवण करून देशील का? महाराष्ट्र महिला आणि बालकांवरील अत्याचारात अग्र क्रमांकावर आहे, अनेक मुलींचे बालविवाह होतात, पैसे नाहीत म्हणून त्यांना शाळा, कॉलेज सोडावे लागते, इथेही आपल्यावरील बंधने तोडून मुली, महिलांना मदत करणे त्यांची जबाबदारी आहे असे या ढोल वाजवणाऱ्या, दही हंडी फोडणाऱ्या मुलींना सांगशील का बाप्पा?

सध्या गणपती उत्सवाचा माहौल असा तयार झाला आहे की, जणू देश स्वतंत्र झाल्यावर एखाद्या देशाला आनंद झाल्यावर लोक त्याचा उत्सव करतील असा. गणपती राष्ट्रीय सण झाल्यासारखे वाटत आहे. रोषणाई, संगीत (ते कर्णफोडी असलं आणि मधुर, स्वातंत्र्य गीत नसलं तरी), डान्स (दारू पिऊन केलेला बेताल असला तरी), विविध प्रकारच्या मिठाया (भेसळीच्या असल्या तरी), खरेदी (कर्ज काढून केलेली, मूलभूत गरजांकडे दूर्लक्ष करून केलेली असली तरी), गणपती व त्याची आरास (हा माहौल एवढा खतरनाक की प्रत्येकाला गणपती, अर्थात धर्माप्रति आपले योगदान द्यायलाच हवे या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रवासी, अगदी घरकाम करणार्‍या ताई आणि दादांनीसुद्धा हजार रुपयांच्या खाली गणपती आणले नाहीत) डोळे विस्फारून पाहावी अशी झाली आहे.

लोकांचा उत्साह इतका ओसंडून वाहतो (रस्ते ब्लॉक करून) आहे की पाहताना वाटते की हा आपलाच महाराष्ट्र आहे का ज्यात गरीबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुष्काळ असे कोणतेच प्रश्न उरलेले नाहीत. महाराष्ट्राचा देशात कर्जबाजारी राज्य म्हणून पहिला नंबर आहे असे सांगितल्यास कुणासही खरे वाटणार नाही, ‘भक्तांना’ तर नाहीच नाही (पण तुला तर सगळे माहिती असते न बाप्पा!). गणेश उत्सवात संपूर्ण देशात २० कोटींच्या गणेश मूर्ति विकल्या गेल्या (ज्या विसर्जनानंतर तुकडे होऊन पडतात) आणि आर्थिक उलाढाल ७५ हजार कोटी झालीय, अशी माहिती ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेनं दिली.

या वर्षी दिवाळी गणेशोत्सवापुढे फिकी पडणार असे वाटते आहे. सिग्नलवरच्या पांगळ्या म्हातार्‍याच्या हातात दहा रुपयेही न देणारी जनता भारीतले कपडे, मिरवणूक यावर लाखो रुपये सहज खर्च करत आहे. काय बोलावं देवा? लोकांना सण साजरे करण्याशिवाय दुसरं काहीच काम नसावं अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. जशी जनता तसा राजा! जनतेलाच लोकांच्या प्रश्नांशी काही कळवळा नसेल, तर बाप्पा तू तरी काय करणार म्हणा! लोकांच्या या उत्सवी हालचालींकडे पाहिल्यावर असे वाटू लागले आहे, जणू पृथ्वीचा शेवट होणार आहे आणि त्याआधी जगून घ्यायला हवे असे लोक वागत आहेत.

बाप्पा, या सगळ्याचे तुम्ही नियंत्रक आहात. महाराष्ट्राच्या, देशाच्या गंभीर प्रश्नांसाठी शंभर बाया, पुरुष जमा होत नाहीत. मात्र, गणपती मिरवणुकीसाठी हजारो लोक शिस्तीत एकत्रित येत आहेत, घोषणा देत आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे का बाप्पा? समाजसुधारकांनी आपली आयुष्ये पणाला लावून लोकांना कर्मकांडांमधून बाहेर काढून ज्या सुधारणा केल्या, तो देश, राज्य शेकडो वर्षे पुन्हा मागे जात आहे असे तुला वाटत नाही का बाप्पा? अथर्वशीर्ष पठणासाठी एकत्रित येणार्‍या ३६ हजार बायांना मणीपूर बलात्कार घटनेविरोधातील मोर्चात का सहभागी व्हावं वाटलं नाही हे माझ्या वतीने विचारशील का बाप्पा?

सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, टीव्ही, मार्केट, शाळा, कॉलेज, सिनेमा हॉल…सगळीकडे गणपती बाप्पा छा गये है. बाप्पा, तू असा गैरसमज करून घेऊ नकोस की मी त्या बाप्पावर नाराज आहे किंवा गणेशोत्सव करू नये असं म्हणत आहे. करावेत की सण बाप्पा. सगळेच करावेत, तेही साधेपणाने, कर्मकांडे टाळून. जुन्या सणांना नवीन रूप देऊन. सणांच्या दिवशी काहीतरी अर्थपूर्ण करून. गोड धोड करावे, भेटीगाठी कराव्या, नाचावे, शांत आवाजात गाणी ऐकावीत, आरती म्हणावी, आवाजाचे बंधन पाळून वाद्ये वाजवावीत, एखाद्या विषयावर चर्चा करावी, फिरायला जावे, अशा कितीत्तरी गोष्टी करता येतील ना बाप्पा!

