News Flash

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा पेपर २ : सीसॅट अभ्यासमंत्र

प्रशासनातील भावी अधिकाऱ्यांकडे कार्यक्षमता, कार्यकौशल्ये आहेत का, याची चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या गट (अ) व गट (ब) पदांसाठी असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पेपर

| December 23, 2013 01:09 am

प्रशासनातील भावी अधिकाऱ्यांकडे कार्यक्षमता, कार्यकौशल्ये आहेत का, याची चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या गट (अ) व गट (ब) पदांसाठी असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पेपर २ – सीसॅट या परीक्षेत घेतली जाते.  राज्यसेवा पेपर २ मध्ये पुढील कौशल्यांचे मूल्यमापन केले जाते- त्यात आकलन क्षमता- सर्वसाधारण (ज्ञान), व्यक्तींमधील सुसंवादकौशल्य, तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय प्रक्रिया व समस्येचे निवारण, सामान्य बुद्धिमापन चाचणी, मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे संकलन, मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य यांचा समावेश आहे.
सीसॅट कल (अभियोग्यता) चाचणी – राज्यसेवा पेपर २ साठी अभ्यास करताना एमपीएससीच्या २०१३ आणि यूपीएससीचे २०११, २०१२, २०१३च्या प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा. कल चाचणी प्रामुख्याने दोन प्रकारची असते- स्पीड अॅप्टिटय़ूड टेस्ट, पॉवर अॅप्टिटय़ूड टेस्ट. या दोन्ही चाचण्यांचा समावेश संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिसून येतो.
० स्पीड अॅप्टिटय़ूड टेस्ट : यातील प्रश्न साधे असतात. मात्र, जास्तीत जास्त प्रश्न कमी वेळेत सोडवणे हा या चाचणीचा खरा उद्देश असतो. प्रशासनात आपल्याला क्लार्क, निरीक्षक, अधीक्षक व इतर गट (क) दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी होताना दिसतो.
० पॉवर अॅप्टिटय़ूड टेस्ट : पॉवर अॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये प्रश्न हे जटिल व दिशाभूल करणारे असतात. या प्रकारामध्ये प्रश्नांची संख्या कमी असते. पण ते कठीण असतात.
कल चाचणीद्वारे उमेदवाराची पुढील वैशिष्टय़े तपासली जातात :
६ निर्णयक्षमता- कमी वेळेत अचूक निर्णय घेण्याची क्षमता, कठीण परिस्थितीत अपुऱ्या साधनांच्या साहाय्याने निर्णय घेणे, विश्लेषण क्षमता- आवडीच्या विषयाच्या/ मुद्दय़ाच्या किंवा अभिरुचीच्या/ वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचे कौशल्य, भाषिक शब्दसंपदा- सौंदर्यवादी दृष्टिकोनातून रचनात्मक पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी आवश्यक व पुरेशी भाषिक शब्दसंपदा गरजेची असते, शिकण्याची वृत्ती- आतापर्यंत शिकविलेल्या गोष्टींचे आकलन, स्मरण, चिंतन आणि योग्य वापर करण्याची वृत्ती व कौशल्य, नावीन्यपूर्ण माहिती- विविध विषयांतील माहितीवर नावीन्यपूर्ण प्रश्न तयार करणे किंवा त्यांची उत्तरे शोधण्याची सवय लावणे, चिकित्सक प्रवृत्ती, तंत्रज्ञानकौशल्य- संगणक, इंटरनेट तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर आत्मसात करण्याचे कौशल्य अवगत करणे, नवनवीन प्रवाह व घडामोडीबाबत जागरूक राहणे. राज्यसेवा पेपर – २ (सी-सॅट) २०१३ चे प्रश्न व गुणानुसार केलेले विश्लेषण.
एकूण ८० प्रश्न व त्यासाठी २०० गुण म्हणजेच एका प्रश्नाला अडीच गुण होय. राज्यसेवा (पूर्व) परीक्षा २०१३ नुसार  सिरीज ए पेपरसाठी प्रश्न क्रमांक ७४ ते ८० वगळून प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्नांकरिता उमेदवारांनी सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील, असे माहितीपत्रिकात दिले होते.   
