नवी दिल्लीः सरलेल्या नोव्हेंबरमध्ये आठ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीत ४.३ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आल्याचे मंगळवारी अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. वर्षापूर्वी याच महिन्यांत त्यामध्ये ७.९ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

मासिक आधारावर, पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनांतील वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या ३.७ टक्क्यांच्या तुलनेत काहीशी विस्तारली इतकाच या आकडेवारीने दिलेला दिलासा आहे. नोव्हेंबरमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन कमालीचे घटून नकारात्मक राहिले. तथापि, नोव्हेंबर महिन्यात सिमेंट उत्पादन १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बरोबरीने कोळसा, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद आणि वीज निर्मितीत अनुक्रमे ७.५ टक्के, २.९ टक्के, २ टक्के, ४.८ टक्के आणि ३.८ टक्के अशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाढीचे हे प्रमाण अनुक्रमे १०.९ टक्के, १२.४ टक्के, ३.३ टक्के, ९.७ टक्के आणि ५.८ टक्के असे होते.

हेही वाचा : आरटीजीएस, एनईएफटी व्यवहार आता अधिक सुरक्षित! पैसे पाठविताना लाभार्थ्याच्या नावाची पडताळणी एप्रिलपासून सक्तीची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांची वाढ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ४.२ टक्के होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत वाढीचे प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजेच ८.७ टक्के होते. देशाच्या कारखानीदारीचे आरोग्यमान मापणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थात आयआयपीमध्ये या आठ प्रमुख क्षेत्रांचे ४०.२७ टक्के योगदान आहे. त्यातील ही घसरण पाहता, नोव्हेंबरचे ‘आयआयपी’चे आकडेही निराशाजनक राहण्याचा अंदाज आहे.