News Flash

सी.ए. होताना..

सी.ए. चे शिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आणखीही काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक ठरते.

| September 16, 2013 07:59 am

सी.ए. चे शिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आणखीही काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक ठरते. त्यासंबंधीचे मार्गदर्शन –
काही दिवसांपूर्वीच सी.ए. फायनल परीक्षेचा निकाल लागला. हा निकाल १० टक्क्य़ांच्या आसपास होता. सीए परीक्षेचे जुने निकाल बघितले तर हा निकाल चांगलाच म्हणावा लागेल. कारण अगदी आताआतापर्यंत सी.ए. परीक्षेचे निकाल हे साधारणपणे ३-४ टक्क्य़ांच्या घरात असायचे. दोनआकडी निकाल क्वचितच लागले असतील.
विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या उद्देशाने सी.ए. परीक्षेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जुने सी.ए. त्या वेळच्या परीक्षेत टॉपर्स म्हणून आले आहेत ते सांगतात की, आत्ताच्या सी.ए. परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यास ते कधीच पास होणार नाहीत. गेल्या वर्षीच्या नोव्हें. २०१२ च्या सी.ए. फायनल परीक्षेत प्रेमा जयकुमार नावाची एका ऑटो रिक्षावाल्याची मुलगी पहिली आली. प्रेमाने अनेक मुलाखतीत हेच सांगितले की, नाउमेद न होता सहनशीलता राखा. तसेच सर्व प्रयत्न चिकाटी व नेटाने करा. हल्ली बारावी शिकलेल्या बऱ्याच मुलांनी सीपीटीनंतरची परीक्षा पास होऊन सी.ए.कडे शिकाऊ उमेदवारी सुरू केली आहे. या शिकाऊ उमेदवारांना कॉलेजचा अभ्यास, सी.ए.चा अभ्यास, सी.ए.कडील आठ तासांची डय़ुटी, कॉलेज, संगणक अभ्यास, शिवाय बी.कॉम.चे क्लासेस असे बरेच काही करावे लागणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ जाणार आहे तो वेगळाच. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा ताण पडून ते शारीरिक व मानसिक अशा दोन्ही बाबतींत थकलेले असतील. तर जे विद्यार्थी बी.कॉम. पूर्ण करून सी.ए. अभ्यासक्रम करणार आहेत त्यांना हा अभ्यासक्रम नक्कीच काही प्रमाणात सोपा जाणार आहे. हा लेख खासकरून शिकाऊ सी.ए. उमेदवारांसाठीच आहे.
सर्वप्रथम या शिकाऊ विद्यार्थ्यांच्या नजरेस एक बाब स्पष्टपणे आणावीशी वाटते की, हा अभ्यासक्रम सुरू करताना काहीही झाले तरी हा अभ्यासक्रम मी पुरा करणारच, अशा प्रतिज्ञेने या. हा एकच अभ्यासक्रम असा आहे की, त्यासाठी लक्षावधी रुपयांचे शुल्क भरावे लागत नाही तर काही हजारांतच भागते. मानधन कमी मिळते हे मान्य, पण एकदा हा विद्यार्थी सी.ए. झाला की नंतर व्यवसायात उत्तम पैसा मिळवू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना जे वास्तव आहे ते मान्य कराच. फाजील आत्मविश्वासात वावरणे धोकादायक ठरू शकते. कारण या परीक्षेचा अभ्यास करताना बोर्डात गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थीही घायकुतीला होतात. ऑडिटला गेल्यावर मी म्हणजे कोण, असे भासवण्यात अथवा बढाया मारण्यात काहीच हशील नाही. त्यापेक्षा लो प्रोफाइल राहून प्रामाणिकपणे काम करणे उत्तम.
पालकांनीही सी.ए. करणाऱ्या मुलाच्या अभ्यासाबाबत  अतिसंवेदनशीलता दाखवू नये. वारंवार त्याच्या अभ्यासाबाबत चौकशी करू नये. त्याला शांततेत, विनाअडथळ्याशिवाय अभ्यास करणे सोपे जावे, याकरिता जमेल तितके सहाय्य करावे. खास करून निकाल नकारार्थी लागला तर मुलांना घालूनपाडून बोलू नये वा पुन्हा अभ्यास वा परीक्षा द्यायला उत्तेजन द्यावे.
सी.ए. निकालाचे प्रमाण फारच अल्प असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थीच निकालाबाबत साशंक असतो. तरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा गोष्टी सकारात्मकदृष्टय़ा पाहिल्या व अभ्यासाच्या नजरेतून काय उपयोगी आहे, याचा विचार केल्यास या मुलांना नक्कीच यश मिळवता येईल.
