मुंबई: वर्ष २०२१ मध्ये मोठ्या गाजावाजासह भांडवली बाजाराला धडकलेल्या नवतंत्रज्ञानाधारित उपक्रम असलेल्या पीबी फिनटेक (पॉलिसीबझार), वन ९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), कारट्रेड टेक, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर (नायका) आणि झोमॅटो या कंपन्यांना बाजारात अपेक्षित चमक दाखवता आलेली नाही. केवळ झोमॅटोचा अपवाद केल्यास, अन्य सर्वच समभागांना सूचिबद्धतेच्या दोन वर्षानंतरही गुंतवणूकदारांना आनंदाचे क्षण दाखवता आलेले नसून, ‘आयपीओ’ समयी ठरलेल्या किमतीपेक्षा (इश्यू प्राईस) कमी किमतीवर ते सध्या व्यवहार करताना दिसत आहेत.

घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोने प्रारंभिक समभाग विक्रीत पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी ७६ रुपये या प्रमाणे समभागांचे वाटप केले होते. मंगळवारचा समभागाचा बंद भाव ११३.८० रुपये आहे. म्हणजे ‘आयपीओ’ समयीच्या किमतीपेक्षा ४९ टक्क्यांनी तो वधारला आहे.

कारट्रेड टेकने देखील आयपीओच्या माध्यमातून प्रत्येकी १,६१८ रुपये किमतीला समभाग वितरित केले होती. सध्या हा समभाग त्या किमतीपेक्षा ५१ टक्क्यांच्या घसरणीसह ८०३.४० रुपयांवर व्यवहार करत आहे. ‘नायका’ने ‘आयपीओ’त सहभागी यशस्वी गुंतवणूकदारांना प्रत्येकी १८७ रुपये (बक्षीस समभाग जमेस धरून झालेली किंमत) किमतीला समभाग वितरित केला होता. हा समभाग सध्या १६९.३० रुपयांवर असून, भागधारकांना ९.२४ टक्क्यांचे नुकसान सोसावे लागत आहे.

‘पेटीएम’ला हजारांपुढील पातळी दुर्लभ

इतिहासातील तत्कालीन सर्वात मोठी समभाग विक्री ठरलेल्या डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक असलेल्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने पदार्पणातच गुंतवणूकदारांचे स्वप्नभंग केले होते. मोठ्या फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांची सूचिबद्धतेच्या दिवशी २७ टक्क्य़ांनी गडगडलेल्या समभागाने घोर निराशा केली होती. आयपीओच्या वेळी प्रत्येकी २,१५० रुपयांना हा समभाग गुंतवणूकदारांना वितरित करण्यात आला होता. मात्र त्यात घसरणकळा कायम असून सध्या तो ८८८.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. म्हणजे गुंतवणूक मूल्याच्या तुलनेत त्यात ५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याच श्रेणीमधील पीबी फिनटेकने ९८० रुपयांना समभाग आयपीओपश्चात गुंतवणूकदारांना वितरित केला होता. इश्यू किमतीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांच्या नकारात्मक परतावा दिसत असून मंगळवारचा त्याचा बंद भाव ८१९ रुपये आहे.

नवतंत्रज्ञानाधारित कंपन्या म्हणजे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानाधारित उद्योग म्हणजे ज्या उत्पादन वा सेवा क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी वा सेवा पुरवण्यासाठी ज्ञानाचा वापर केला जातो. तर ज्ञानाच्या उपयोगाने तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रगतिशील वापर करून व्यवसाय भरभराटीला आणला जातो आणि उद्योग-व्यवसायासाठी नवकल्पनांसह तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अशा कंपन्यांना नवतंत्रज्ञानाधारित कंपन्या संबोधले जाते.