scorecardresearch

मनुष्यबळ व्यवस्थापन

व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन विषय महत्त्वाचा ठरतो. या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा, याविषयी..

मनुष्यबळ व्यवस्थापन

व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन विषय महत्त्वाचा ठरतो. या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा, याविषयी..
एमबीएच्या पहिल्या वर्षी असलेला एक महत्त्वाचा विषय म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन अर्थात ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट. कोणत्याही संस्थेला, मग ती व्यावसायिक असो किंवा सामाजिक काम करणारी संस्था असो, मनुष्यबळ व्यवस्थापनाची यामध्ये नितांत गरज असते. संस्था योग्य प्रकारे चालवण्याचे काम हे शेवटी संस्थेचे कर्मचारीच करीत असतात. संस्थेचे यश हेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या कुशलतेवर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापन हे संस्थेचे एक अतिशय महत्त्वाचे कार्य मानले जाते. एमबीएच्या दुसऱ्या वर्षांमध्ये स्पेशलायझेशनचे विविध पर्याय असतात. यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन हा एक पर्याय आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा पर्याय निवडायचा आहे, त्यांच्या दृष्टीने पहिल्या वर्षांतील हा पेपर म्हणजे पाया मानायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना हा पर्याय निवडायचा नाही, त्यांनीसुद्धा या विषयाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. याचे कारण म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना, मनुष्यबळाचे व्यवस्थापन कसे करावे हे समजणे अत्यावश्यक ठरते.
मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात  विषयाच्या मूलभूत संकल्पनेपासून होते. मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या कार्याचा समावेश होतो आणि व्यवस्थापन करणे याचा मुख्य अर्थ म्हणजे ही वेगवेगळी कामे योग्य पद्धतीने आणि सुसूत्रीकरण करून पार पाडणे असा होतो. मनुष्यबळ व्यवस्थापनाचे मुख्य उद्देश म्हणजे संस्थेला कुशल व कार्यक्षम कर्मचारी उपलब्ध करून देणे तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे, कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत राहणे, त्यांच्या वेतनाचे प्रमाण ठरवणे इत्यादी आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनाचे उद्देश हे संस्थेच्या किंवा कंपनीच्या मूळ उद्देशांबरोबर सुसंगत असायला हवेत. म्हणजेच कंपनीचे व्हिजन, मिशन आणि मनुष्यबळ व्यवस्थापन याचा अतिशय जवळचा संबंध आहे, किंबहुना ते एकमेकांशी जोडलेले (कनेक्टेड) असतात. त्या दृष्टीने संपूर्ण मनुष्यबळव्यवस्थापन विभागाची संरचना केलेली असते.
मनुष्यबळ व्यवस्थापनाचे एक प्रमुख कार्य म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे हे जरी असले तरी प्रत्यक्ष नेमणुका करण्याआधी अनेक महत्त्वाची कामे या विभागाला पार पाडावी लागतात. यामध्ये सुरुवातीला संस्थेला आगामी काळामध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, हे ठरवणे आवश्यक असते. संस्थेचे भविष्यकाळातील नियोजन लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची गरज ठरवावी लागते. जर एखादी कंपनी भविष्यकाळामध्ये व्यवसायाचा विस्तार करणार असेल तर अधिक कर्मचाऱ्यांची गरज लागेल, त्यामुळे कंपनीचा विस्तारीकरणाचा आराखडा लक्षात घेऊन मनुष्यबळाचे एक अंदाजपत्रक (ह्य़ुमन रिसोर्स बजेट) बनवले जाते आणि सर्व प्रकारच्या नेमणुका या अंदाजपत्रकाप्रमाणेच केल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीआधी करायचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे ‘जॉब अ‍ॅनालिसिस’- म्हणजेच एका विशिष्ट प्रकारच्या कामाचे विश्लेषण. उदा. उत्पादन विभागामध्ये जर पर्यवेक्षकाची गरज असेल तर पर्यवेक्षकाच्या कामाचे विश्लेषण करून, कोणत्या पद्धतीची कामे त्याला पार पाडावी लागतील हे ठरवणे. यात विविध प्रकारच्या कामांचे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार कर्मचारी नेमले जातात. याद्वारे प्रत्येक प्रकारच्या कामाला कार्यपात्रतेचे कर्मचारी लागतील याचा अंदाज घेता येतो. याचप्रमाणे जॉब डिझाइन आणि जॉब डिस्क्रिप्शन या कार्याचाही उपयोग नेमणुका करताना होतो. एखाद्या कामाचे वर्णन करणे- त्यामध्ये कोणकोणती कामे अंतर्भूत होतात, हे लिहून काढणे म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन. या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याआधी केल्या जातात, म्हणजे योग्य कर्मचारी हा योग्य ठिकाणी नेमणे सोपे होते.
कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष नेमणूक किंवा भरती करणे (रिक्रूटमेंट) हा मनुष्यबळ व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नेमणुका करताना कोणती पद्धती वापरायची म्हणजे जाहिरात देऊन नेमणुका करायच्या की कंपनीतील नोटीस बोर्डावर नोटीस लावून नेमणुका करायच्या यासंबंधीचे धोरण निश्चित करावे लागते. नेमणुका करताना अनेक प्रश्न मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाला हाताळावे लागतात. उदा. वरच्या जागेवर नेमणूक करायची असेल तर कंपनीतीलच कर्मचाऱ्यांना बढती द्यायची की बाहेरून कर्मचारी नेमायचा याचा विचार करावा लागतो. बाहेरून कर्मचारी नेमायचा असल्यास, कंपनीमध्ये अंतर्गत असंतोष निर्माण होईल का याकडेही लक्ष द्यावे लागते. जर कंपनीतीलच कर्मचाऱ्यांपैकी काहींना बढती द्यायची असेल तर बढतीचे निकष निश्चित करावे लागतात. नाहीतर पुन्हा अंतर्गत असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते आणि चांगले कर्मचारी कंपनी सोडून जातात. याव्यतिरिक्त नेमणुका करताना गरज असल्यास लेखी परीक्षा घेणे, वैयक्तिक मुलाखती घेणे, काही प्रसंगी एकापेक्षा अधिक वेळा वैयक्तिक मुलाखती घेणे, कर्मचाऱ्यांचे मागील रेकॉर्ड तपासणे इत्यादी टप्पे पार पाडावे लागतात. कर्मचाऱ्यांच्या नेमणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे चांगले कर्मचारी नेमण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. कंपनीला, स्पर्धेमध्ये तोंड देण्यासाठी चांगल्या कर्मचाऱ्यांची गरज असते आणि यामुळेसुद्धा नेमणुकींना आज महत्त्व प्राप्त झाले आहे. नेमणुका करण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था, प्लेसमेंट एजन्सीज यासारख्या संस्थांचाही उपयोग केला जातो.
मनुष्यबळ व्यवस्थापनाचे पुढील काम म्हणजे नेमणुका केलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या कामावर नेमणे आणि त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे. प्रशिक्षणाची गरज अनुभवी तसेच अनुभव नसलेले कर्मचारी या  दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना असते. यासाठी प्रशिक्षणासंबंधीचे धोरण ठरवावे लागते. या धोरणामध्ये प्रशिक्षण कोणाला द्यावे, कोणत्या पद्धतीने द्यावे, प्रशिक्षणाचा कालावधी किती
असावा यासंबंधीचा आराखडा असतो. प्रशिक्षणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा हे ठरवणे तसेच प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन कसे करावे हे ठरवणे. प्रशिक्षणातील विषय ठरवताना, ते कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना द्यायचे आहे याचा विचार करावा लागतो. जर प्रशिक्षण हे उच्च व्यवस्थापनातील (टॉप मॅनेजमेंट) कर्मचाऱ्यांसाठी असेल तर त्यातील विषय व प्रशिक्षणाची
पद्धत ही वेगळी असेल. याउलट प्रशिक्षण जर कामगारांना द्यायचे असेल तर वेगळी पद्धत व वेगळे विषय हे घ्यावे लागतील. प्रशिक्षण देण्यामागचे उद्देश ठरवावे लागतात आणि हे उद्देश
किती प्रमाणात सफल झाले याचा विचार मूल्यमापनामध्ये
केला जातो.
कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. यामध्ये मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. उदा. ३६० डिग्री, ७२० डिग्री तसेच बॅलन्स्ड स्कोअरकार्ड यासारख्या पद्धती कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनासाठी वापरल्या जातात. कोणतीही पद्धत वापरली तरी लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ पद्धतीने होणे जरूर आहे. तसेच मूल्यमापनाचे निकष हे अतिशय स्पष्ट आणि समजण्यास सोपे असावेत. मूल्यमापन करताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने न झाल्यास नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात.
मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरचे संबंध हे सुरळीत ठेवणे हे एक आव्हानच आहे. यासाठी सर्व कामांमध्ये पारदर्शकता, मनुष्यबळविषयक निश्चित असे धोरण, बढत्या आणि बदल्या याबाबत वस्तुनिष्ठता, एखाद्या कर्मचाऱ्यावर जर शिस्तभंगाची कारवाई करायची असल्यास योग्य त्या कार्यपद्धतीचे पालन करणे इ. अनेक बाबी अमलात आणाव्या लागतात. कर्मचाऱ्यांशी संबंध सुरळीत राहिले नाहीत तर त्याचा परिणाम संपूर्ण कंपनीवर होतो व एकंदरीत कंपनी अडचणीत येते. यामुळेच मनुष्यबळ व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आले आहे.
या विषयाचा अभ्यास करताना सैद्धान्तिक अभ्यासासोबतच बरोबरच कंपन्यांच्या मनुष्यबळविषयक धोरणांचा अभ्यास करणे, केस स्टडी वापरणे तसेच कंपन्यांना भेटी यांसारख्या विविध मार्गाचा वापर केल्यास त्याचा लाभ होतो. असे म्हणता येईल की, मनुष्यबळ व्यवस्थापन हा विषय सर्वच विद्यार्थ्यांना – ज्या विद्यार्थ्यांनी हा विषय स्पेशलायझेशनसाठी घेतलेला नसेल त्यांनाही हा विषय अतिशय उपयुक्त ठरतो.                      
nmvechalekar@yahoo.co.in

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या