मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के आयात कर लादण्याची आणि रशियन खनिज तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल दंडाची घोषणा केल्याचे गुरुवारी भांडवली बाजारात अपेक्षेप्रमाणे नकारात्मक पडसाद उमटले. तरी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीतील घसरणीची मात्रा थोडकीच राहिली.
सलग दोन सत्रातील आगेकूच थांबून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६.२८ अंशांनी घसरून ८१,१८५.५८ पातळीवर गुरुवारी दिवसअखेर स्थिरावला. सकाळच्या सत्रात मात्र त्याने ७८६.७१ अंश गमावत, ८०,६९५.१५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र मध्यान्हानंतर सेन्सेक्स सावरताना दिसला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८६.७० अंशांनी घसरून २४,७६८.३५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकेने अलिकडच्या काळात जपान, ब्रिटन आणि युरोपीय महासंघासारख्या प्रमुख भागीदारांशी अनुकूल व्यापार करार केले आहेत. आता अमेरिकेने केलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी भारतावर दबाव आणण्याची युक्ती म्हणून वाढीव शुल्काच्या घोषणेकडे बघितले जात आहे. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी केल्यामुळे अमेरिकेने दंड जाहीर केला आहे. रशियाशी व्यापारामुळे दंड आकारला गेलेला भारत हा पहिला देश आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स यांना सर्वाधिक फटका बसला. तर आयटीसी, कोटक महिंद्र बँक आणि पॉवर ग्रिड यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले.
सेन्सेक्स ८१,१८५.५८ – २९६.२८ (-०.३६%)
निफ्टी २४,७६८.३५ – ८६.७० (-०.३५%)
तेल ७२.७० -०.७४ टक्के
डॉलर ८७.५८ -२२ पैसे