लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे.

  • बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे. म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते. एक वर्षांच्या आत क्षयरोगप्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलियोप्रतिबंधक डोस, गोवराची लस या लसी द्यायला पाहिजेत. रक्त-काविळीची लस पहिल्या दहा दिवसांत देतात.
  • क्षयरोगप्रतिबंधक लसीला बी.सी.जी. लस म्हणतात. ती डाव्या खांद्यावर टोचतात. बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीसुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. १५ दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्या ठिकाणी थोडासा व्रण एक ते दीड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील ३-४ महिन्यांत कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते.
  • बाळ दीड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा द्यावा.
  • बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियोप्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियोपासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांने आणखी एक बूस्टर डोस द्यावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस द्यावा लागतो.
  • गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवरप्रतिबंधक लस बाळाला ९ ते १२ महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते.