scorecardresearch

यूपीएससी सूत्र : वाळवंटीकरणासंदर्भात संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन, दक्षिण आशियातील वायू प्रदूषण अन् उत्तराखंडमधील दुर्घटना, वाचा सविस्तर…

लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण ग्रेट ग्रीन वॉल, दक्षिण आशियातील वायू प्रदूषण आणि उत्तराखंडमधील दुर्घटना काय आहे. तसेच ते यूपीएससीसाठी महत्त्वाचे का? याबाबत जाणून घेऊया.

UPSC Key
वाळवंटीकरणासंदर्भात संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन, दक्षिण आशियातील वायू प्रदूषण अन् उत्तराखंडमधील दुर्घटना, वाचा सविस्तर… ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) वाळवंटीकरणासंदर्भात संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन?

उझेबेकिस्तानमधील ऐतिहासिक समरकंद शहरात नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या वाळवंटीकरणाशी धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेचे (कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन, यूएनसीसीडी) अधिवेशन झाले. या अधिवेशनात १९६ देशाचे सुमारे ५०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रथमच या संस्थेने मध्य आशियात अधिवेशनाचे आयोजन केले होते.

Chatura Article on Chandrapur polution effect on reproduction health
चतुरा : बदलते वातावरण, प्रदूषण देतेय नपुंसकतेला आमंत्रण!
Evergrande
विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?
ukrain attack
अन्वयार्थ : युक्रेनची नवी ‘आघाडी’..
india saudi arabia friendship
भारत-सौदी अरेबिया मैत्रीचा नवा अध्याय… भारताला कोणता फायदा?

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण-जैवविविधता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे उझेबेकिस्तानमधील अधिवेशनात नेमकं काय घडलं? आणि कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन ही संस्था नेमकी काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

यूएनसीसीडीने दिलेल्या माहितीनुसार, वाळवंटीकरणामुळे दरवर्षी सुमारे दहा कोटी हेक्टर सुपीक जमीन कमी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनीचा ऱ्हास सुरू राहिल्यास २०३० पर्यंत १.५ अब्ज हेक्टर जमिनीचे वाळवंटीकरण होऊन जमीन नापीक होण्याची भीती आहे. वाळू आणि धुळीच्या वादळांमुळे सुपीक जमिनी नापीक होत आहेतच. त्याशिवाय ही वादळे पिकांचे नुकसान करतात. चराऊ जमिनी, कुरणे कमी होऊन चाऱ्याची कमरता जाणवत आहे. त्याचा विपरीत परिणाम पशुधनावर होत आहे. मातीच्या वरच्या भागावर वाळू पसरत असल्यामुळे गवताळ कुरणे नाहीशी होत आहेत. वाळू साचलेल्या भागात वातावरणात धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्याला स्थानिक औद्योगिक, वायू प्रदूषणाची जोड मिळत आहे. श्वसनांचे विकार, आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. धुळीच्या वादळांमुळे अनेकदा दळणवळणाच्या, वीज निर्मितीच्या यंत्रणा निकामी होत आहेत. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. धुळीच्या वादळांमुळे जगभरात अनेकदा हवाई सेवाही विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाळवंटीकरणामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि एकूणच पाणी टंचाईचा प्रश्नही गंभीर होताना दिसत आहे.

यूएनसीसीडी काय आहे?

१९९४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिर्फिकेशनची ( यूएनसीसीडी ) स्थापना करण्यात आली. यूएनसीसीडीने २०३० पर्यंत १० कोटी हेक्टर जमिनी पुन्हा सुपीक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर वर्षाला साधारण एक कोटी हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड करावी लागणार आहे. पण, त्या वेगाने वृक्ष लागवड होताना दिसत नाही.

  • ‘ग्रेट ग्रीन वॉल’ म्हणजे काय?
  • वाळवंटीकरण रोखणास ‘ग्रेट ग्रीन वॉल’ मदत करणार?
  • भारतातही ग्रेट ग्रीन वॉलची उपाययोजना आहे का?

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) दक्षिण आशिया वायू प्रदूषणाचे केंद्र?

