मागील लेखामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एक पारंपरिक मराठी आणि इंग्रजी या पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये वस्तुनिष्ठ पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयासाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. दोन्ही भाषांसाठी व्याकरणावर प्रत्येकी ४५ आणि उताऱ्यावरील आकलनाचे प्रत्येकी ५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. १०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशा काठीण्य पातळीचा असल्याचे लक्षात येते.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. भाषा विषयामध्ये भरपूर गुण मिळवण्याकरता भावार्थ व शब्दप्रभुत्व कमजोर असल्यास येणाऱ्या मर्यादा येथे कमी प्रमाणात जाणवतील. आणि त्यामुळे चांगला स्कोअर करता येईल. अर्थात पदवी परीक्षेची काठीण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येईल. एकूणच वस्तुनिष्ठ भाषा म्हटले तरी भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर हा पेपर कमी वेळेमध्ये यशस्वीपणे सोडविता येईल.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळमानाने तीन भाग दिसून येतात. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथकरण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे टेबल, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद्भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे  नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. यामुळे अनोळखी शब्द विचारला गेल्यास कॉमन सेन्स वापरून प्रश्न सोडविता येईल. इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचा टेबल आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचे टेबल पाठच असायला हवे. शब्दरचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.

मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांशी संबंध ओळखता येणे महत्त्वाचे आहे. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन  सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो. कॉमन सेन्समुळे म्हणी आणि वाक्प्रचारांचा इतर प्रसंगांशी संबंध जोडता येणे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा पिंट्रआउट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी, उकारांमधील बदलामुळे तसेच काना, मात्रा, वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात) आणि पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे / स्पेलिंगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द Tricky ठरतात. उदा. Expect आणि except  या शब्दांमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

व्याकरणाचे नियम पक्के केले तरी भाषा विषयाच्या तयारीमध्ये त्या त्या भाषेतील वेगवेगळ्या विषयांवरचे लेखन वाचनात येणे आणि त्याचे आकलन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आकलनासहित वाचन आणि नियमांचा सराव अशी रणनीती या पेपरच्या तयारीसाठी योग्य ठरेल.