prashasan3येत्या २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी पूर्वपरीक्षेस आता सुमारे २५ दिवसांचाच कालावधी उरलेला आहे. स्वाभाविकच हा विद्यार्थ्यांच्या तयारीतील अखेरचा आणि म्हणूनच निर्णायक टप्पा आहे. त्यामुळे या कालावधीतील अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.
विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, यापूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे या वर्षीपासून यूपीएससी पूर्वपरीक्षेतील ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सीसॅट) हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आल्यामुळे पूर्वपरीक्षेचा निकाल प्राय : सामान्य अध्ययनात मिळणाऱ्या गुणांमुळेच निर्धारित होणार आहे. त्यामुळे या काळातील तयारीचा केंद्रिबदू सामान्य अध्ययनच असायला हवा. त्यातील विविध विषयांसाठी आत्तापर्यंत वाचलेल्या संदर्भसाहित्याची उजळणी करण्यावरच भर देणे उपयुक्त ठरेल. त्या-त्या संदर्भ पुस्तकातून अधोरेखित केलेली माहिती व मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत. म्हणजेच संपूर्ण संदर्भ पुस्तक सखोलपणे न वाचता त्यातील महत्त्वाच्या भागाचीच उजळणी करावी. अर्थात हे करताना त्या-त्या विषयातील तांत्रिक माहिती, वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्ये, आकडेवारी यावर बारकाईने लक्ष द्यावे. कारण या वर्षी कदाचित सूक्ष्म मुद्दे अथवा माहितीवर भर दिला जाण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून अशा तांत्रिक, माहितीप्रधान तथ्यांची व्यवस्थित उजळणी करणे अत्यावश्यक ठरते.
येत्या महिनाभराच्या काळात दररोजच्या वर्तमानपत्राच्या वाचनास २०-२५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ न देता, यापूर्वी गेल्या वर्षभरापासून केलेल्या चालू घडामोडीच्या तयारीची उजळणी करावी. प्रत्येक विषयाशी निगडीत महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेतला जाईल याची खातरजमा करावी.
उर्वरित कालावधीत करायची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विषयानुरूप वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अधिकाधिक सराव आणि दर आठवडय़ास एक सामान्य अध्ययन आणि एक नागरी सेवा कलचाचणीची सराव चाचणी सोडवून पाहावी. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांचा अधिकाधिक सराव केल्यामुळे त्या-त्या विषयाच्या अभ्यासाचे मोजमाप करून त्यात आढळून येणाऱ्या कमतरतांवर योग्य रीतीने मात करता येईल. आयोगाचा पेपर सोडवताना करायचे वेळेचे व्यवस्थापन आणि स्वीकारायचे धोरण प्रश्नपत्रिकांच्या सरावाआधारेच ठरवता येते.
बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत, हा काळ तणावाचा ठरतो. आपले ठरवल्याप्रमाणे वाचन झाले नाही; उजळणी पुरेशी झालेली नाही; सराव प्रश्न कमी प्रमाणात सोडवता आले; आपला अभ्यास वेळेत पूर्ण होणार नाही इत्यादी अशा अनेक कारणांमुळे या शेवटच्या टप्प्यात ताण येण्याची शक्यता असते. तथापि, जाणीवपूर्वक असे विचार बाजूला ठेवून आत्तापर्यंत जी तयारी केली, जे वाचन केले त्याची उजळणी करून ते पक्के करण्यावर भर दिला पाहिजे. यूपीएससीची परीक्षा मानसिकतेची कसोटी पाहणारी असते. म्हणूनच या काळात येणाऱ्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करून आपले मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवणे गरजेचे असते. अन्यथा तणावामुळे दडपण वाढून याआधी केलेल्या अभ्यासावर विपरित परिणाम होण्याचीच शक्यता अधिक.

एकंदर विचार करता जे विषय चांगल्या प्रकारे अभ्यासले आहेत त्यावर भर देऊन त्यावर विचारलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची बरोबर उत्तरे देता येतील असा विचार करावा. त्यासाठी विविध विषयांचा आपल्या तयारीच्या आधारे अग्रक्रम लावावा आणि आपले पक्के विषय आणखी मजबूत करावेत.
त्याखेरीज प्रत्येक विषयातील महत्त्वपूर्ण घटकांची किमान तीन ते चार वेळा उजळणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे असा भाग नि:संदिग्धपणे लक्षात ठेवणे सुलभ जाईल. म्हणूनच हा काळ त्या-त्या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा निवडक भागांची उजळणी करण्यासाठीच राखीव ठेवणे उपकारक ठरते.
पूर्वपरीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे जेवढय़ा प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत असे ठामपणे वाटते, तेवढेच प्रश्न सोडवणे अथवा सर्वच्या सर्व प्रश्न सोडवणे अशी दोन्ही टोके टाळावीत. प्रश्नपत्रिका सोडवताना पहिल्या फेरीमध्ये साधारणत: किती प्रश्नांची उत्तरे ठामपणे बरोबर वाटतात याआधारे किती प्रश्नांच्या बाबतीत धोका स्वीकारायचा हे ठरवावे. म्हणजे सामान्य अध्ययनातील एकूण १०० प्रश्नांपकी आपली ५० प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत असे वाटल्यास उर्वरित संदिग्ध वाटणाऱ्या ५० प्रश्नांपकी २०-२५ प्रश्न सोडवण्याचा विचार करावा. म्हणजे एकूण ७५ प्रश्न सोडवावेत. अर्थात प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी, आपली तयारी आणि ठामपणे बरोबर उत्तर देता येईल अशा प्रश्नांची संख्या या आधारे एकूण १०० प्रश्नांपकी किती प्रश्न सोडवायचे याचा निर्णय घ्यावा. मात्र, बरोबर येतील तेवढेच प्रश्न किंवा विनाकारण अधिकाधिक प्रश्न सोडवणे टाळलेले बरे. यासाठी सराव चाचण्यांची केलेली काळजीपूर्वक उकल साहाय्यभूत ठरते. कारण सराव चाचण्यांच्या माध्यमातून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेसंबंधी निश्चित धोरण ठरवणे शक्य होते.
शेवटी नागरी सेवा कलचाचणी हा दुसरा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मागील वर्षांच्या तुलनेत, येणारा पेपर कदाचित वेळखाऊ आणि म्हणून कठीण असू शकतो. म्हणून त्या विषयातील सर्व घटकांचा नियमित सराव करणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: गणित, बुद्धिमत्ता आणि सामग्री विश्लेषणावर आधारित प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठी सराव चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. म्हणून दररोजच्या वेळापत्रकातील किमान दीड-दोन तासांचा कालावधी या विषयाची उजळणी व सरावाकरता राखून ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांना या घटकांची अडचण वाटत नाही त्यांनी आपले लक्ष सामान्य अध्ययनावर केंद्रित करावे.
अशा रीतीने त्या-त्या विषयातील महत्त्वपूर्ण भाग, तांत्रिक माहिती, आकडेवारी, तथ्ये याची उजळणी करून त्यावर प्रभुत्व मिळवणे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न तसेच नमुना सराव चाचण्यांचा अधिकाधिक सराव करणे या बाबींवर भर द्यावा. आत्तापर्यंत केलेला अभ्यास पक्का, मजबूत करून अभ्यासाची गुणवत्ता वाढवत नेण्यावर लक्ष केंद्रित करावे.