20 September 2020

News Flash

प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील संधी

मुद्रण तंत्रज्ञानात मोठे बदल होत असून या क्षेत्रात नवनव्या कामाच्या संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रातील कामाचे स्वरूप आणि संधींविषयी..

| June 16, 2014 01:08 am

मुद्रण तंत्रज्ञानात मोठे बदल होत असून या क्षेत्रात नवनव्या कामाच्या संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रातील कामाचे स्वरूप आणि संधींविषयी..        
जगातील प्रामुख्याने दोन उद्योगक्षेत्रांत तंत्र आणि तंत्रज्ञानाद्वारे तसेच इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून अत्यंत जलद बदल होत गेले आणि हे बदल ते या उद्योगक्षेत्रांनी आत्मसातही केले. या उद्योगक्षेत्रांपैकी एक म्हणजे  मुद्रण आणि ग्राफिक रिप्रॉडक्शन क्षेत्र होय.
मुद्रण क्षेत्रात गेल्या ५० वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. मुद्रणातील कामासंबंधी लागणाऱ्या नव्या मनुष्यबळाचा आणि कामाच्या प्रक्रियेचा आढावा घेऊयात.
ग्राफिक डिझायनर : एखादे पुस्तक, ब्रॉशर, प्रॉडक्ट लिफलेट, पोस्टर छपाई करणे असल्यास प्रथम हे काम एका ग्राफिक डिझायनरकडे सुपूर्द केले जाते. हा डिझायनर संगणकाच्या साहाय्याने त्या कामाचे रफ व्हिज्युअल तयार करतो. हे रफ डिझाइन कस्टमरने ओके दिल्यावर प्रिप्रेससाठी पुढे दिले जाते. ग्राफिक डिझायनर हा कमर्शिअल आर्टिस्ट असतो. टाइप सिलेक्शन, कलरसेन्स, लेआऊट व सर्वसाधारण माणसापेक्षा त्याला सेन्स ऑफ प्रपोर्शन जास्त असतो. ग्राफिक डिझायनरला कोरल ड्रॉ, इन डिझाइन, इलस्ट्रेटर, स्कॅनिंग आदी सॉफ्टवेअर वापरण्याचा अनुभव असावा लागतो. तो स्वतंत्रपणे आपला व्यवसाय करतो वा एखाद्या पब्लिशिंग हाऊसमध्ये जॉब करतो. जाणकार ग्राफिक डिझायनर चांगले पैसे कमवू शकतो. त्याला छपाईमधील सर्व टप्पे, पेपर साइज, बायंडिंग या सर्व बाबीत ज्ञान असल्यास उत्तमच.
प्रोग्रॅमर : प्रोग्रॅमर हा मुद्रण उद्योगातील एक महत्त्वाचा घटक गणला गेला आहे. प्रामुख्याने छपाई उद्योगात तीन विभागात कामे होतात. एक आहे प्रीप्रेस त्यामध्ये डिझाइन ते प्लेट तयार होईपर्यंतच्या कामाचा समावेश होतो. प्रोग्रॅमरला संगणकाच्या कामाची माहिती तर असतेच, पण त्याचबरोबर छपाईतील टप्प्यांचे सखोल ज्ञान असावे लागते. इलेक्ट्रॉनिकचे बेसिक ज्ञान आवश्यक आहे. छपाईतील सर्व अत्याधुनिक मशिन्स, इक्विपमेंटस ही प्रोग्रॅमद्वारे चालविली जात असल्यामुळे त्यातील दर्जा व सातत्य प्रणालीमुळे प्रत्येक वेळी उत्पादनात सातत्याने दर्जा राखला जातो. व्हेरिएशन कंट्रोल केले जाते, वेस्टेजवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. युवावर्गाला या विभागात काम करण्यात अधिक स्वारस्य आहे, असे आढळून आले आहे.
उत्पादन व्यवस्थापक – मुद्रण उद्योग – तंत्रज्ञानामधील पदविका अथवा पदवी संपादन केल्यानंतर काही वर्षांच्या अनुभवानंतर गाठीशी हे पद मिळू शकते. यानंतर व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यास न्यूजपेपर इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्शन इनचार्ज आणि नंतर प्रॉडक्शन मॅनेजर अशा पदावर काम करण्याची संधी मिळू शकते.
व्यापार व्यवस्थापक : उत्पादन, उत्पादकता, उलाढाल, नफा, व्यापार विकास या सूत्रांची सखोल माहिती घेतल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अहवाल देण्याची जबाबदारी या व्यक्तीकडे येते. व्यवसायाचा कल, व्यवसायात होणारे तांत्रिक बदल व उत्पादन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. या बदलांबाबत चौकस असणाऱ्या व्यक्तीला पुढील काम करण्याची संधी मिळू शकते. मोठय़ा साइजच्या प्रिंटिंग युनिटमध्ये ही पदे निर्माण होत असतात.
दर्जा नियंत्रक : छपाईच्या उत्पादनामध्ये दर्जा राखण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जा व गुणवत्ता तपासून पाहण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक असते. त्याकरिता मनुष्यबळाला तसे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. दर्जा नियंत्रक ही एक महत्त्वाची कार्यप्रणाली छपाई उद्योगात राबवली जात आहे. याविषयीची विश्लेषक वृत्ती असलेल्या व्यक्तीची कामाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर या कामासाठी निवड होऊ शकते.
