नकारात्मकतेतून आपल्याला हवं तसं वास्तव घडवता येतं आणि जे हवं ते प्राप्त करून घेता येतं असं अहंला वाटत असतं. आपण अशा प्रकारे हवी ती परिस्थिती निर्माण करू शकतो किंवा नकोशी वाटणारी परिस्थिती दूर करू शकतो, असा अहंकाराला विश्वास असतो.
असमाधान काही कामाचे नाही, असं तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला वाटत असेल तर मग ते तुम्ही निर्माणच का करता? मात्र नकारात्मकता उपयोगाची नसते, हे सत्य आहे. हवी ती स्थिती निर्माण करण्याऐवजी तिला ती दाबत असते. तसंच नकोशा वाटणाऱ्या स्थितीला नाहीशी करण्याऐवजी ती स्थिती ती कायम ठेवते. यातून एकच घडतं आणि ते म्हणजे अहंकार बलवान होतो. त्यामुळे अहंकाराला नकारात्मकतेविषयी प्रेम वाटत असतं. तुम्ही एकदा का कुठल्या तरी नकारात्मकतेशी ओळख जोडली तर ती स्थिती बदलू नये असं तुम्हाला वाटायला लागतं आणि खोलवर कळत-नकळत सकारात्मक बदल तुम्ही टाळायला लागता. कारण सकारात्मकतेमुळे तुम्ही ज्या औदासीन्य, क्रोध याच्याशी एकरूप होता, त्याला धक्का बसतो. म्हणून तुम्ही सकारात्मकतेकडे दुर्लक्ष करता किंवा त्याची उपेक्षा करता किंवा ती सकारात्मकता नाकारता.
एखाद्या रोपाचं किंवा प्राण्याचं निरीक्षण करा, त्यापासून शिका. वर्तमानाचा स्वीकार कसा करावा, त्यातून अस्तित्वाचा बोध घ्यायला तुम्ही शिकाल. जेव्हा तुमच्यात नकारात्मकता येऊ लागते, तेव्हा ती तुम्हाला सावधानतेचा इशारा देत असते, हे लक्षात घ्या. मग अशी नकारात्मकता बाह्य़ घटकांमुळे निर्माण झालेली असो की एखाद्या विचारानं असो किंवा तुम्ही अजाण असलेल्या स्थितीमुळे असो, तुम्ही सावध व्हावं, असाच तो इशारा असतो. आताचा, हा क्षण जगा. जागृत व्हा. मनाला दूर लोटा. त्याच्या जाळ्यातून बाहेर पडा. वर्तमानात राहा.’
प्रॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाऊ – एखार्ट टॉल्, अनुवाद – प्रा. दिनकर बोरीकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे – ११२, मूल्य – १०० रु.