मुंबई : बँकांनी चुकीच्या उत्पादनांची विक्री आणि ‘केवायसी’विना खाते उघडणे अशा अनिष्ट पद्धतींना आळा घालावा आणि त्यासाठी अंतर्गत प्रशासनाची चौकट भक्कम करावी, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी केले.

खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांच्या परिषदेनिमित्त केलेल्या बीजभाषणात दास म्हणाले की, बँकांकडून व्यवसायाच्या अयोग्य पद्धतींचा अवलंब अल्पकालीन फायद्यासाठी केला जातो. त्यातून बँकेला दीर्घकालीन जोखीम, प्रतिष्ठेला धक्का, नियामकांकडून तपासणी आणि वित्तीय दंड अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी बँकांनी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्सानपर भत्त्यांची रचना काळजीपूर्वक करावी. जेणेकरून त्यांना चुकीच्या पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात असून, बँकांपुढे संधींसोबतच धोके आणि आव्हानेही आहेत.

हेही वाचा : धास्तावलेल्या शेअर गुंतवणूकदारांना दिलासा; वर्षभरात २०-२५ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक बाजारात परतेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकिंग क्षेत्र भक्कम आणि स्थिर आहे. सर्व वित्तीय निकषांच्या पातळीवर सुधारणा दिसून येत आहे. यामागे बँकिंग क्षेत्रातील सर्व घटकांसोबत त्यांचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळाचे प्रयत्न आहेत. बँकिंग क्षेत्रासाठी हा चांगला काळ असल्याने आताच त्याची दमदार आणि शाश्वत वाढीसाठी पावले उचलायला हवीत, असेही दास यांनी नमूद केले.