राज्यसेवा मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर एक मधील आर्थिक भूगोल आणि पेपर चारमध्ये समाविष्ट शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्न सुरक्षा हे मुद्दे ओव्हरलॅपिंग आहेत. पेपर एकमधील आर्थिक भूगोल उपघटकामध्ये शेतीपूरक क्षेत्राशी संबंधित पुढील मुद्दे समाविष्ट आहेत.

आर्थिक व्यवसाय शेती – महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप

उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती ( HYV) शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण

मासेमारी मत्स्य व्यवसाय – भूप्रदेशांतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण या सगळ्या मुद्द्यांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

आर्थिक व्यवसाय शेती

महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरूप, समस्या, कारण, उपाय या चार पैलूंच्या आधारे करावा. मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या शेतीस पूरक क्षेत्रांची वैशिष्ट्ये, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पैलू व्यवस्थित समजून घ्यावेत. जीडीपीमधील वाटा आर्थिक पाहणी अहवालामधून पहावा.

एकूण जमिनीपैकी शेतीसाठी होणाऱ्या वापराची टक्केवारी, सिंचित क्षेत्राची टक्केवारी व क्षेत्रफळ, कोणत्या पिकासाठी किती जमीन वापरली जाते त्याची टक्केवारी आर्थिक पाहणी अहवालामधून पाहावी.

शेतीची आधुनिक तंत्रे

उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती (HYV) विकसित करण्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजून घ्यावे. राज्यातील HYV विकसित करणाऱ्या संस्था व कृषी विद्यापीठे, हरीतक्रांतीमध्ये वापरलेली HYV वाणे आणि महाराष्ट्रातील मुख्य पिकांची महत्त्वाची HYV वाणे माहीत असायला हवीत.

जनुक संवर्धित (GM) बियाण्यांमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्यांच्या वापरातील आर्थिक फायदे, तोटे, पर्यावरणीय परिणाम,भारतामध्ये त्याच्या वापरामधील समस्या, कारणे, उपाय व चालू घडामोडी हे मुद्दे अभ्यासावेत.

शेतीचे यांत्रिकीकरण हा मुद्दा आवश्यकता, आर्थिक महत्त्व, फायदे, तोटे, राज्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणामधील अडथळे, समस्या, कारणे व उपाय या मुद्यांच्या आधारे अभ्यासावा.

हेही वाचा

अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानाचा शेतीमधील बियाणे विकसन, खतांचा वापर, सिंचन क्षमता संवर्धित करणे, कीडनियंत्रण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर करण्यासाठी होणारे प्रयत्न समजून घ्यावेत.

शेतीचे प्रकार

अभ्यासक्रमामध्ये नमूद शेतीच्या सर्व प्रकारांची वैशिष्ट्ये, त्यांमधील मूलभूत तत्त्व/ तंत्रज्ञान, निविष्ठांचे व्यवस्थापन, आर्थिक पैलू अशा मुद्द्यांच्या आधारे या संकल्पना आणि त्यांचे महत्त्व व मूल्यमापन अभ्यासायला हवे.

जलसिंचन आणि जलव्यवस्थापन

या मुद्द्यांच्या तांत्रिक बाबी पेपर एकमधील भागामध्ये पाहिल्या आहेतच. त्यांच्या आर्थिक बाबी म्हणजे सिंचनामुळे वाढणारी उत्पादकता, सिंचनातील कमी-आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय, जल व्यवस्थापनाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व या मुद्द्यांचा अभ्यास आवश्यक आहे.

पशूधन आणि त्याची उत्पादकता

कृषी उत्पादकतेमध्ये पशुधन संपत्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो. पशुधनाची संख्या, टक्केवारी व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली राज्ये व राज्यातील जिल्हे यांची माहिती आर्थिक पाहणी अहवालामधून करून घ्यावी.

पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबी क्रांती इत्यादींचा आढावा घ्यावा.

मत्स्य व्यवसाय

भूप्रदेशांतर्गत आणिअरबी सागरातील मासेमारी यांचा तुलनात्मक अभ्यास टेबलमध्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा: आवश्यक निविष्ठा, यंत्रे, उत्पादकता, मागणी, समस्या, कारणे, उत्पादकतेवरील परिणाम व उपाय इत्यादी.

मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण ही संकल्पना उत्पादन, साठवणूक व वाहतूक/ वितरण यासाठीची नवीन यंत्रे, तंत्रज्ञान, चालू घडामोडी अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावी.

मत्स्यपालन, मत्स्यशेती यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी त्यांचे प्रकार, आवश्यक पायाभूत सुविधा, निविष्ठा, उत्पादन, मत्स्यबीज निर्मिती व एकूणच मत्स्यपालन क्षेत्रासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय योजना या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करा.

पारंपरिक व तथ्यात्मक मुद्दे : कृषिविषयक शासकीय धोरण

यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित केंद्र व राज्य शासनांचे कायदे, त्यांमधील ठळक तरतूदी व चालू घडामोडींचा बारकाईने अभ्यास करायला हवा.

वेगवेगळया पंचवार्षिक योजनांमधील (विशेषत: १०, ११ व १२ व्या) कृषिविकासासाठीची धोरणे, योजना यांचा बारकाईने अभ्यास करावा. कृषिविषयक धोरणे अभ्यासताना जमीन सुधारणा, पिक उत्पादन, आयात-निर्यात, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या बाबतची शासकीय धोरणे व योजना इत्यादींचा आढावा सुरू झाल्याचे वर्ष, कालावधी, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, लाभाचे स्वरूप, मूल्यमापन अशा मुद्द्यांच्या आधारे घ्यावा.

अन्न व पोषण आहार

भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल समजून घ्यायला हवा. याबाबत मागणीचा कल, साठवणूक, पुरवठा यातील समस्या, कारणे, उपाय, योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम, उपाय आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे महत्त्व असे मुद्दे समजून घ्यावेत. सार्वजनिक वितरण प्रणाली, वखारी व तत्सम पायाभूत सुविधा यांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे.

अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. अन्न सुरक्षिततेमधील समस्या, त्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि उपाय व त्यादृष्टीने अन्नाची आयात व निर्यात या बाबी समजून घ्याव्यात. अन्न सुरक्षा अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात. हरित क्रांतीचे स्वरूप आणि पार्श्वभूमी समजून घेऊन तिचा अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर झालेला परिणाम समजून घ्यायला हवा.

अन्नाचे कॅलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहार, मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषण मूल्य यांचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल.

भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, याबाबतची शासनाची धोरणे, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन इत्यादी योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रमांचा उद्दिष्टे, स्वरूप, लाभार्थी अशा मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या शासकीय धोरणे, योजना यांचा अभ्यास सुरू झालेले वर्ष, कालावधी, संबंधित पंचवार्षिक योजना, उद्दिष्टे, ध्येये, यशापयश, आर्थिक आणि राजकीय आयाम या मुद्द्यांच्या आधारे करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

steelframe.india@gmail.com