24 November 2020

News Flash

करिअर कथा : प्रवाशांचा दोस्त

पहिल्या नोकरीत अपेक्षेप्रमाणे पगारवाढ मिळाली नाहीच आणि बढतीही मिळण्याची शक्यता नव्हती.

मुंबईकर आणि मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी एम. इंडिकेटरहा परवलीचा शब्द झाला आहे. आजच्या घडीला दीड कोटी प्रवासी हे अ‍ॅप वापरत आहेत. त्याचे जनक सचिन टेके यांच्या करिअरची कथा..

मुंबई लोकल, बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी  या सेवा सर्व प्रवाशांचा श्वास आहेत. या सर्व सेवा आणि त्याविषयीची एकत्रित माहिती एका क्लिकवर आणण्याची जादू सचिन टेके या तरुणाने केली. टेके यांचे ‘एम. इंडिकेटर’ हे अ‍ॅप प्रत्येक मुंबईकराचीच नव्हे तर बाहेरगावाहून मुंबईला येणाऱ्या प्रत्येकाची गरज बनले आहे.

दहिसरच्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या शाळेत सचिन शिकले.  शाळेतील विज्ञान प्रदर्शनातून त्यांचा कायम सहभाग असायचा. रुपारेलमधून बारावी झाल्यावर त्यांनी व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेतला आणि बी.ई. (आयटी) पदवी मिळविली. ‘व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक’ हा आवडीचा विषय असल्याने सचिनना त्यातच करिअर करायचे होते.  कॅम्पस मुलाखतीमधून त्यांना एका मोबाइल सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. इथे काम करता करताच त्यांचे‘एमबीए’साठी प्रयत्न सुरू होते. याआधी पूर्णवेळ ‘एमबीए’ करण्यासाठी त्यांनी चार वेळा प्रयत्न केले पण प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे जमनालाल बजाज संस्थेत फायनान्सह्ण या विषयातील एमबीएचा अर्धवेळ अभ्यासक्रम करायचे त्यांनी ठरवले.

पहिल्या नोकरीत अपेक्षेप्रमाणे पगारवाढ मिळाली नाहीच आणि बढतीही मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला रामराम ठोकला. नंतर ते दुसऱ्या एका अग्रगण्य मोबाइल कंपनीत रुजू झाले. पण तिथले वातावरण आणि कार्यसंस्कृती न आवडल्याने अवघ्या पाच दिवसांत त्यांनी राजीनामा दिला. मग सचिनने संपूर्ण लक्ष ‘एमबीए’वर केंद्रित केले. आणि ते पूर्णही केले.   नोकरीच्या-शिक्षणाच्या निमित्ताने लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी या माध्यमांतून प्रवास करताना सचिनना त्यातल्या समस्या जाणवत गेल्या. त्यावर आपल्यासारख्या प्रवाशांना उपयोगी पडेल असे काही करावे, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात घोळू लागली.  यातून ‘एम. इंडिकेटर’चा जन्म झाला. हे अ‍ॅप तयार केल्यानंतर सचिनने सुरुवातीला मित्र, परिचित, नातेवाईकांना दाखविले. प्रत्येकाने केलेल्या सूचनांनुसार त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. पहिले सहा महिने ‘एम. इंडिकेटर’ने फारसा जोर पकडला नव्हता. अवघ्या अडीच हजार लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले होते. पुढच्या दहा महिन्यांत मात्र हीच संख्या दहा लाखांच्या वर गेली.

आजच्या घडीला दीड कोटी लोकांनी ‘एम. इंडिकेटर’ डाऊनलोड केले आहे. सुरुवातीला सगळा एकहाती कारभार असल्याने अ‍ॅपची जाहिरात, प्रसिद्धी, विपणन आदी सर्व जबाबदाऱ्या सचिन एकटेच पाहत होते. त्यांनी ‘एम. इंडिकेटर’मध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग केले. आज वेगवेगळ्या प्रकारच्या २० सेवा या अ‍ॅपमध्ये आपल्याला मिळतात. उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी ‘लाइव्ह चॅट’ हे एम. इंडिकेटरचे खास वैशिष्टय़ आहे. गुगल नकाशाच्या मदतीने तुम्ही ज्या ठिकाणी असाल तेथे काही अडचणीचा प्रसंग उद्भवला तर त्या भागातील पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याची थेट सुविधाही आता ‘एम. इंडिकेटर’वर आहे. ‘एम. इंडिकेटर’ आज यशस्वी झाले असले तरी सुरुवातीची काही वर्षे खूप कठीण होती. चिकाटी, जिद्द, परिश्रम आणि नवनव्या कल्पनांच्या जोरावर सचिन यांनी ‘एम. इंडिकेटर’ला यशाच्या शिखरावर नेले. आज सचिनकडे पंधरा जणांचा चमू काम करीत आहे. त्यांच्या ‘मोबॉण्ड डॉटकॉम’ या कंपनीच्या चार शाखा आहेत. ‘एम. इंडिकेटर’च्या धर्तीवर बाजारात अन्य काही ‘अ‍ॅप’ आलीही, पण प्रवाशांनी ती नक्कल नाकारली हेच टेके यांचे आणि ‘एम. इंडिकेटर’चे यश आहे. ‘एम. इंडिकेटर’नंतर नवीन काय? याची उत्सुकता सर्वानाच आहे, पण व्यावसायिक गुप्तता पाळत याविषयी सविस्तर काही न सांगता सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असे काही तरी वेगळे आणि नवीन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सचिन टेके यांनी सांगितले. या प्रकल्पावर सध्या त्यांची कंपनी काम करीत आहे.

तरुण नवउद्योजकांसाठी सचिना एकच सल्ला देतात. ते म्हणतात, प्रत्येकाच्या मनात नवीन काही तरी करण्याची ऊर्मी असलीच पाहिजे. तीच  तुम्हाला तुमच्या  ध्येयापर्यंत घेऊन जाते. कोणताही नवीन उद्योग/ व्यवसाय सुरू करताना थोडासा धोका असतोच. पण तो धोका पत्करायला हवा. सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता ते पचवण्याची ताकद ठेवायला हवी. निराश होऊ नये. उद्योग/ व्यवसायाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा. उद्योग/ व्यवसायाच्या सुरुवातीला भागीदारीचा अजिबात विचार करू नका. भागीदारीत उद्योग/ व्यवसाय सुरू केला की त्याचा परिणाम निर्णयप्रक्रि येवर होतो, तसेच उत्पादनालाही फटका बसू शकतो.

shekhar.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 2:24 am

Web Title: sachin teke carrier story m indicator
Next Stories
1 सांस्कृतिक क्षेत्रातील शैक्षणिक शिष्यवृत्ती
2 आयआयटीच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश
3 यूपीएससीची तयारी : भावनिक बुद्धिमत्ता
Just Now!
X