यूपीएससीची तयारी : निबंध म्हणजे काय?

पारंपरिक पद्धतीने ठरवून दिलेली निबंधाची रचना जरी महत्त्वाची असली तरीही पुरेशी नाही.

(संग्रहित छायाचित्र)

अपर्णा दीक्षित

मागील लेखात आपण यूपीएससीसाठी आवश्यक निबंध लेखन या पेपरची तोंडओळख करून घेतली. आज आपण या पेपरमधून यूपीएससीला नेमके काय अपेक्षित आहे, हे आणखी सविस्तर पाहणार आहोत. तसेच अर्थपूर्ण आणि मुद्देसूद लेखनाबद्दल आवश्यक बाबींची चर्चा करणार आहोत.

यूपीएससीकरिता निबंध लिहिण्यासाठी काय तयारीची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्याआधी मुळात चांगला निबंध कसा असतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. निबंध म्हणजे लिखाणाचा असा नमुना असतो ज्यामध्ये ठरावीक विषयास धरून ठरावीक पद्धतीने विचारांची मांडणी व विश्लेषण केलेले असते. कोणत्याही निबंधाचे आवश्यक घटक पुढीलप्रमाणे-विषयाचा आराखडा, माहिती, भाषा आणि तार्किक सुसूत्रता.

स्वत:चे मत नोंदवण्याचे महत्त्व

मूलत: निबंध हा असा लेखनप्रकार आहे ज्यामध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीचे मत किंवा एकंदरीतच दिलेल्या विषयासंबंधीची वैचारिक भूमिका मांडलेली असते. या वैचारिक भूमिकेला स्वतंत्र, अभ्यासपूर्ण लिखाणात महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांना अशा लिखाणातील मताबद्दल अनेकदा संभ्रम असतो. या संभ्रमातून बऱ्याच वेळा अशा लिखाणाबद्दल जे मत तयार होते ते असे असते की, अभ्यासपूर्ण लिखाण केवळ माहितीवर आधारित असते व व्यक्तीच्या मताला त्यामध्ये दुय्यम स्थान असते. मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वैयक्तिक मत आणि विषयाचा संपूर्ण लेखाजोखा घेतल्यानंतर बनविलेले अभ्यासपूर्ण मत यात मोठा फरक आहे. चांगला निबंध लिहीत असताना हा फरक समजून घेणे व लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अर्थपूर्ण निबंधलेखन म्हणजे केवळ आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टीच वेगळ्या शब्दांत मांडणे नाही. सर्वाना परिचित असलेल्या संकल्पना व माहिती पुन्हा पुन्हा मांडल्याने चांगला निबंध बनत नाही. तर चांगल्या निबंधामध्ये विविध मतांचा व भूमिकांचा आढावा घेऊन स्वतंत्र वैचारिक मांडणी केलेली असते. कोणत्याही निबंधलेखनाला सुरुवात करण्याआधी तुमच्या मतांना अनुसरून तुमची ठरावीक भूमिका असणे आवश्यक आहे. दिलेल्या विषयाबद्दल विविध उदाहरणे व दाखले देऊन आपले विचार योग्य मांडणीमध्ये लिहिणे अपेक्षित आहे.

निबंध कसा लिहू नये

पारंपरिक पद्धतीने ठरवून दिलेली निबंधाची रचना जरी महत्त्वाची असली तरीही पुरेशी नाही. या रचनेप्रमाणे प्रास्ताविक, मजकूर व निष्कर्ष अशा पद्धतीने निबंध लिहिला जातो. मात्र असे निबंध शब्द संख्येच्या दृष्टीने खूप मोठे व विषयाच्या दृष्टीने खूप किचकट नसावेत. यूपीएससीतील अपेक्षित निबंध सर्वसमावेशक, मुद्देसूद व तार्किक असणे आवश्यक आहे. हे लिखाण संदिग्धता निर्माण करणारे नसावे. अनेक विद्यार्थी जेव्हा गुंतागुंतीच्या विषयावर नव्याने लिखाण

करतात तेव्हा अनेकदा खालील टप्प्यांचा वापर करतात  –

१)     विषयाशी आवश्यक संसाधने (पुस्तके, मासिके, इंटरनेट, लेख इ.) चाळणे.

२)     सुविचारांच्या अथवा मुद्दय़ांच्या स्वरूपात या कल्पना मांडणे आणि त्यांना विशिष्ट आराखडय़ांमध्ये (प्रास्ताविक, मजकूर, निष्कर्ष) बसविण्याचा प्रयत्न करणे.

३)     या सुविचारांभोवती व एकंदर निबंधाच्या विषयाभोवती वृत्तांतपर लेखन करणे.

४)     शेवटच्या परिच्छेदात स्वत:चे मत लिहून निबंधलेखन पूर्ण करणे.

जरी हे सर्व टप्पे नियोजनबद्ध वाटत असले तरीही खेदाची बाब म्हणजे निबंध लेखनाचे सर्व हेतू यामधून प्रभावीपणे साध्य होत नाहीत. अशा प्रकारे निबंध लिहिल्यानंतर तयार झालेला लिखाणाचा नमुना अनेक वेळा ‘भरकटलेला’ वाटतो. विविध महान व्यक्तींच्या सुविचारांच्या आजूबाजूला विषयास धरून केलेले साधारण लेखन असे त्याचे स्वरूप बनते. तसेच बऱ्याच वेळा निबंधाच्या विषयासंदर्भात ‘कोण काय म्हटले’ अशा स्वरूपाचे लिखाण केले जाते. या सर्व खटाटोपामधून खालील गोष्टी मात्र निश्चित होतात –

१) निबंध दिलेल्या विषयावर कोणतेही प्रत्यक्ष भाष्य करत नाही तर विषयाच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करून जातो.

२) लिखाण एकसंध, स्पष्ट होत नाही.

३) निबंधाची रचना ढिली व मजकूर वरवरचा वाटतो.

हे सर्व टाळायचे असल्यास काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या हे आपण पुढील लेखात सविस्तर पाहणार आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc exam 2019 upsc preparation tips upsc tips

Next Story
विजयी भव !