News Flash

एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा चालू घडामोडींची तयारी

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन घटकामध्ये चालू घडामोडींचा अभ्यासक्रम सविस्तरपणे विहित करण्यात आला आहे.

'जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी - राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी' अभ्यासक्रम अशा प्रकारे सुस्पष्टपणे विहित केला असल्याने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून नेमकी तयारी करणे सोपे होते.

फारूक नाईकवाडे

स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम पाहिल्यास चालू घडामोडी हा तसा ढोबळमानाने मांडलेला घटक असतो आणि त्यामुळे नव्या उमेदवारांना तयारी करताना बरेच वेळा नेमकी चौकट ठरवता येत नाही. मात्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन घटकामध्ये चालू घडामोडींचा अभ्यासक्रम सविस्तरपणे विहित करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे:

‘जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी – राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी’ अभ्यासक्रम अशा प्रकारे सुस्पष्टपणे विहित केला असल्याने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून नेमकी तयारी करणे सोपे होते. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून लक्षात येते की या घटकावर किमान पाच ते सहा प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्न बऱ्याच प्रमाणात सरळसोट, एका शब्दात उत्तरे द्या अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे योग्य दिशेने तयारी केल्यास सहापैकी किमान पाच गुण मिळवणे सहजशक्य आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:

राजकीय घडामोडी

राज्यव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडींबाबत घटनात्मक तरतुदी, तशी प्रत्यक्ष तरतूद नसल्यास कायदेशीर बाजू समजून घ्यायला हवी.

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांच्या वर्षी महत्त्वाची आकडेवारी, निवडणूक आयोगाचे व राज्य शासनाचे या निवडणुकांबाबतचे नवे निर्णय यांचा आढावा घ्यावा.

भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, विकसित करणारी संस्था, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम या मुद्द्याच्या आधारे कोष्टकामध्ये टिप्पणे काढावीत.

भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच इतर देशांशी भारताने संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प, युद्धाभ्यास यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य के व्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघट्नेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

आर्थिक, औद्योगिक घडामोडी

औद्योगिक घडामोडींमध्ये नवउद्योग आणि नवउद्यमी (स्टार्ट अप्स), लघु, मध्यम व मोठय़ा उद्योगांबाबतचे शासकीय निर्णय, धोरणे यांचा आढावा घ्यावा.

रस्ते, वीज, पाणी, टेलिकॉम अशा पायाभूत सुविधांबाबतचे नवे प्रकल्प बारकाईने माहीत करून घ्यावेत.

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.

आर्थिक विकास दर, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.

आयात-निर्यातीतील पहिल्या तीन क्रमांकावरील देश, पहिल्या तीन क्रमांकावरील उत्पादने, आयात-निर्यातीचा जीडीपीमधील वाटा, सर्वाधिक परकीय गुंतवणुकीची पहिली तीन क्षेत्रे, सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश किंवा गट याबाबत कोष्टक मांडून टिप्पणे काढावीत.

महागाई निर्देशांकाची मूलभूत संकल्पना समजून घेऊन त्याची अद्ययावत आकडेवारी माहीत करून घेतल्यास फायद्याचे ठरेल.

सामाजिक घडामोडी

दारिद्र्य, बेरोजगारी, भूक, आरोग्य याबाबतचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

शासकीय योजनांचे उद्दिष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दिष्टे यांचा कोष्टकामध्ये टिप्पणे काढून अभ्यास करावा. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मात्र मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास उत्तम.

शैक्षणिक घडामोडी

प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाबाबत शासनाचे नवे निर्णय, शासकीय धोरणे, योजना यांतील मुख्य तरतुदी पहाव्यात.

शिक्षणविषयक समित्या आणि त्यांचे अभ्यासविषय व ठळक शिफारशी माहीत करून घ्याव्यात.

भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय घडामोडी

नैसर्गिक आपत्ती, मागील वर्षभरात घडलेली वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक, खगोलशास्त्रीय आणि लक्षणीय पर्यावरणीय घटना यांबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.

सांस्कृतिक घडामोडी

महत्त्वाच्या खेळांचे विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.

चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.

चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

वैज्ञानिक घडामोडी

मागील वर्षभरातील महत्त्वाचे वैज्ञानिक शोध, आरोग्यविषयक शोध, इस्रोचे प्रकल्प यांचा आढावा घ्यायला हवा.

परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने कोणतेही एक इंग्रजी तर मराठीतील लोकसत्ता ही वर्तमानपत्रे वाचण्यास प्राधान्य द्यावे. योजना, कुरूक्षेत्र नियतकालिके, इंडिया इयर बुक, आर्थिक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प यांची प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स, शासकीय योजनेचे संके तस्थळ व नव्या कायद्याची मूळ प्रत असे संदर्भ साहित्य वापरणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबर अन्य घडामोडींसाठी बाजारात उपलब्ध संकलन वापरावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:01 am

Web Title: mpsc mantra engineering services current affairs preparation dd 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : नागरी सेवा क्षमता चाचणी (CSAT)
2 एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा भाषा विषयांची तयारी
3 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास
Just Now!
X