त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ज्या सी.ए.कडे काम भरपूर आहे, शिवाय जिथे आपल्याला निरनिराळ्या कायद्यांचे शिक्षण मिळू शकते आणि जो सी.ए.  मनमोकळेपणे शिकविणारा आहे, असाच सी.ए. गाठावा. त्यासाठी आधी त्या सी.ए.ची माहिती मिळवावी.
शिकाऊ विद्यार्थ्यांनी प्रथम एक बाब लक्षात ठेवावी की, सर्वप्रथम स्थानिक सी.ए.ला प्राधान्य द्यावे. याचे कारण रोजचे प्रवासाचे तीन-चार तास वाचतात. हाच वाचणारा वेळ अभ्यासासाठी उपयोगात आणता येतो. या गोष्टी अभ्यासक्रम सुरू असताना फारच महत्त्वाच्या ठरतात.
मात्र, अनुभव असा येतो की शिकाऊ मुलांना फोर्ट-चर्चगेट येथील नखरेवाल्या पॉश फम्र्स हव्या असतात. अशा फम्र्समध्ये एखाद्या विद्यार्थ्यांला एक काम दिले की त्याचा अभ्यासक्रम संपेपर्यंत तो विद्यार्थी ते एकच गुळगुळीत झालेले काम पुन: पुन्हा करीत असतो. त्यामुळे त्याला तुलनेने इतर बाबींचे प्रशिक्षण अभावानेच मिळते. ही परिस्थिती म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे, असे असते. यासाठी लहान फर्म शतपटीने चांगली म्हणावी लागेल. कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारची कामे आणि कायद्यांचा वापर यांच्याशी त्या उमेदवाराचा प्रत्यक्ष संबंध येतो म्हणून स्थानिक सी.ए. चांगला.
उमेदवार विद्यार्थी जेव्हा सी.ए.कडे शिक्षण घेत असतात, तेव्हा त्यांचा असा समज असतो की, सी.ए.कडे हिशेब, ऑडिट, टॅक्सेशन अशी तीन-चार प्रकारची कामे शिकले की संपले; पण प्रत्यक्षात तसे नसते. तर प्राप्ती कर, संपत्ती कर, व्हॅट, बक्षीस कर, विक्री कर, कंपनी कायदा, सेवा कर, व्यवसाय कर, भागीदारी, हिंदू अविभक्त वारसा कायदा, परदेश विनिमय कायदा, वर्क्‍स कॉन्ट्रॅक्ट, सेन्ट्रल एक्साइज, शॉप अ‍ॅक्ट, लक्झरी कर, बँकिंग अशा कितीतरी कायद्यांशी संबंध येतो. याशिवाय सोसायटय़ा, प्रोजेक्ट रिपोर्ट, स्टॉक ऑडिट अशी कितीतरी प्रकारचे कामे असतात. वरील सर्व कायदे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आहेत. म्हणून अभ्यास कसा करायचा याचे या विद्यार्थ्यांना समजेल असे उदाहरण द्यावेसे वाटते. ते असे की, तो विद्यार्थी वरील कोणत्याही कायद्यातील एखादा नमुना भरत असल्यास त्या फॉर्मवर कायद्याचे कलम व नियम क्रमांक असतात. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांने त्या संबंधित कायद्याचे पुस्तक (अ‍ॅक्ट) काढून संबंधित कलम व नियम वाचल्यास त्याला त्या फॉर्मचा अर्थ तर कळेलच, शिवाय फॉर्म भरण्यासही सोपा जाईल. अशा वेळी जेव्हा तो विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून सी.ए. होईल त्या वेळी तो छातीठोकपणे स्वत:चा व्यवसाय करील.
शिक्षण सुरू असताना शिकाऊ उमेदवाराने स्वत:हून कामात गोडी दाखवली पाहिजे. असे स्वारस्य दाखवल्यामुळे त्याचा फायदा पुढील आयुष्यात होतो. कामावर जिवापाड प्रेम, अभ्यासू वृत्ती, बारकाईने लक्ष, कष्टाळूपणा, प्रकरण- कायद्यांचे वाचन, त्याच्या सूक्ष्म व्याख्या या सगळ्यावृत्ती जोपासा आणि पाहा की, यश तुमचे आहे. याशिवाय अंगी निर्भयता, नम्रता, इच्छाशक्ती, दृढनिश्चय या गोष्टी प्रबळ ठेवा. आलेल्या अशिलांशी चार शब्द बोला. याचा लाभ व्यवसाय करताना आगामी  काळात होतो. भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करा.
या शिकाऊ उमेदवारांनी मानसिक, शारीरिक व बौद्धिक या दृष्टीने अविचल असावे. तसेच समोरच्याला कधीही कमी लेखू नये. हल्ली ‘सेकंड ओपिनियन’ हा प्रकार वाढू लागला आहे. त्यामुळे समोरच्या अशिलालाही संबंधित माहितीच्या वेगवेगळ्या बाजू ठाऊक असतात. त्यामुळे सावधानता बाळगून प्रामाणिकपणे व्यवसाय करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2013 7:59 am

Web Title: guidance for c a studies
टॅग : Guidance
Next Stories
1 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती
2 राष्ट्रीय सैनिकी शाळांमध्ये प्रवेश
3 इस्रायलमधील शिक्षणप्रणाली
Just Now!
X