वृत्तसंस्था, मुंबई
अनुभवी बाजार गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी भारतातील आघाडीचा बाजार मंच असलेल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) सेन्सेक्स निर्देशांक एका वर्षात १,००,००० अंशांच्या पातळीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे.

मार्क मोबियस यांच्यामते, दलाल स्ट्रीटवर अलिकडेच झालेली घसरण ही तात्पुरती घसरण आहे आणि भारतीय शेअर बाजार त्याच्या इतर आशियाई शेअर बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असून लवकरच गमावलेली स्थिती पुन्हा प्राप्त करेल. अर्थव्यवस्थेची गती कायम असल्याने बाजारात देखील लवकरच सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भारत नेहमीच उदयोन्मुख बाजारपेठांच्या यादीत अव्वल स्थानावर राहिला आहे. यामुळे एका वर्षात सेन्सेक्स १,००,००० पर्यंत जाईल, असे मार्क मोबियस यांनी एनडीटीव्ही प्रॉफिट या वृत्तससंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

२०२५ मध्ये सेन्सेक्सने आतापर्यंत केवळ ४.१ टक्के परतावा दिला आहे, तर एमएससीआय एशिया पॅसिफिक निर्देशांक २२ टक्के आणि एमएससीआय वर्ल्ड निर्देशांक १५ टक्क्यांनी वधारला आहे.

मार्क मोबियसच्या मते, भारतीय निर्देशांकातील वाढ बँकिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमुळे होईल, ज्यामध्ये खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतील. जागतिक उत्पादन आणि सेमीकंडक्टरशी जोडलेल्या देशांतर्गत हार्डवेअर कंपन्यांबद्दलही ते आशावादी आहेत. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार बनण्याच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल आणि भविष्यात गुंतवणूकदारांसाठी हे क्षेत्र अधिक महत्त्वाचे बनेल, असे मार्क यांनी सांगितले.

मार्क मोबियस म्हणाले की, भारताला अदानी समूहासारख्या अधिक पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची आवश्यकता आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने अदानी यांना आरोपमुक्त केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्यावरील केलेले आरोप फेटाळून लावल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्सच्या बाजारमूल्यात अवघ्या दोन सत्रांत सुमारे २० अब्ज डॉलरची भर पडली. अदानी समूहाची वाटचाल अशीच कायम राहील. भारत दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होत जाणार आहे. अदानी समूहा सारख्या कंपन्या या वाढीला चालना देतील, असे ते म्हणाले.

भारतीय शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अधिक पारदर्शकता आणत आहे आणि संस्थात्मक चौकट अधिक मजबूत करत आहे. नियामकांनी आता अधिक कॉर्पोरेट पारदर्शकता आणि खुलासे यावर जोर दिला पाहिजे.

एचएसबीसीचे म्हणणे काय?

भारतीय शेअर बाजारांनी एका वर्षाच्या खराब कामगिरीनंतर, पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामुळे सेन्सेक्सच्या विद्यमान वर्षात ९४,००० अंशांची पातळी गाठेल..बाजार आता आकर्षक दिसत आहे, असे एचएसबीसीने म्हटले आहे.

सप्टेंबर २०२४ च्या मध्यापासून भारतीय शेअर बाजाराने प्रचंड घसरण अनुभवली आहे, जी जगातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या भांडवली बाजारांमध्ये भारतीय बाजाराचा समावेश करते. एचएसबीसी विश्लेषक हेराल्ड व्हॅन डेर लिंडे यांच्या मते, वाईट काळ संपला असून मूल्यांकन आता चिंताजनक राहिलेले नाही. व्हॅन डेर लिंडे म्हणाले की, देशांतर्गत धोरणे विकासाच्या बाजूने अनुकूल झाली आहेत, कर कपातीमुळे वापराला उपभोगाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महागाई नियंत्रणात असून अर्थव्यवस्था वाढीला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सोप्या धोरणाचीही त्यांनी नोंद घेतली.

फेब्रुवारीमध्ये प्राप्तिकर कपात आणि जीएसटीमध्ये अलिकडेच केलेल्या सुधारणांसह अनेक उपाययोजना आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात, असे एचएसबीसीने म्हटले आहे.

अनिश्चित जागतिक परिस्थिती, ट्रम्प टॅरिफ आणि मंदावलेली देशांतर्गत वाढ यांचा फटका भारतीय बाजारपेठेला सहन करावा लागला आहे, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव आला आहे. त्याव्यतिरिक्त, मूल्यांकन ही एक चिंताजनक बाब आहे, विशेषतः कॉर्पोरेट अर्थात कंपन्यांची कामगिरी अजूनही अद्याप सुधारलेली नाही. मात्र परिस्थिती बदलत असल्याचे एचएसबीसीने म्हटले आहे.