– अजिंक्य जोशी
सध्या वाहतुकीचे रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, त्यातून दरवर्षी जाणारे जीव आणि खर्च होणारे लाखो करोडो रुपये या विषयावर अगदी समान्यांपासून ते कलकरांपर्यंत सगळेच बोलत आहेत. अर्थात चांगले रस्ते देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावतात असं म्हणतात. (सध्या आर्थिक संकटाला फक्त रस्तेच कसे जबाबदार आहेत हे कोणी आता बोलू नये म्हणजे झालं.) मुळात रस्ते आणि त्यात होणारा भ्रष्टाचार आणि राजकीय पक्ष आणि कंत्राटदारांचे भरणारे खिसे हा एक वेगळाच विषय आहे. ‘मॅकिन्झी’ या कंपनीच्या अहवालानुसार खराब रस्त्यांमुळे देशाला ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना यावर काही उपाय आहे का? तर हो आहे. या समस्येचा अगदी आजमावून सिद्ध झालेला अगदी सोपा उपाय आहे. आता तुम्हाला वाटेल सोपा आहे पण उपाय खूप महाग असणार तर असं अजिबात नाही. आता असं नाही म्हटल्यावर अगदी अमेरिका जपानसारख्या देशातून आपण तंत्रज्ञान आणणार का? नाही ओ तसंही नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रालाच काय देशाच्या वाहतूक व्यवस्थेला खड्ड्यात घालणाऱ्या या खड्ड्यांवर उपाय देणारी व्यक्ती आहे एक ठाणेकर.
काय सांगता काय असं तुम्हाला वाटेल आता. पण खरोखरच मूळचे ठाणे पूर्वेतील रहिवाशी असणारे डॉक्टर विजय जोशी यांच्याकडे खड्ड्यांवरील समस्येवर जगमान्य उपाय आहे. जोशी हे मागील २० वर्षांपासून सिडनी येथे स्थायिक आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये स्टिल उत्पादनादरम्यान तयार होणारी मळी रस्ते बांधण्यात कशी वापरता येईल या विषयावर प्रबंध सादर करुन त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि सध्या फ्लुटॉन होगॅन (Fulton Hogan) या न्यूझीलंडमधील कंपनीत कार्यरत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लुटॉन होगॅन कंपनीने अनेक रस्ते बांधले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व रस्ते स्टील उत्पादनात तयार होणाऱ्या मळीचा (slag) वापर करून बांधले आहेत. म्हणजे या कंपनीने या मराठमोळ्या माणसाला केवळ नोकरीच दिली असं नाही तर त्याची संकल्पना प्रत्यक्षात वापरुन त्यापासून दिर्घकाळ टिकणारे रस्ते तयार केले. जोशी यांचे तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये अगदी सिडनी विमानतळाची धावपट्टीपासून ते देशातील वेगवेगळ्या भागांमधून जाणारे शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्गांचाही समावेश आहे.
स्टील उत्पादनात मुख्य उत्पादन तयार झाल्यानंतर उरलेल्या मळीमध्ये अस्फाल्ट मिसळले असता ते अजून टिकाऊ होतात. यापासून बांधलेले रस्ते कमीत कमी २० वर्षे तरी चांगले राहतात. त्यांनी शोधून काढलेल्या या आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारने 2012 साली त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणारा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्याकडे पद्मश्री पुरस्कार असतो तसाच आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आता तुम्ही विचार कराल की एवढ्या मोठ्या माणसाची किंमत सोडाच पण आपण उपेक्षाच केली आहे. मग हा कशाला आपल्याला म्हणजे भारताला हे तंत्रज्ञान देईल असा विचार करणे सहाजिक आहे. मात्र डॉक्टर विजय जोशी यांनी याआधीच भारत सरकारला रस्तेबांधणीसाठी स्टीलपासून निर्माण होणारी मळी वापरायचा सल्ला दिला आहे. इतकच नाही पण काहीही मदत लागल्यास आपण तत्परतेने ही मदत निःशुल्क करू असंही त्यांनी सांगितलं आहे.
भारताचं दुर्देव एकाच आहे की आपल्या देशातील मूळचे भारतीय असणारे विद्वान लोक जगभरात इतकं सुंदर काम करत आहेत, ते आपल्याला मदत करायला सुद्धा तयार आहेत पण आपण त्याकडे फक्त दुर्लक्ष करतो. ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणतात त्याप्रमाणे केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर विजय जोशी यांच्या सल्ल्याने भारतात काही ठिकाणी काम सुरु केले आहे. जोशी यांच्या सल्ल्यानुसार देशातील काही महामार्गचे काम होणार असल्याचे मध्यंतरी वाचनात आले होते. आपण अशा करूया की लवकरच आपल्याला एका मराठमोळ्या माणसाच्या संकल्पनेतून साकारलेले आणि जगभरात ज्या तंत्रज्ञानाचे कौतुक झाले ते तंत्रज्ञान वापरून तयार केलेले चांगले आणि टिकाऊ रस्ते बघायला मिळोत.
डॉक्टर विजय जोशी ह्यांना त्यांच्या कामाबद्दल खूप शुभेच्छा