Bombay Stock Exchange: मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात मोठी पडझड पाहायला मिळाली. देशभरातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष असलेल्या Sensex नं आज पहिल्याच सत्रात मोठी घसरण नोंदवली. BSE अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा काहीसं सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. पण काही वेळातच बाजारानं रंग बदलला आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आज सेन्सेक्स तब्बल १२००हून अधिक अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीनंही नेहमीप्रमाणे सेन्सेक्सचाच कित्ता गिरवत ४०० अंकांनी खालची पायरी गाठली!

सोमवारी सकाळच्या सत्राची सुरुवात होताच शेअर बाजारात काहीशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक व निफ्टीही काही अंकांनी वधारल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली. मात्र, त्यानंतर काही वेळातच Sensex व Nifty50 नं खालच्या दिशेनं प्रवास सुरू केला. दुसऱ्या सत्रात ही आणखीनच मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी सेन्सेक्स ७७८०० पर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीही ४०० अंकांनी कोसळून २३६११ पर्यंत आल्याचं दिसून आलं.

चीनमधील HMPV विषाणूचा परिणाम?

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारात दिसून आलेल्या नकारात्मक वातावरणासाठी चीनमध्ये फैलाव होत असलेला HMPV विषाणू कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. या फैलावामुळे भारतासह आशियाई शेअर बाजारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. या व्हायरसने प्रभावित झालेले तीन रुग्ण भारतात आढळले आहेत. मात्र. अद्याप यातील एकाही रुग्णाचा चीनमधील फैलावाशी संबंध नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिग्गजांना धक्के!

दरम्यान, आजच्या पडझडीमध्ये शेअर बाजारातील अनेक दिग्गज कंपन्यांना बसलेला फटका महत्त्वाचा भाग ठरला. त्यात टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, टाटा मोटर्स यांचा मोठा हिस्सा होता.

राज्यात HMPV चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई बाजारपेठांमध्येही साधारणपणे असंच वातावरण पाहायला मिळालं. जपानच्या निक्केई शेअर बाजारात १.५ टक्क्यांची घसरण दिसून आली. हाँगकाँगच्या हँगसेंग मार्केटमध्ये हीच टक्केवारी ०.३ टक्क्यांच्या घरात होती. शांघाय शेअर मार्केटमध्ये हे प्रमाण ०.२ टक्क्यांच्या घरात होतं.