मुंबई : खासगी बँकांतील अग्रणी एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीमुळे शुक्रवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३८७ अंशांनी घसरला. मात्र अदानी समूहातील समभागांच्या जोरावर निर्देशांकातील पडझड मर्यादित राहिली.
सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८७.७३ अंशांनी घसरून ८२,६२६.२३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५२८.०४ अंश गमावत ८२,४८५.९२ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९६.५५ अंशांची घसरण झाली आणि तो २५,३२७.०५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे सत्र सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्यातून सेन्सेक्सने ८३ हजारांपुढे मजल मारली. अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमधील सकारात्मक घडामोडी आणि सुधारित जागतिक तरलता परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. देशांतर्गत आघाडीवरील उत्साह आणि अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, परदेशी गुंतवणूकदार पुन्हा देशांतर्गत भांडवली बाजारात परतण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी सरकारी बँका, धातू आणि औषधी निर्माण क्षेत्रातील समभागांनी आघाडी कायम ठेवली आहे, त्या उलट माहिती-तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू आणि खासगी बँकांच्या समभागात नफावसुलीमुळे घसरण झाली, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टायटन, ट्रेंट, कोटक महिंद्र बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्र अँड महिंद्र आणि एचडीएफसी बँक या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. तर अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, स्टेट बँक, एनटीपीसी आणि सन फार्माच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली.
‘अदानीं’चे समभाग तेजीत
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने हिंडेनबर्ग प्रकरणी तपासाअंती अदानी समूहाला निर्दोषत्व बहाल करत, कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा निर्वाळा दिला. याचा परिणाम म्हणून अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्ससह अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे समभाग जवळपास १३ टक्क्यांपर्यंत वधारले.