विपणन व्यवस्थापक : छपाईच्या व्यवसायात सतत कामाच्या ऑर्डर मिळवणे आवश्यक ठरते. त्याकरिता विपणन विभाग हे काम करत असतो. ग्राहकांना वेळेत तसेच दर्जेदार काम करून देणे ही सर्व जबाबदारी विपणन व्यवस्थापकाच्या अखत्यारीतील असते. बाजारपेठेचा सातत्याने अभ्यास करणे, सामग्रीचा दर्जा राखणे, उत्पादनाची किंमत ठरवणे आणि या सगळ्या गोष्टींचा मेळ घालणे यात विपणनाचे कौशल्य असते.  
संशोधक : या विभागात कागद व शाई हा कच्चा माल वापरला जातो. प्रीप्रेस व प्रिंटिंग मशीनवर या दोन मुख्य साहित्याव्यतिरिक्त कित्येक रसायने वापरावी लागतात. जसजसा इलेक्ट्रॉनिकचा वापर छपाई उद्योगात जास्त होऊ लागला तसतसा रसायनांचा वापर कमी होऊन प्रत्येक ऑपरेशन ग्रीन, यूजर फ्रेंडली व पर्यावरणप्रेमी करण्यात छपाईतील शास्त्रज्ञांनी आघाडी घेतली. मुद्रणाच्या प्रत्येक टप्प्यावरील तंत्रात विजेची बचत, कागदाचा वापर – पुनर्वापर, कमी वापर या प्रणालीचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल याचे संशोधन सुरू आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
वाणिज्य शाखा : गणित, हिशेब, वाणिज्य याकडे कल असलेल्यांना मुद्रण क्षेत्रात कॉस्ट अ‍ॅनालिस्ट, इस्टिमेटर, अकाऊंट मॅनेजर होता येईल. कामाचा अंदाजे खर्च, कोटेशन देणे हे व्यवसायातील महत्त्वाचे काम असते. त्याला छपाईमधील कच्च्या सामग्रीचे दर, प्रत्येक टप्प्याच्या कामावरील मशिनरीचे ताशी दर, कामाचे दर याचे विश्लेषण करून ऑपरेशन कॉस्ट ठरवावी लागते. त्यावरून कामाचा खर्च काढता येते. स्पर्धात्मक दर ही एक कसरत करण्याजोगी कला अवगत करून घ्यावी लागते.
वर नमूद केलेल्या करिअर व्यतिरिक्त मध्यम व्यवस्थापन, संघ नेतृत्त्व आणि पर्यवेक्षक या श्रेणीमधील अनेक संधी या छपाई व्यवसायात उपलब्ध आहेत.
मुद्रण क्षेत्राचा विस्तार हा प्रामुख्याने  व्यावसायिक मुद्रण क्षेत्र, पॅकेजिंग, वर्तमानपत्रांचे मुद्रण आणि फ्लेक्सिबल पॅकेजिंग व कन्व्हर्टिग क्षेत्र अशा चार विभागांत मांडला जातो.  या व्यतिरिक्त ग्रेव्हुयर प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग शिवाय कॉस्मेटिक ट्रेडमध्ये, मॅट, स्पॉट, थर्मल हे लॅमिनेशनचे प्रकार, छपाईची गुणवत्ता आणि दर्जा उंचावणारे व्यवसाय लक्ष वेधून घेतात.  यामुळे प्रिंटेड प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू अ‍ॅडिशन होते.
छपाईच्या कामात प्रामुख्याने खालील टप्पे येतात –
अ) छपाईपूर्वीच्या सर्व बाबी.
ब) प्रत्यक्ष छपाई.
क) छपाईनंतरचे- फॅब्रिकेशन, बायंडिंग, फिनिशिंगचे काम.
व्होकेशनल प्रशिक्षण, मुद्रण तंत्रातील पदविका, मुद्रणातील पदवी तसेच अल्पकालीन अभ्यासक्रम हे मुद्रण व्यवसायात उपलब्ध आहेत. ‘शिकता शिकता कमवा’ ही योजनाही टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेअंतर्गत पनवेलच्या महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च येथे उपलब्ध आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मुद्रणाचे अल्पकालीन ते अद्ययावत मुद्रणासंबंधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. काही महाविद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
० महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी व रिसर्च पनवेल प्लॉट नं. ३, सेक्टर-११, खांदा कॉलनी, बालभारती रोड, नवीन पनवेल- ४१०२०६  principal@mmpiptr.com
० गव्हर्न्मेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
डी. एन. रोड, मुंबई-४००००१.
० एमआयपीटी, पुणे.
० धीरूभाई इन्स्टिटय़ूट, ठाणे.
० ग्राफिक आर्टस् टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड एज्युकेशन, मुंबई.
० इंगोले इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटींग, आयपीटी, नागपूर.
० जीआयपीटी, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:08 am

Web Title: career opportunities in printing technology
Next Stories
1 नेत्रतंत्रज्ञ व्हायचंय?
2 एकांडय़ा शिलेदाराचा वस्तुपाठ
3 शैक्षणिक तंत्रविज्ञानात एम.ए.
Just Now!
X