एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

या लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सामान्य विज्ञान घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.

‘भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र व आरोग्यशास्त्र’

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले आहेत किंवा प्रश्न किती सोपे, किती अवघड आहेत हे लक्षात येते. एखाद्या मुद्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याची कल्पना येते. तसेच अभ्यास करताना नेमके काय वाचावे, कसे वाचावे आणि अभ्यासाच्या टिप्पणांमध्ये कशाचा अंतर्भाव करावा याची कल्पना येते. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

एकूण १५ प्रश्नांपैकी प्रत्येक उपघटकावर तीन-तीन प्रश्न विचारलेले आहेत.

बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. मात्र प्रश्नातील मुद्याची नेमकी माहिती असेल तर मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांना कॉमन सेन्सने प्रश्न सोडविता येतील अशा प्रकारची काठिण्यपातळी आहे. त्या दृष्टीने प्रश्नांचा दर्जा पदवीचा आहे हे लक्षात येते. अभ्यास बारकाईने आणि समजून घेऊन करणे आवश्यक आहे.

सर्व घटकांमधील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे.

सर्व शाखांमधील शोध व शोधकर्ते वैज्ञानिक यांवरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

मूलभूत संज्ञा आणि संकल्पनांवर बहुतेक प्रश्न विचारलेले आहेत. उपयोजित प्रकारचे प्रश्न भौतिकशास्त्राच्या गणितांपुरते मर्यादित असल्याचे दिसते. रासायनिक अभिक्रिया विचारल्या असल्या तरी त्या दरवर्षी विचारलेल्या नाहीत. त्यामुळे अकार्बनी (inorganic) रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया समजून घेतल्यास उपयोगी ठरते.

रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे  combination  किंवा कृषीसंबंधित अशा प्रकारचे पण कमी काठिण्यपातळीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

चालू घडामोडींवर फारसे प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. मात्र दरवर्षी एखादा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित मुद्यावर विचारलेला दिसून येतो.

सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि आवश्यक तेथे तथ्यात्मक बाबींची टिप्पणे काढणे या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

वरील विश्लेषणाच्या आधारे या विषयाची घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

भौतिकशास्त्र

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात. गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.

बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, पदार्थाचे अवस्थांतर आणि मापन पद्धती यांवर मूलभूत आणि सरळसोट प्रश्नांची अपेक्षा करता येईल. या घटकांची टिप्पणे कोष्टकामध्ये काढता येतात.

रसायनशास्त्र

विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्तवाचे सिद्धांत, द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, धातू, अधातू आणि त्यांची वैशिष्टय़े, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, महत्त्वाची संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यासक्रम गृहीत धरावा.

रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने कोष्टकामध्ये टिप्पणे काढून करता येतो. त्यासाठी वरील अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील मागचे प्रश्न पाहून सराव करणे हा महत्त्वाचा भाग आहे.

वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र

ल्ल     वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े हा अभ्यास कोष्टकामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.

ल्ल     या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे मानवी शरीर रचनाशास्त्र. अवयव संस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयव संस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर प्रश्न तयार केल्यास अशी तयारी जास्त प्रभावी ठरते.

आरोग्यशास्त्र

रोगांचे प्रकार – जिवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही कोष्टक तयार करता येईल.

आरोग्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना व त्यांची उद्दिष्टे माहीत असायला हवीत.

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चर्चेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात. म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

या घटकावर चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचे प्रमाण नगण्य असले तरी या वर्षी करोना विषाणू हा अत्यंत दूरगामी परिणाम करणारा मुद्दा अभ्यासामध्ये समाविष्ट करायला हवा. यामध्ये विषाणूची जीवशास्त्रीय वैशिष्टय़े, त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, मृत्यूचे कारण, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार या बाबी समजून घ्यायला हव्यात. यासाठी समाजमाध्यमांवरील फॉरवर्डेड मेसेजेस हा स्रोत असू शकत नाही हे आधी लक्षात घ्यावे. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची संकेतस्थळे यासाठीचा विश्वासार्ह स्रोत आहेत.