दिवाळीच्या आधी दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांत हवेची गुणवत्ता ही घातक ते अतिघातक अशा श्रेणींमध्ये राहिल्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. भारतातील अन्य शहरेच काय, पण पाकिस्तानातील लाहोर आणि बांगलादेशची राजधानी ढाक्यासारखी शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे दक्षिण आशियात वायू प्रदूषण नेमकं का वाढते आहे? भारतीय उपखंडात प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर? प्रदूषण कमी करण्यात अडचणी कोणत्या? आणि प्रदुषण रोखण्यासाठी सध्याच्या उपाययोजना पुरेशा आहेत का? यासंदर्भातील अभ्यास करणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

जगातील सर्वाधिक प्रदूषित चार शहरे दक्षिण आशियात आहेत. सर्वात जास्त प्रदूषित १० शहरांपैकी नऊ शहरे याच उपखंडात आहेत. प्रदूषित ४० शहरांपैकी तब्बल ३७ शहरे भारतीय उपखंडामध्ये मोडतात. या भागातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही विषारी श्वास घेत असते. हवेच्या गुणवत्तेचे मानक निश्चित करताना त्यातील धुळीच्या कणांची मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिली आहे. दक्षिण आशियातील प्रदूषित शहरांमध्ये या किमान मर्यादेपेक्षा किती तरी जास्त प्रमाणात धुळीचे कण आढळतात. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे दीर्घकालीन व लवकर बरे न होणारे रोग होतात. या आजारांमुळे दक्षिण आशियात दरवर्षी २० लाखांपेक्षा जास्त लोक अकाली मरण पावतात.

मुळात दक्षिण आशियामध्ये वाऱ्याची दिशा मुख्यत: वायव्य ते आग्नेय अशी असते. धुळीचे कण हवेमध्ये शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकतात. हे धूलिकण शहरे, राज्येच नव्हे, तर अगदी देशांच्या सीमाही ओलांडतात. उदाहरणार्थ, भारतातील पंजाबात ३० टक्के वायू प्रदूषण पाकिस्तानातून येणाऱ्या हवेमुळे होते, तर बांगलादेशात मोठ्या शहरांमध्ये जवळपास ३० टक्के हवेचे प्रदूषण भारतातून जाणाऱ्या हवेमुळे होते.

दक्षिण आशियात ऊर्जानिर्मिती आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जातो आहे. या उपाययोजना राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असल्या तरी पुरेशा नसल्याचे मत जागतिक बँकेच्या मार्टिन रेझर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शेती, लहान कंपन्या आणि घनकचरा व्यवस्थापनात कमी खर्चात होऊ शकणाऱ्या उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रेझर यांचे म्हणणे आहे.

  • दक्षिण आशियातील प्रदूषण कमी करण्यात अडचणी कोणत्या?
  • वायू प्रदूषण घटल्याचा फायदा काय होईल?
  • जागतिक बँक उपायही सुचवते का?

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) उत्तराखंडमधील दुर्घटना

उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन असेलल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग रविवारी (१२ नोव्हेंबर) कोसळून ४० कामगार आतमध्ये अडकले. या बोगद्यातून या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी उत्तराखंड सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील आपत्ती व्यवस्थापन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बोगद्याच्या आतला भाग कोसळण्याचे कारण काय? खडकामध्ये बोगदे कसे खणले जातात? तसेच या कामगारांना वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

कामगारांना वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न?

आरव्हीएनएल ( RVNL ) ने बोगद्याच्या ठिकाणी सहा इंच रुंद उभी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. या पाईपाद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल. तसेच एसजेव्हीएनएल ( SJVNL) कडून कामगारांची सुटका करण्यासाठी टेकडीवर एक उभा बोगदा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी गुजरात आणि ओडिशा येथून उपकरणं मागवण्यात आली आहेत. या कामात ओएनजीसीचीही मदत घेतली जात आहे. याबरोबरच बोगद्यातील कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बारकोटच्या बाजुने ४८३ मीटर छोटा बोगदा तयार करण्यात येत आहे. हे काम टीएचडीसीएल (THDCL) द्वारे करण्यात येत आहे.

तुमच्या माहितीसाठी :

बोगदा खणण्याचे काम दोन पद्धतींनी करण्यात येते. एक म्हणजे ड्रिल आणि स्फोट पद्धत (DBM) आणि दुसरी टनेल बोअरिंग मशीन (TBMs) वापरून बोगद्याचे उत्खनन करता येते. डीबीएम पद्धतीमध्ये ड्रिल मशीनने खडकामध्ये छिद्र पाडले जाते आणि नंतर त्यात स्फोट घडवून आणले जातात. स्फोटामुळे खडक फुटतो आणि मग तो खणून काढणे सोपे होते. टीबीएम पद्धत ही स्फोटकाच्या पद्धतीपेक्षा बरीच खर्चीक असली तरी ती सुरक्षित असल्याचेही म्हटले जाते. बोगद्याच्या प्रवेशदारापासून यंत्राच्या साह्याने आतमध्ये भोक पाडले जाते. जसजसे खडकाच्या आत यंत्र सरकत जाते, तसतसे मागून बोगद्याला काँक्रीटच्या आच्छादनाचा आधार दिला जातो. भारतात अनेक ठिकाणी टीबीएम यंत्र वापरून बोगदे खणले गेले आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc key current affairs desertification great green wall air pollution in south asia and uttarakhand tunnel collapse lsca spb

First published on: 21-11-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×