मुंबई: इराण-इस्त्रायल युद्धात उडी घेत अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख आण्विक स्थळांवर बॉम्बहल्ला केल्याचे भीतीदायी पडसाद भांडवली बाजारात उमटले. वाढत्या युद्ध तणावाने गुंतवणूकदारांतील अस्वस्थताही वाढली असून, त्याचे प्रतिबिंब सेन्सेक्स-निफ्टीतील मोठ्या घसरणीतून सोमवारी दिसून आले.
जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या किमतीचा भडका तसेच माहिती-तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगातील समभागांमधील जोरदार विक्रीचा बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला. सोमवारी व्यवहारांतर्गत ९०० पेक्षा जास्त अंशांनी घसरलेला सेन्सेक्स, त्याच्या नीचांक पातळीवरून जवळपास ४०० अंशांची उसळी घेत सावरतानाही दिसला. तरी दिवसअखेरीस ५११.३८ अंशांचे (०.६२ टक्के) नुकसान सोसत तो ८१,८९६.७९ वर बंद झाला. सत्राच्या मध्याला ९३१.४१ अंश गमावत सेन्सेक्सने ८१,४७६.७६ चा तळ गाठला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १४०.५० अंशांनी (०.५६ टक्के) घसरून २४,९७१.९० वर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ९ समभाग वाढ साधू शकले. ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचा वधारलेल्या समभागांमध्ये समावेश होता. दुसरीकडे निफ्टीतील ५० पैकी १५ समभागांचे मूल्य वाढले. व्यापक बाजारात मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये मात्र चांगली खरेदी दिसून आली. परिणामी बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाने ०.५७ टक्के आणि मिडकॅप निर्देशांक ०.२० टक्के वाढीसह सकारात्मक बंद नोंदविला. मुंबई शेअर बाजारातील व्यवहारात २,२०४ समभाग घसरले, तर १,८५४ समभागांचे मूल्य वाढले.
सरलेल्या शुक्रवारी, इस्रायल-इराण संघर्षात सहभाग दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकत असल्याचे अमेरिकेने मुदत जाहीर केल्यानंतर, आखातातील युद्ध तणाव कमी होण्याची अपेक्षेने सप्ताहसांगतेच्या व्यवहारात बाजारात चैतन्य दिसून आले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुस्थळांवर अमेरिकेने बॉम्बहल्ला केला. त्यामुळे युद्ध तणाव निवळण्याच्या गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. तसेच, जर या चालू युद्धामुळे तेलाच्या किमती वेगाने वाढल्या तर आयात खर्चातील लक्षणीय वाढ आणि डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनात जलद घसरण याचा देशांतर्गत महागाईवर विपरित परिणाम दिसून येईल. जे बाजारातील अस्वस्थता आणखी वाढवणारे ठरेल, असा त्यांनी इशारा दिला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून सकारात्मक खरेदी
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या प्रवेशातून तणाव वाढल्याने सत्रारंभीच्या व्यापारात मोठी विक्री केली. असे असले तरी मागील चार सत्रांमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निरंतर खरेदीचा क्रम कायम आहे. चार सत्रांत मिळून १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या समभागांची त्यांनी खरेदी केली आहे. यावरून जागतिक स्तरावर अनिश्चितता असूनही भारताचे मूलभूत अर्थव्यवस्थेचे घटक हे मजबूत स्थितीत असून, परदेशी गुंतवणूकदारांसाठी ते आकर्षित करणारे ठरले आहेत, असे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ संशोधन उपाध्यक्ष प्रशांत तापसे म्हणाले.