मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि अमेरिकेच्या वाढीव आयात करासंबंधित अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले.
सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६३.५७ अंशांनी वधारून ८२,६३४.४८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८२,७८४.७५ अंशांचा उच्चांक आणि ८२,३४२.९४ च्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६.२५ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो २५,२१२.०५ पातळीवर बंद झाला.
महागाईमधील उतार, व्याजदरातील कपात, अनुकूल मान्सून आणि खनिज तेलाच्या किमतीतील घट यामुळे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक वातावरण आहे. सलग आठ महिन्यांत महागाईत घट झाल्याने बाजाराला चालना मिळाली आहे. मात्र, कंपन्यांच्या कमाईत त्या तुलनेत वाढ होणे आवश्यक असल्याने, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील कंपन्यांच्या मिळकतीच्या मूल्यांकनाबाबत गुंतवणूकदारांमध्ये आशावाद आणि सावधगिरीचे मिश्रण दिसून येत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या धोरण संभ्रमतेमुळे बाजारातील अनिश्चितता वाढली आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, स्टेट बँक, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स आणि आयटीसी या कंपन्यांच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली. तर सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या समभागांनी निराशा केली.
परदेशी निधीचा ओघ, बाजारातील अस्थिरता आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांना असलेल्या वाढत्या मागणीमुळे बुधवारच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक वाढीसह बंद झाले, असे लेमन मार्केट्स डेस्कचे विश्लेषक गौरव गर्ग म्हणाले.
सेन्सेक्स ८२,६३४.४८ ६३.५७ ( ०.०८%)
निफ्टी २५,२१२.०५ १६.२५ ( ०.०६%)
तेल ६८.५५ -०.२६ टक्के
डॉलर ८५.९४ १८ पैसे