संशोधनाची नव्हे तर परीक्षेचे केंद्र झालेल्या विद्यापीठांना बाराही महिने परीक्षा घेणे आणि त्याचे निकाल लावणे या भट्टीतून जावे लागते. ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे उन्हाळी-हिवाळी परीक्षा सुरूच असतात. त्यातून होणारी दमछाक, आरोप-प्रत्यारोप आणि मानसिक ताणातून हा थँकलेस जॉब असल्याचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केव्हाच कळून चुकले आहे. हा कोंडमारा करणारी परीक्षा पद्धत बदलून त्याऐवजी ६० गुणांची लेखी परीक्षा आणि ४० गुण महाविद्यालयांमार्फत दिले जावेत, असा नवीन पॅटर्न विद्यापीठाचा परीक्षा विभाग २०१६-१७ पासून राबवू पाहत आहे. त्याचे सुतोवाच वेगवेगळ्या व्यासपीठावरून कुलगुरू, प्रकुलगुरू आणि विद्यापीठातील इतरही अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. मात्र, ६०:४०चा पॅटर्न विद्यापीठाची गुणवत्ता रसातळाला नेईल, ‘लिब्रल मार्कस्’ दिले जातील, असा संताप, उद्वेग आणि भीतीही याच क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत असल्यानेच हा पॅटर्न तूर्त राबवला जाणार नसल्याचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ६०:४० हे नवीन सूत्र परीक्षा विभागात सुरू करू पाहत आहे. इतर विद्यापीठांचे अनुकरण करण्यापेक्षा पारंपरिक पद्धत मोडीत काढून नवीन सुधारणांना का वाव देऊ नये, हा विद्यापीठाचा हेतू निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळेच ६० टक्के वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्याय प्रश्नांवरील परीक्षेची जबाबदारी विद्यापीठ उचलणार तर ४० टक्के परीक्षेचा भार त्या त्या महाविद्यालयांवर टाकून ६०:४०चा पॅटर्न विद्यापीठ राबवणार असल्याच्या चर्चेने बराच जोर धरला होता. त्यातून विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी होईल. विद्यार्थ्यांला काही तासांच्या आत त्याची उत्तरपत्रिका व त्याला मिळालेले गुण पाहता येतील, मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाला गती मिळाल्याने परीक्षा पद्धतीत सुधारणा होईल, अशी कारणे सांगितली जात आहेत. मात्र, विद्यापीठाच्या याच भूमिकेवर माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र क्षीरसागर, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे आणि इतरही प्राचार्य व प्राध्यापकांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत.

एव्हाना विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना चांगलाच बसला असून माजी प्रकुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी रूळावर आणलेला परीक्षा विभाग पुन्हा रूळावरून घसरू लागला आहे. त्यातच ६०:४०च्या परीक्षा पॅटर्नवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचाच विरोध होत असून परीक्षा विभाग हाताबाहेर गेल्यानेच अशा प्रकारचा पॅटर्न राबवण्याची शक्कल विद्यापीठ लढवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वर्षांनुवर्षे एकाच विभागात असणारे कर्मचारीही विद्यापीठासाठी डोकेदुखी ठरत आहेत. काम न करणे, वेळ घालवणे किंवा चुकीची कामे करणारे कर्मचारी विद्यापीठ प्रशासनाला डोईजड झाले आहेत. त्याचा फटका विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला बसत असल्याचेही बोलले जात आहे. विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतानाही ते अनुपस्थित दाखवणे, हॉल तिकिटवर एक आणि परीक्षा केंद्रावर भलताच क्रमांक असणे, ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलणे याचा जबर फटका विद्यार्थी सहन करीत आहेत. विद्यापीठाचा परीक्षा विभाग म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका सर्वच स्तरावरून होत आहे आणि ही हाताबाहेर गेलेली परीक्षा पद्धत पाहूनच ६०:४० हा पॅटर्न विद्यापीठात राबवण्याची शक्कल विद्यापीठातील अधिकारी लढवत असल्याची उपरोधिक टीका विद्यापीठाशी संबंधित मंडळींनी केली आहे.

