मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली असून एकूण २३६ प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी २ जागांचे आधीच झालेले आरक्षण तसेच ठेवून उर्वरित २१९ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. सोडतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी ६३ प्रभाग आरक्षित झाले. या आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.

महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी नव्याने प्रभाग सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिका क्षेत्रात ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील २३६ पैकी ६३ प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाले आहेत. तर त्यापैकी ३२ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर १५६ जागा खुल्या गटासाठी आहेत. त्यापैकी ७७ प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर एकूण ७९ प्रभाग खुले म्हणजेच सर्वसाधारण वर्गासाठी आहेत. ओबीसी आरक्षित जागा आणि महिला आरक्षित जागा यांची सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. 

हे आरक्षण निश्चित करताना पूर्णत: सोडत न काढता गेल्या तीन निवडणुकांमध्ये जे प्रभाग आरक्षित नव्हते त्यांची निवड करून त्यात ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेला भाजप आणि कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.