iPhone Production in India, Foxconn Manufacturing: भारतात आयफोन आणि ॲपल कंपनीची इतर उपकरणे उत्पादित करण्यासाठी ॲपल उत्सुक आहे. ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी भारतात उत्पादन वाढविण्याचा मानस व्यक्त केला होता. यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला बळ मिळत असतानाच आता याला ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतात आयफोनची निर्मिती तैवानी कंपनी फॉक्सकॉनकडून करण्यात येते. या कंपनीत प्रमुख पदावर अनेक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञ काम करत होते. मात्र गेल्या काही महिन्यात फॉक्सकॉनने शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती केली असून त्यांना चीनमध्ये जाण्यास भाग पाडले आहे.
भारतातील फॉक्सकॉनच्या कारखान्यांमध्ये लवकरच आयफोन १७ या मॉडेलचे उत्पादन घेतले जाणार होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यात हे मॉडेल बाजारात येईल, असे ॲपलने जाहीर केले होते. मात्र फॉक्सकॉनमधील चिनी कर्मचारी परतल्यामुळे आता उत्पादनाचा वेग मंदाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फॉक्सकॉनकडून चिनी अभियंत्यांची गच्छंती
ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही महिन्यात फॉक्सकॉनने ३०० चिनी कर्मचाऱ्यांना भारत सोडण्यास सांगितले. दोन महिन्यांपूर्वी हे आदेश देण्यात आले होते. भारत सरकारलाही याची कल्पना देण्यात आली, मात्र निर्णयामागचे कारण सांगितले गेले नाही.
चिनी कर्मचाऱ्यांऐवजी आता तैवान आणि व्हिएतनामचे कर्मचारी आणले जात आहेत. दरम्यान आयफोनची निर्मिती करणाऱ्या चिनी भाषेतील यंत्र आणि सॉफ्टवेअरला इंग्रजी भाषेत भाषांतरीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून भारतीय अभियंते आणि इतर इंग्रजी भाषा जाणणारे कर्मचारी त्यावर काम करू शकतील.
फॉक्सकॉनला बदलेली यंत्रसामुग्री काही महिन्यात मिळेल, असेही ब्लुमबर्गच्या बातमीत म्हटले आहे.
चीनचे अभियंते आणि तंत्रज्ञ परत गेल्यामुळे आयफोनच्या उत्पादनाचा वेग मंदावणार असल्याचे सांगितले जाते. चीनचे अभियंते फक्त उत्पादनातच नाही तर भारतीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचेही काम करत होते. चीनच्या कुशल मनुष्यबळावर अवलंबून राहिल्यामुळे उत्पादन शुल्कातही भरमसाठ वाढ होत असल्याची माहिती ब्लुमबर्गच्या बातमीत देण्यात आली आहे.
उत्पादन रोखण्याचा चीनचा प्रयत्न?
फॉक्सनने मनुष्यबळ कपात करण्यामागे चीनचा हात असल्याचे म्हटले जाते. चीनने आपल्या देशातील तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ बाहेरील देशात जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून या वर्षीच्या सुरुवातीला भारतासाह आग्नेय आशियातील देशांत तंत्रज्ञान जाऊ नये, यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले होते.
याशिवाय चिनी अभियंते भारतातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली होती. चीनमधून तंत्रज्ञ, तंत्रज्ञान आणि उत्पादन करण्यासाठी लागणारी उपकरणे बाहेर जाऊ नयेत, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते.
सीएनएन-न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, भारत जगातील उत्पादन केंद्र बनण्याच्या दृष्टीने पाऊले टाकत असताना हे उद्दिष्ट फॉक्सकॉनपुरते रोखण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. आयफोनच्या पुरवठा साखळीत खंड पडल्यास जागतिक स्तरावर याचा परिणाम होऊ शकतो, असे दिसत आहे.
भारताने काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बिझनेस स्टँडर्डशी याविषयावर बोलताना सांगितले, “आम्हाला यात कोणतीही अडचण दिसत नाही. फॉक्सकॉनमध्ये चीन, तैवान, अमेरिकेतून तंत्रज्ञ येत असतात. भारतात पुरेसे मनुष्यबळ आहे. तसेच भारतातील स्थानिक कंपन्यांनी उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रांची निर्मिती सुरू केली आहे. सध्या तरी फार फार तर महिनाभर उत्पादन थांबेल, एवढेच आता सांगू शकतो.”