अडचणीतून मार्ग काढण्यापेक्षा त्यातून पळ काढण्यासाठीच विद्यापीठ ६०:४० हा पॅटर्न परीक्षेत राबवू पाहत असल्याचा थेट आरोप डॉ. खडक्कार यांचा आहे. एखाद्या विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमातील विषय समजला किंवा नाही समजला किंवा त्याची त्यातील प्रगती किती हे या बहुपर्यायी प्रश्नांवरून कसे समजणार? आधीची ८० गुणांची विद्यापीठाची लेखी परीक्षा आणि असेसमेंटच्या नावाखाली महाविद्यालयांतून मिळणारे २० गुण यात विद्यार्थी ढ जरी असला तरी सढळ हाताने पैकीच्या पैकी गुण दिले जायचे. त्यातच ४० गुण महाविद्यालयांच्या हाती देणे म्हणजे मुलांना गुणांची अक्षरश: खैरात वाटली जाईल. शिवाय अशी जर परीक्षा पद्धत राबवली तर कंपन्या ‘नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज करू नयेत’, अशी तळटीप जाहिरातीखाली देतील, अशी टीका डॉ. खडक्कार आणि डॉ. क्षीरसागर यांनी केली आहे. अनेक कंपन्या अशा प्रकारचा पॅटर्नच अमान्य करीत आहेत.

दुसरे म्हणजे ६०:४०च्या पॅटर्नमध्ये प्रश्नपेढी तयार करून त्यातून वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील आणि त्यावरच स्पर्धा परीक्षांसारखे प्रश्न विचारून गुण दिले जातील. ही पद्धत सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तसेच बेसिक सायन्सेससाठी निरुपयोगी आहे. इतर कोणतेही अभ्यासक्रम हे वस्तुनिष्ठ स्वरूपात कसे शिकवायचे, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थी केवळ उत्तरे पाठ करतील पण त्यातून त्यांना विषय समजेलच याची शाश्वती देता येणार नाही. विद्यार्थी वरवर अभ्यास करून विषयाच्या मुळाशी जाणारही नाहीत. केवळ परीक्षेपुरताच अभ्यास करतील. महाविद्यालयांच्या मानसिकतेवर अनेक प्राचार्य व प्राध्यापकांचा विश्वास नाही. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्षांत ढकलण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून लोकप्रिय होण्यासाठी अनेक महाविद्यालये आणि स्वायत्त संस्थाही गुणांची खैरात वाटतात. त्यामुळे भविष्यात ६०:४०चा पॅटर्नखाली महाविद्यालये ‘लिब्रल मार्किंग’ न घाबरता करतील. असली नसली तेवढी गुणवत्ता जाईल, म्हणूनच हा पॅटर्न नकोच, असे बहुतेकांचे म्हणणे आहे.

तूर्त विद्यापीठानेही ६०:४०चा पॅटर्न न राबवण्यावर भर दिला आहे. मात्र, त्याचवेळी अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. या विषयावर आणखी चर्चा, कायदेशीर बाजू तपासता येईल, प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ‘वॉर पुटिंग’वर हा विषय घेतला होता, पण होणारा विरोध लक्षात घेऊन पुढील वर्षीपासूनच हा पॅटर्न राबवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. कारण कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. प्रत्येक जण विद्यापीठाकडे बोल दाखवत आहे. महविद्यालयांनी विद्यापीठाच्या बरोबरीने जबाबदारी स्वीकारायला हवी. सर्व फॅकल्टीला २०१६-१७पासून हा लागू करायचा होता. पण विरोध होतो आहे.

बाकी विद्यापीठांमध्ये पॅटर्न नसला म्हणून आपण ट्रेंड सेट करू नये, बदल स्वीकारला पाहिजे. फार्मसीचा सिलॅबस पार्लमेंटमध्ये जातो. फार्मसी रेग्युलेशन असे म्हणतो. अखिल भारतीय स्तरावर याचा सामाईक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे फार्मसीला ६०:४०मधून वगळले होते, पण सध्या तरी हा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे.