|| फारुक नाईकवाडे

गट ब आणि गट क यांच्या पूर्वपरीक्षेसाठी अर्थव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम एकसारखाच आहे. पण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिल्यास काठिण्यपातळी व प्रश्नांचा फोकस यांमध्ये अंतर असलेले दिसते. त्यामुळे एकाच पद्धतीने अभ्यास करून भागण्यासारखे नाही हे लक्षात घ्यावे लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अर्थव्यवस्था घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण व त्यावर चर्चा यापूर्वीच करण्यात आली आहे. या लेखामध्ये या घटकाच्या गट क सेवा परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण आदी घटक समाविष्ट करण्यात अले आहेत. या उपघटकांची तयारी करताना गट के सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.

  • राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे. या बाबींवर दुय्यम सेवांपेक्षा गट क सेवा परीक्षेत संकल्पनात्मक प्रश्न जास्त अपेक्षित आहेत.
  • चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्‍‌र्ह बँक, तिचे अधिकार, काय्रे, विविध दर यांचा आढावा घ्यावा. बँकिंगविषयक संकल्पना व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात.
  • बँकिंगविषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.
  • अर्थसंकल्पाशी संबंधित संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. महसुली / राजकोषीय/अंदाजपत्रकीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी समजून घेणे आवश्यक आहे. गट बपेक्षा गट क सेवा परीक्षेमध्ये यावर संकल्पनात्मक प्रश्न जास्त विचारले गेले आहेत.
  • दारिद्रय अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी व दारिद्रयविषयक निर्देशांक माहीत असायला हवेत.
  • रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी माहीत असायला हवी.
  • पंचवार्षकि तसेच इतर योजनात दारिद्रय निर्मूलनासाठी तसेच रोजगारनिर्मिती व स्वयंरोजगाराबाबबतच्या महत्त्वाच्या योजना व त्याची उद्दिष्टय़े यांचा आढावा घ्यावा. याबाबत विश्लेषण किंवा मूल्यमापन पाहण्याची आवश्यकता नाही.
  • शेती क्षेत्रातील प्रमुख पिके आणि त्यांचे उत्पादक राज्ये / जिल्हे माहीत असावेत. त्याबाबत हवामान व मृदा घटकांचा विचार भूगोलामध्ये केलेला आहे, त्याचा इथे संदर्भ घ्यावा. उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजनांचा आढावा घ्यावा.
  • पंचवार्षकि योजनांमध्ये उद्दिष्ट, ध्येयवाक्य, महत्त्वाच्या योजना व प्रकल्प आणि त्यांचे प्रतिमान यांचा आढावा घ्यावा. त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.
  • महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
  • सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून राज्याची एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांचा टेबल फॉर्मेटमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.
  • या टेबलमध्ये सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली राज्ये, महाराष्ट्रातील जिल्हे यांचाही समावेश टेबलमध्ये करावा.
  • वरील सर्व मुद्दयांचा सन २०११ व सन २००१मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारा टेबल करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.
  • राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टय़े, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टय़े, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.
  • अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.
  • महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.
  • लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व काय्रे समजून घ्यावीत.
  • लेखापरीक्षणविषयक महत्त्वाच्या संकल्पना, संस्था व त्यांची रचना, काय्रे, अधिकार व संबंधित कायद्यांमधील ठळक तरतुदी माहीत असाव्यात.
  • व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे माहीत असावेत.