आपण कंपनीमध्ये कुठलेही पद स्वीकारले तरी त्या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्या पदासाठी लागणारे कौशल्य प्रत्येकाला अंगीकारावे लागते. जेव्हा एखादे नेमून दिलेले काम आपल्याला पूर्ण करावयाचे असते त्यावेळेला मी आणि परिस्थिती या दोन्ही घटकांविषयी मनामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे.
नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या ताणतणावांविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आपण कंपनीमध्ये कुठलेही पद स्वीकारले तरी त्या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्या पदासाठी लागणारे कौशल्य प्रत्येकाला अंगीकारावे लागते. काही वेळा एकाच पदावर असून देखील निरनिराळ्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. काही वेळा परिस्थिती अनुकूल असते तर काही वेळा ती प्रतिकूल देखील असते.
आपण जेव्हा परिस्थिती असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये होत असतो. उदाहरणार्थ टीम मधल्या इतर सहकाऱ्यांबरोबर होणारी संवाद प्रक्रिया, त्या संवादाला दिलेला इतरांनी प्रतिसाद, काम पूर्ण होण्यासाठी ठरलेला अजेंडा, त्यासाठी लागणारा कालावधी या सर्व गोष्टींमध्ये टीममधील इतर सहकाऱ्यांचे देखील एकमत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ठरलेले काम पूर्ण होण्यासाठी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या त्यामध्ये असलेली प्रत्येकाची भूमिका या सर्व गोष्टींचा समावेश परिस्थिती मध्ये होतो असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा एखादे नेमून दिलेले काम आपल्याला पूर्ण करावयाचे असते त्यावेळेला मी आणि परिस्थिती या दोन्ही घटकांविषयी मनामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण परिस्थितीला दोष देताना दिसतो पण आपणही त्या परिस्थितीचा एक महत्त्वाचा घटक आहोत याकडे आपले दुर्लक्ष होते आणि त्यातूनच ताणतणावाची निर्मिती सुरू होते.
ताणतणावांचे वर्गीकरण १. तात्कालिक ताणतणाव व २. दीर्घकालीन ताणतणाव असे करावे लागेल.
तात्कालिक ताणतणावाची कारणे
● कामाचे भरगच्च वेळापत्रक
● अचानक वाढलेले काम
● इतर सहकाऱ्यांबरोबर असलेला असमन्वय
● स्वत:च्या क्षमता बाबत असलेली साशंकता
● कामाच्या प्रक्रियेविषयी असलेली अपुरी माहिती
● काम पूर्णत्वाला नेताना वाटणारी चिंता व काळजी
वरील सर्व कारणे अचानक वाढलेल्या कामामुळे येणाऱ्या तात्कालिक ताणतणावास कारणीभूत ठरताना दिसतात.
दीर्घकालीन ताणतणावाची कारणे
● सतत असलेला कामाचा अतिरिक्त बोजा
● आपली नोकरी टिकेल का नाही याविषयी मनात असलेली साशंकता
● टीममध्ये इतर सदस्यांकडून होणारे सततचे असहकार्य.
● अतिरिक्त काम करून देखील त्याचे वरिष्ठांकडून झालेले दुर्लक्ष
● अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करून देखील न झालेली पगार वाढ
● अतिरिक्त कामामुळे होणारे प्रकृतीतील चढ-उतार
अशी अनेक कारणे आपल्याला दिसून येतील परंतु सर्व कारणांकडे नीट पाहिल्यास बहुतेक कारणांचा केंद्रबिंदू आपण स्वत: आहोत हे आपल्या लक्षात येईल. ज्या-ज्या ठिकाणी ताणतणाव इतरांच्या वर्तणुकीमुळे निर्माण होणार आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला स्वत:वरच काम करावे लागणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वत:च्या क्षमतांवर आणि कमतरतांवर काम करावे लागणार आहे हे निश्चित पुढील काही भागांमध्ये आपण याविषयी अधिक जाणून घेणार आहोतच.
drmakarandthombare@gmail. com