मुलाखतीमध्ये असलेल्या देहबोलीच्या महत्त्वाबाबत मागील लेखांमधून चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मुलाखत कक्षातील वातावरणाबाबत थोडक्यात चर्चा करूया. मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज मुलाखत मंडळाला आलेला असतो. तुम्ही तणावात आहात, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वस्थ आहात की घाबरलेल्या, गोंधळलेल्या मन:स्थितीत आहात याचा संदेश देहबोलीद्वारे समोरच्या मंडळींना जात असतो.

केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांतील मुलाखतींना सामोरे गेलेल्या आमच्या अनेक विद्यार्थाचा अनुभव असा आहे की, उमेदवार घाबरलेला किंवा तणावात दिसला की मुलाखत मंडळ उमेदवाराला सहकार्य करते. ‘तुम्ही शांतपणे आणि आरामात बसा. घाबरू नका, चहा, कॉफी, किंवा थंड पाणी घ्याल का’ असे उमेदवाराला विचारले जाते. सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार न करता, उमेदवाराला मोकळे वाटावे, त्याने बोलते व्हावे यासाठी नाव, गाव, शैक्षणिक पात्रता, अशा वैयक्तिक माहितीवर आधारित साध्या, सोप्या प्रश्नांपासून मुलाखतीला सुरुवात होते.

मुलाखत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण करण्यासाठीचे माध्यम असते. त्यामुळे ही प्रश्नमंजुषेसारखी प्रश्नोत्तरांची साखळी नसते. उलट यामध्ये वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत उमेदवाराशी संवाद साधला जातो. अशा सहज संवादामधून त्याची मते, विचार, आकलन, निर्णयक्षमता, विश्लेषणक्षमता या बाबी तपासण्यात येतात. मुलाखत ही गांभीर्याने घेतली / दिली जात असली तरी कक्षातील वातावरण तणाव येण्याइतके गंभीर न होऊ देण्याची काळजी मुलाखत मंडळाचे सदस्य घेत असतात.

मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी. अशा वेळी योग्य पद्घतीने हळूहळू घोट घेऊन प्यावे. खूप घाईघाईने संपवण्याचा प्रयत्न करू नये. मात्र मंडळासमोर बसून चहा/कॉफी घेताना अवघडलेपणा येईल असे वाटत असेल तर नम्रपणे ऑफर नाकारली तरीही हरकत नाही. कधी कधी मुलाखतीची दहा-पंधरा मिनिटे झाल्यानंतर उमेदवाराला तहान लागू शकते. अशा वेळी सरळ समोरचा ग्लास उचलून पाणी प्यायला सुरुवात करू नये. ‘सर, मी पाणी पिऊ शकतो / शकते का?’ अशा शब्दांत मुलाखत मंडळाची परवानगी घ्यावी. परवानगी मिळाल्यावर धन्यवाद देऊन पाणी घ्यावे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत सर्वसाधारणपणे २५ ते ३५ मिनिटे तर राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत २० ते ३० मिनिटे चालते. उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार हा वेळ वाढतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी संयम ठेवावा. हातातील घडय़ाळात वेळ पाहण्यासारखा आततायीपणा अजिबात करू नये.मुलाखत कक्षातील वातावरणाचा तुमच्या सादरीकरणावर परिणाम होत असतो. हे वातावरण सहज राहील याची काळजी मुलाखत मंडळ सदस्य घेत असतात तशी ती तुम्हीही घेणे आवश्यक आहे. मुलाखत सुरू असतानाच आपल्या सादरीकरणाबाबत अंदाज बांधायला सुरुवात करू नये. मुलाखत सुरू असतानाच अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यास नकळतपणे देहबोलीवर परिणाम होत असतात आणि हे बदल मुलाखत मंडळ सदस्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाहीत. तुमच्या दृष्टीने चांगले प्रदर्शन झाले असेल तर चांगले गुण मिळण्याच्या विचाराने तुम्ही गरजेपेक्षा जास्त मोकळे आणि सहज होण्याची शक्यता असते. किंवा तुमच्या दृष्टीने वाईट प्रदर्शन झाले असेल तर कमी गुण मिळणार या भीतीने तुम्ही उगाचच तणावामध्ये येऊ शकता किंवा अवघडून जाऊ शकता. सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही अंदाजांमुळे तुमची मन:स्थिती आणि परिणामी मुलाखत कक्षातील वातावरण बदलू लागते. बहुतांश वेळी हा बदल उपकारक नसतो. त्यामुळे तुमच्या सादरीकरणाबाबतच्या विचारांचा मुलाखत कक्षातील वातावरणावर परिणाम होऊ नये याची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. मुलाखत कक्षातील वातावरणाबाबत समजून घेतल्यावर या वातावरणामध्ये होणारा संवाद, प्रशोत्तरे यांना कशा प्रकारे सामोरे जावे याची चर्चा पुढील लेखामध्ये करू या.