शिव जयंती, भीम जयंती, मुस्लीम, जैन व इतर कोणत्याही समाजातील मिरवणूका या लोकांनी एकत्रितपणे मानव कल्याणासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहेत याची तेवढी आठवण तुझ्या सर्व जाती धर्मातील भक्तांना करून देशील ना बाप्पा? जो बाप्पा घरात आहे तोच लागबागला, त्यासाठी जीव धोक्यात घालून अपमान सहन करण्याची गरज नाही हे भक्तांना समजावून सांगशील का? मातीच्या गणेश मूर्ती वापराव्या, एकाच वर्षीच्या बाप्पाचे प्रतिकात्मक विसर्जन करून तीच धातूची मूर्ती अनेक वर्षे बसवावी. असं करून आपली श्रद्धाही जपली जाऊ शकते आणि मूर्तीचा सन्मान पण राहतो. असे नवीन उपाय तू भक्तांना सांगशील का बाप्पा?

बाप्पा, या सगळ्या गदारोळात भक्तांना गुंतवून तू एक टोकाचा असंवेदनशील निर्णय घेतला आहेस, ज्यासाठी तुझा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. तो निर्णय म्हणजे शाळा दत्तक आणि समूह शाळा योजना. आपल्या लेकराला जन्म दिल्यावर त्याची सगळी जबाबदारी आपण पालक म्हणून घ्यायची असते ना? (नाही तर आपण आई बाप होऊच नये, नाही का?) असं पोरांना दत्तक देऊन तुझी जबाबदारी झटकणार तू बाप्पा? एवढं मोठं चुकीचं पाऊल तू कसं काय उचलू शकलास?

सध्या ६५००० सरकारी शाळांत गावातील किंवा गरीब, बहुजनांच्या घरातील पोरं पोरी शिकतात. महसूल वाढवण्यसाठी दारूच्या नव्या दुकानांना परवानगी आणि शिक्षणात पैसा गुंतवायचा नाही म्हणून शाळा देणगीदारांच्या दयेवर. हा निर्णय घेताना तुझ्या डोळ्यासमोर त्यांचे केविलवाणे चेहरे आले नाहीत, एवढा दगड कसा झालास बाप्पा? त्यांच्या पोटावर आणि बुद्धीवर घाला घालताना तुझा हात एकदाही थरथरला नाही? यावर माझ्यासारख्या एका भोळ्या भाबड्या नागरिकाचा प्रश्न आहे बाप्पा, महाराष्ट्राकडे जर शाळा चालवायला, त्यांचा दर्जा सुधारायला पैसे नाहीत म्हणता तर मंदिरांसाठी ग्रामविकास विभागाने २४०० कोटी कसे दिले?

दुसरी गोष्ट, शाळा चालवायला खासगी कंपन्यांना देणार, खासगी कंपन्या शासनापेक्षा मोठ्या झाल्या व्हय आणि त्यांच्याकडं शासनापेक्षा जास्त पैसे कसा काय आला? कुठनं आला? महाराष्ट्रातून उद्योग शेजारी राज्यात चालले, मुंबई दुसऱ्या राज्यात हलवण्याचे बेत सुरू झाले आहेत आणि तरी तू गप्प का बाप्पा? तुझा स्वाभिमान दुखावला जात नाही? समूह शाळांच्या गोंडस नावाखाली तू १४००० सरकारी शाळा बंद पाडणार बाप्पा? तुला गरीब, बहुजनांनी शिकू नये असे वाटते का? एका शासन आदेशाने हजारो अतिरिक्त होणार्‍या शिक्षकांची (जे आधीच आहे ती मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत), शिक्षणातून बेदखल होणार्‍या मुलांची तुला खरंच काळजी आहे ना की तूच या सगळ्यात सामील आहेस की तुला बोलू दिलं जात नाही अशी शंका मनात येऊ लागली आहे बाप्पा (तुला दुजाभावाची वागणूक दिली जाते आहे हे काही भक्तांपासून लपून राहिलेले नाही. आम्ही शेवटी तुझीच तर लेकरे आहोत, लेकरांना कळतं.) नाही म्हटलं तरी लोक नसले तरी लोकांचे प्रतिनिधी तुझ्याबरोबर होते. बिचार्‍यांना तुझ्या सोबतीसाठी आसाममधील डोंगर दर्‍या गाठाव्या लागल्या, त्यांच्या मतदारांसाठी तरी काहीतरी कर.

या पामराने जर काही वेडं वाकडं बोललं असेल, आगाऊ वाटणारे प्रश्न विचारले असतील, तर तू त्याकडे अजिबात दूर्लक्ष करू नकोस बाप्पा. तू राज्यातल्या भोळ्या जनतेसाठी देव, बाप आहेस. काहीतरी बोलावं आणि निघून जावं असं करून कसं चालणार बाप्पा! तू जनतेच्या मनातल्या गोष्टी पूर्ण केल्या नाही, तर जनता पुढच्या वेळी तुझी प्रतिष्ठापना करणार नाही. जनता नवस पूर्ण न केलेल्या देवाला पुन्हा नारळ फोडत नाही आणि देवही बदलते. जनता पावणार्‍या देवाचाच जयजयकार करते बाप्पा.

माझ्या मागण्यांचा, गार्हाण्याचा नक्की विचार कर, बाप्पा!

“गणपती प्रसन्न होतो, याची मला खात्री. बाप्पा पाहिजे त्याला धन, विद्या, अपत्यही देतो,” असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटल्याचे वाचले. तेव्हा दोन्ही बाप्पा, जनतेला पावा!

कळावे.

तुझीच,
सामान्य जनतेची एक प्रतिनिधी