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर- २ (२०१३) च्या ‘ए सिरीज’ प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता आपल्याला असे दिसून येते की,
* आकलनक्षमता (एकूण प्रश्न ५० )-  आकलनक्षमतेवर एकूण ५० प्रश्न आलेले आहेत. त्यांची विभागणी केली असता मराठी आकलनक्षमतेवर एकूण ४५ प्रश्न व ५ प्रश्न हे इंग्रजी आकलनक्षमतेवर असतात. मराठी आकलनक्षमतेचा विचार केला असता असे दिसते की, प्राचीन ग्रामीण जीवन या उताऱ्यावर ५ प्रश्न, दुष्काळग्रस्त उताऱ्यावर ३ प्रश्न, जैविक बहुविविधतेवर ४ प्रश्न, आधुनिक जग व भारत यावरील उताऱ्यावर २ प्रश्न, माहितीचा अधिकार यावर ५ प्रश्न आíथक सुधारणांवरील उताऱ्यावर ३ प्रश्न, जीवाश्म इंधन व ऊर्जा या उताऱ्यावर ५ प्रश्न, जैवतंत्रज्ञानावर ५ प्रश्न, वनखते व कृषी उताऱ्यावर ४ प्रश्न, मानवी हक्क व मानवी सहानुभूती यावरील उताऱ्यावर ५ प्रश्न, धर्म, समाज परिस्थिती यावर ४ प्रश्न यावरील एकूण अशी मराठी उताऱ्यावर ४५ प्रश्न विचारले गेलेले आहेत. तसेच इंग्रजी भाषा आकलनक्षमता या दोन उताऱ्यावर एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यात  Women Empowerment, Encounter with shark and Place Descriptionघटकावर उतारे सोडविण्यासाठी देण्यात आले होते.
* संवादकौशल्य – या घटकावर महाराष्ट्र आयोगातर्फे २०१३ च्या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला नाही. पण म्हणून २०१४ च्या परीक्षेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाणार नाही, असाही समज करून घेण्याचे कारण नाही.
* तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता – तर्कसंगत व विश्लेषण या घटकाचा विचार केला असता एकूण ८ प्रश्न विचारलेले दिसतात. यात बठकव्यवस्थेवर १ प्रश्न, कूटप्रश्नावर १ प्रश्न, नातेसंबंधावर १ प्रश्न, पझल टेस्टवर १ प्रश्न, माहितीचे पृथक्करण त्यावर २ प्रश्न, विविध संचांच्या क्रमावर १ प्रश्न, शब्द – अंक मशिन प्रणाली यावर १ प्रश्न.
* निर्णयप्रक्रिया व समस्येचे निवारण- निर्णयक्षमतेवर राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत एकूण सात प्रश्न विचारलेले होते, ज्यात कौटुंबिक समोपदेशन, लोकजागृती अभियान, निवड प्रक्रिया, अशांतता व्यवस्थापन, दुष्काळ व्यवस्थापन, पोलीस अधिकाऱ्यांचे कार्य, अपघात व उपाययोजना या घटकांवर ही सात प्रश्न विचारले होते.
* सामान्य बुद्धिमापन चाचणी- या घटकावर सहा प्रश्न विचारले गेले होते. दिलेल्या प्रश्नांची घटकनिहाय विभागणी केली असता असे दिसते की, चौकोनातील रिक्त संख्या यावर एक प्रश्न, वर्ण- चिन्ह- अंकमालिका यावर एक प्रश्न, सांकेतिक भाषा यावर दोन प्रश्न, आकृतीचा क्रम पूर्तता करणे यासाठी एक प्रश्न व अक्षर त्रिकोण किंवा अंकघन यासाठी एक प्रश्न आयोगातर्फे विचारण्यात आले होते.
* मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे संकलन- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या घटकावर एकूण नऊ प्रश्न विचारले गेले होते. मागील प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणात एक महत्त्वाची बाब म्हणजे अंकगणिताचा मूलभूत पाया असलेले प्रकरण संख्याज्ञान व त्यावरील संबंध यावर एकही प्रश्न विचारलेला दिसत नाही. प्रमाण व गुणोत्तर यावर एक प्रश्न, काळ आणि वेग या घटकासाठी दोन प्रश्न, काळ व काम साठी एक प्रश्न, टक्केवारीवर दोन प्रश्न विचारलेले आहेत. सरासरीवर एक प्रश्न, भूमितीवर एक प्रश्न, तक्ते व टेबलावर एक प्रश्न या पद्धतीने घटकनिहाय प्रश्न विश्लेषण करता येते.
परीक्षार्थीनी राज्यसेवा (पूर्व) पेपर – २ चा अभ्यास करताना मराठी व इंग्रजी आकलनक्षमतेवर अधिक भर द्यायला हवा. त्यात त्यांनी शब्दसंग्रह व व्याकरणविषयक क्षमता जोपासायला हवे. अंकगणिती ज्ञान व सांख्यिकी क्षमता, विविध ताíकक संकल्पनाचा वापर करण्याचे कौशल्य, निर्णय घेणे, समस्या निराकरण करणे, स्वजागृती, चिकित्सक विचार प्रक्रिया या बाबींवर भर देणे गरजेचे आहे. अभ्यास करताना खालील दिलेल्या घटकांना केंद्रिबदू मानावे-  
* आकलन (Comprehension) – राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तुम्हांला यश मिळवायचे असेल, तर पेपर-२ ची तयारी महत्त्वाची आहे. ‘आकलन’ या घटकावर जवळपास ५० प्रश्न म्हणजेच एकूण पेपरचा ५० टक्के भाग या विभागावर अपेक्षित असतो. संघ लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पेपर-२ (CSAT) निर्धारित केला आहे. त्यामुळे आगामी परीक्षेत ‘आकलन’ या घटकावरसुद्धा ५० टक्के प्रश्न विचारले जातील, ही शक्यता आपणास नाकारता येत नाही. ‘आकलन क्षमता’ या घटकांतर्गत नुसते ‘गद्य’ या घटकावर प्रश्न असतील असे नव्हे, ‘पद्या’वरसुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आकलनक्षमतेत विद्यार्थ्यांना उताऱ्यावरील शब्द भरणा वाक् प्रचार, म्हणी तसेच व्याकरण यायला हवे. उताऱ्याचा विषय, प्रसंग, संदर्भ आणि गर्भित विषय समजून घेत उताऱ्यावरचा मुख्य विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. आकलन व कौशल्यचाचणीत खालील गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य, वेळेचे भान, उत्तरसूचीची क्षमता, निरीक्षण या बाबतीत सावधपणे पाहणे, आकलन व कलचाचणी वाचताना पूर्णत: वर्गीकरण करणे, मुख्य विषय समजून घेत तो ग्रहण करण्यासंदर्भात क्षमतेचा वापर करणे. वाचनकौशल्य, ग्रहणक्षमता, वेळेनुसार सराव या घटकावर भर देणे अगत्याचे असते. विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थ व वाणिज्य, जीवशास्त्र, पर्यावरण, मानव जीवन, लोक व कायदा, दुष्काळ, भारत व इतर देश, भारत व कायदा इत्यादी घटकांवर अलीकडच्या घटना यावर उतारे अपेक्षित असतात.
* व्यक्तींमधील संवादकौशल्य : संवादकौशल्य प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे संकल्पना, स्पष्टता, संतुलित विचार आणि पर्याप्त ज्ञान असणे आवश्यक असते.
* तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता : प्रशासनात प्रशासकीय अधिकाऱ्याला आपली जबाबदारी तर्काद्वारे सोडविता यावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-२ (सी-सॅट) या अभ्यासक्रमात ‘तर्कसंगत व  विश्लेषणात्मक क्षमता’ या घटकाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या घटकात तर्क, अनुमान, विधान कारणे व त्यावर निष्कर्ष तसेच आकृत्यांचे पृथक्करण करणे या बाबींवर प्रश्न विचारले जातात. प्रामुख्याने यावरील विचारलेले प्रश्न वेन आकृत्यांनी विद्यार्थ्यांनी सोडवणे गरजेचे आहे. विधान व अनुमान हा घटक वैचारिक पातळी तपासणारा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तराकडे पोहचणाऱ्या अतिमहत्त्वाच्या विधानाचा विचार करणे म्हणजे या विभागात यश मिळवणे होय. यासाठी विद्यार्थ्यांची वैचारिक बठक, वैचारिक दृष्टिकोन तयार असावी. यासाठी विद्यार्थ्यांने नियमित वाचन करावे तसेच जीवनातील घटनांचे बारकाईने निरीक्षण करण्याची वृत्ती तसेच विश्लेषणात्मक क्षमता विकसित करावी.
* निर्णय प्रक्रिया व समस्येचे निवारण :
निर्णयप्रक्रिया ही मानसिक व बौद्धिक स्वरूपाची असते. प्रशासक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व अनुभवाच्या आधारे असामान्य गोष्टी सामान्य व सहज सुंदर बनवतो आणि योग्य निर्णय घेतो. म्हणूनच प्रशासकाचे जीवन म्हणजेच निर्णय घेणे होय. प्रशासनात करिअर करताना अधिकाऱ्याला/कर्मचाऱ्याला शेकडो निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णयक्षमता हा त्यामधील व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. समस्येच्या निराकरणासाठी उपलब्ध पर्यायांपैकी संयुक्तिक पर्याय शोधण्याची विद्यार्थ्यांची महत्त्वाची क्षमताही तपासली जाते.
* सामान्य बुद्धिमापन चाचणी :
बौद्धिक क्षमता ही मानवी मेंदूच्या योग्यतेची निर्देशक असून एखाद्या समस्येवर उपाय शोधून मेंदूचा तत्पर वापर करता येतो का, हे यात जोखले जाते. त्यात सामथ्र्य, तर्कक्षमता, वैचारिक कुवत आणि विश्लेषणक्षमता तपासण्यासाठी ‘बुद्धिमापन चाचणी’ उपयुक्त घटक होय. या विभागात बुद्धी म्हणजे स्मरणशक्ती अपेक्षित नसून विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या व स्वभावाच्या अनेक पलूंचा कस लागतो. हा घटक परीक्षार्थीसाठी वेळखाऊ असतो. त्यामुळे परीक्षार्थीनी वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, सूत्रे, ए.बी.सी.डी.चा तक्ता, संख्याज्ञानावरील माहिती आत्मसात करायला हवी.  
* मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे संकलन :
या घटकावरील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांकडे असणारे अंकज्ञान, माहिती, तक्ते, आलेख स्वरूपात सादर करणे किंवा अशा स्वरूपात दिलेल्या माहितीचे आकलन करणे याबाबत विद्यार्थ्यांचे कौशल्य तपासले जाते. या विभागात विद्यार्थ्यांला मोठय़ा संख्येची उकल करावी लागते. त्यासाठी आयोगाने या घटकावर विशेष भर दिला आहे. या घटकाचा अभ्यास करताना संख्याशास्त्रावर परीक्षार्थीनी भर द्यायला पाहिजे. तसेच VBODMAS मूलभूत संकल्पना समजायला हवी. त्याचा सराव करणे अगत्याचे असते.
* मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इंग्रजी व मराठी भाषेचे पायाभूत ज्ञान तपासणे महत्त्वाचे आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य, शाब्दिक ज्ञान तसेच इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विचार व आकलन करण्याची क्षमता, इंग्रजी शब्दांचा भावार्थ, तथ्य आणि त्याचा गर्भितार्थ समजून घेण्याची क्षमता या प्रश्नपत्रिकेत अजमावली जाते.
आपल्याला ठाऊकच आहे की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही म्हण सुधारित स्वरूपात लिहावी लागेल. ती अशी – परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:09 am

Web Title: state east exam paper 2 csat practice mantra
टॅग : Csat
Next Stories
1 पुण्याचे नऊ तरुण बनले ‘लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर’
2 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळचे अभ्यासक्रम
3 दिल्ली विद्यापीठाची व्यवस्थापन विषयांतर्गत पीएचडी
Just Now!
X