मुंबई : परदेशी निधीचे निर्गमन आणि जागतिक शेअर बाजारातील कमकुवत कलामुळे मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स ५१९ अंशांपेक्षा अधिक घसरला. सत्रांतर्गत सेन्सेक्सने ८४ हजार अंशांच्या पातळीला स्पर्श केला होता, मात्र त्या पातळीवर तो टिकाव धरू शकला नाही.
दिवसअखेर सेन्सेक्स ५१९.३४ अंशांनी म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी घसरून ८३,४५९.१५ पातळीवर स्थिरावला. सत्राच्या मध्याला त्याने ५६५.७२ अंश गमावत ८३,४१२.७७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी १६५.७० गमावून २५,५९७.६५ पातळीवर बंद झाला.
कमजोर जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांकडून समभागांची सपाटून विक्री, विशेषतः माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि वीज क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा झाला. अमेरिकेच्या रोखे उत्पन्नावरील वाढता परतावा दर आणि फेड दर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे, एफआयआयने सलग चौथ्या सत्रात विक्रीचा मारा सुरू ठेवला.
मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबूती दर्शविणारा, उत्पादन क्षेत्राचा पीएमआय आणि वाढलेले जीएसटी संकलन, कंपन्यांची सुधारलेली तिमाहीत कमाई यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना बळावल्या आहेत. गुंतवणूकदार ‘बाय ऑन डिप्स’ म्हणजेच पडझडीत खरेदीची रणनीती अवलंबत असल्याचे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, इटर्नल, टाटा मोटर्स, टाटा स्टील, मारुती आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग घसरणीस कारणीभूत ठरले. मात्र बाजार घसरणीस टायटन, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र आणि स्टेट बँकेची कामगिरी चमकदार राहिली.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,८८३.७८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) मागील व्यवहारात ३,५१६.३६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
