एलएलएम वापरतानाची पद्धत म्हणजे आपण आपल्यासाठी लिहिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये यूजरला प्रश्न विचारण्याची सोय उपलब्ध करून द्यायची. हे प्रश्न आपण एलएलएमकडे पाठवायचे. एलएलएमकडून त्यांची उत्तरं मिळतात. ही उत्तरं आपण प्रश्न विचारणाऱ्या यूजरला दाखवायची. म्हणजेच आपलं सॉफ्टवेअर हे यूजर आणि एलएलएम यांच्यामधला दुवा म्हणून काम करणार.

ओपन एआय कंपनीचं चॅट जीपीटी, गुगलचं जेमिनी, मेटा कंपनीचं लामा ही आघाडीची एलएलएम मानली जातात. जर आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये यांचा समावेश करायचा असेल तर काही वेळा यासाठी पैसे मोजावे लागतात. ही रक्कम जवळपास नगण्य असली तरी एलएलएम शिकू पाहणाऱ्या लोकांसाठी हा मुद्दा लक्षणीय ठरू शकतो. अशा वेळी एलएलएम शिकण्यासाठीच्या मोफत पर्यायांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. यासाठी मेटा कंपनीचं लामा हे एलएलएम आपण विचारात घेऊ शकतो. हे ‘ओपन सोर्स‘ सॉफ्टवेअरच्या प्रकारात मोडत असल्यामुळे आपल्याला त्याच्या वापरासाठी काही भुर्दंड पडत नाही. याखेरीज गेमा आणि मिस्त्राल ही एलएलसमसुद्धा आपल्याला अगदी मोफत वापरता येतात.

एलएलएम वापरण्यासाठीचे दोन प्रमुख पर्याय आपल्यासमोर असतात. एक तर हे एलएलएम पूर्णपणे वेगळ्या संगणकावर चालतं आणि आपण आपल्या संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून या एलएलएमशी आपण संपर्क साधायचा असतो. म्हणजेच हे एलएलएम प्रत्यक्षात वेगळ्याच संगणकावर असतं. थोडक्यात म्हणजे शब्दकोश आणि माहितीकोश या सगळ्या गोष्टी दुसरीकडे कुठेतरी असाव्यात आणि आपण हवं तेव्हा त्यांच्यामधली माहिती इंटरनेटद्वारे मिळवावी, असा हा प्रकार असतो. दुसरा पर्याय म्हणजे आपण संपूर्ण एलएलएमच आपल्या संगणकावर ‘डाऊनलोड’ करून आपल्या संगणकावरच वापरायचा. अर्थातच यासाठी प्रचंड मोठ्या आकाराचा एलएलएम आपल्या संगणकावर आपल्याला ठेवावा लागतो. या पर्यायाचा फायदा म्हणजे संपूर्ण एलएलएम आपल्या संगणकावरच असल्यामुळे कुठलीही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला इतर कुठल्याही संगणकाकडे जावं लागत नाही. साहजिकच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या संगणकावरच मिळतात. यामुळे आपलं काम जास्त वेगानं होतं. अशा प्रकारे आपल्या संगणकावर डाऊनलोड करून आपण वापरू शकू असं लोकप्रिय एलएलएम ‘गेमा’ नावाचं आहे.

एआयच्या क्षेत्रामध्ये तांत्रिक स्वरूपाचं काम करू इच्छिणाऱ्या लोकांनी या सगळ्याविषयी आणखी माहिती मिळवणं गरजेचं आहे. यासाठी खास कुठला अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. यूट्यूबवर यासाठी अनेक चित्रफिती आहेत. तसंच इंटरनेटवरही या संदर्भात बरेच लेख वाचायला मिळतील. ज्यांना पुस्तकांमधूनच शिकायला आवडतं त्यांनी ‘जनरेटिव्ह एआय’ या विषयावरची पुस्तकं वाचावीत. तसंच या संदर्भातलं काम प्रामुख्यानं पायथन भाषेतून होत असल्यामुळे ज्यांना पायथन येत नसेल त्यांनी पायथन शिकून घेणंही गरजेचं आहे. अर्थात हे झालं सॉफ्टवेअर क्षेत्राच्या संदर्भातलं काम. ज्यांना नवनिर्मितीक्षम एआयचा वापर आपल्या दैनंदिन कामामध्ये करायचा असेल आणि त्यांचा सॉफ्टवेअर किंवा कोडिंग वगैरेंशी दुरूनही संबंध नसेल त्यांच्यासाठीसुद्धा नवनर्मितीक्षम एआयचा वापर करण्यासाठीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांचं काम सोपं व्हावं, त्यांना आत्ता जमत नसलेल्या अनेक गोष्टी त्यांनी सहजपणे साध्य कराव्यात यासाठी बरेच पर्याय यातून उपलब्ध होतात. हा स्वतंत्र विषय असल्यामुळे त्याला इथे स्पर्श केलेला नाही; पण त्यासंबंधीचे मुद्दे नंतर आपण बघणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही जणांच्या मते स्वत:चं एलएलएम तयार करणं हा एक अत्यंत मोठा प्रकल्प असू शकतो. इतर काही तज्ज्ञ लोकांच्या मते मात्र आता जागतिक पातळीवरची इतकी विशाल आणि यशस्वी एलएलएम आधीपासूनच तयार असताना आपण नव्यानं आपलं एलएलएम तयार करण्यात कसलंच शहाणपण नाही. म्हणजेच जसं जावा, पायथन यांच्यासारख्या संगणकीय भाषा आधीपासूनच तयार असताना खरोखर जगावेगळं किंवा नावीन्यपूर्ण असं काही असेल तरच आणखी नवी संगणकीय भाषा तयार करण्याचं अतिक्लिष्ट काम हाती घेण्यात मतलब असेल. अन्यथा हा इतका महाप्रचंड प्रकल्प हाती घ्यायचा आणि त्यातून नवं काहीच निष्पन्न व्हायचं नाही; असं होण्याचीच शक्यता खूप दाट आहे. भारतानं स्वत:चं एलएलएम तयार करावं अशा मतप्रवाहाच्या लोकांनी खरोखरच या मुद्दयांचा सर्वांगांनी विचार करावा. आपण एलएलएम तयार करण्यापेक्षा तयार असलेल्या एलएलएमचा वापर आपली कामं आणखी उत्तम प्रकारे करण्यासाठी कसा करता येईल, यावर आपण भर दिला पाहिजे असं विख्यात आयटी तज्ज्ञ नंदन निलेकणीसुद्धा म्हणतात.
akahate@gmail. com