मुख्य परीक्षा पेपर तीनमध्ये मनुष्यबळ विकास आणि मानवी हक्क या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या पेपरच्या तयारीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका नुसत्या पाहून चालणार नाहीत तर त्यांचे विश्लेषण आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. या पेपरच्या सन २०१५ पासूनच्या प्रश्नपत्रिकांमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

*  प्रश्न – खालील वैशिष्टय़ांच्या आधारे योजनेचे नाव सांगा.

  1. a) ही १९९३ साली सुरू झाली.
  2. b) ही सुशिक्षित बेरोजगार तरुण, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४०,००० प्रतिवर्षी आहे, त्यांच्यासाठी आहे.
  3. c) ही ग्रामीण आणि शहरी भागांसाठी आहे.
  4. d) हिचे मुख्य उद्दिष्ट तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणे हे आहे.

पर्यायी उत्तरे

१) इंदिरा गांधी रोजगार योजना

२) समग्र रोजगार योजना

३) पंतप्रधान रोजगार योजना

४) जवाहर ग्राम समृद्धी योजना

*  प्रश्न – एलेक्ट्रोफोरेसिस चाचणीनंतर पांढरे, पिवळे व लाल कार्डाचे वाटप कोणत्या आजारात होते?

१) हिमोफिलिया  २) सिकल सेल  ३) थॅलॅसेमिया   ४)एड्स

*   प्रश्न – मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कामकाज कोणत्या विभागामार्फत चालते?

  1. a) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग.
  2. b) उच्च शिक्षण विभाग.
  3. c) आरोग्य विभाग.
  4. d) प्रशासकीय विभाग.

पर्यायी उत्तरे

१) a फक्त २) a आणि b ३) a, b आणि c ४) वरील सर्व

*    प्रश्न – खालीलपैकी भारतीय शालेय शिक्षणात साहाय्य करणारी शिखर संस्था कोणती आहे?

१) केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड.

२) राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद.

३) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था.

४) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.

*  प्रश्न – राष्ट्रीय शहरी गरिबी कपात धोरणाचा (NUPRS) एक महत्त्वाचा घटक म्हणजे

१) शैक्षणिक संस्था, ग्रामीण गरिबांना उपलब्ध करून देणे.

२) निवारा व वाहतुकीची साधने शहरी गरिबांना उपलब्ध करून देणे.

३) दारिद्रय़रेषेखालील सर्व शहरी नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.

४) समाज झोपडपट्टी मुक्त बनविणे.

*    प्रश्न -भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

  1. a) मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वत:हून दखल घेऊ शकतो (कोणतीही औपचारिक तक्रार नसताना.)
  2. b) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.

पर्यायी उत्तरे

१) a आणि b दोन्ही विधाने बरोबर आहेत.

२) कोणतेही विधान बरोबर नाही.

३) फक्त a विधान बरोबर आहे.

४) फक्त b विधान बरोबर आहे.

*  प्रश्न – आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

१) आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष दशकपूर्तीच्या स्मरणार्थ.

२) इ. स.१९२१ मध्ये फ्रान्समधील कष्टकरी स्त्री संघटनांनी स्त्री अत्याचाराच्या विरोधात केलेल्या संघर्षांच्या स्मरणार्थ.

३) ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ.

४) ८ मार्च १९०७ रोजी स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या ठरावानुसार.

*   प्रश्न- खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे / आहेत?

१) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा स्थायी सदस्य आहे.

२) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा सदस्य या नात्याने श्रमिक कल्याणाच्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या मूल्यांकनासाठी योगदान देतो.

३) जिनिव्हा येथे सन २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे १०४ वे सत्र संपन्न झाले.

४) जिनिव्हा येथे सन २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेच्या कार्यकारिणी मंडळाचे ३२४ वे सत्र संपन्न झाले.

*  प्रश्न –  —————- यांच्या एकत्रीकरणामुळे वृद्धांसाठी फार गंभीर समस्या उद्भवली आहे.

  1. a) संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन.
  2. b) वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण आणि नागरीकरण.
  3. c) बदललेली सामाजिक मूल्यव्यवस्था.
  4. d) महिलांनी नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचे वाढते प्रमाण.

पर्यायी उत्तरे

१) a, b विधाने योग्य.

२) b, c, d विधाने योग्य.

३) a, b, c विधाने योग्य.

४) a, b, d विधाने योग्य.

प्रश्न २०११च्या जनगणनेनुसार भिन्नपणे सक्षम लोकांची अनुमानित संख्या किती आहे?

१) १८ दशलक्ष   २) २१.९ दशलक्ष

३) २६.८ दशलक्ष ४) ४० दशलक्ष

*  प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  1. a) विकास आणि नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव म्हणून विस्थापनाचा जनसंख्येच्या निवडक भागावर परिणाम होतो.
  2. b) आपत्ती आर्थिक व्यवस्थेचे नुकसान करते. आपत्तीने प्रभावित लोकांच्या पुनर्वसनासाठी भौतिक सोयी व वितरणाच्या जाळ्याशी चटकन पुनस्र्थापना करतील अशा कार्यक्रमांची व्यूहरचनांची गरज असते.

पर्यायी उत्तरे

१) फक्त  a चुकीचे

२) फक्त  b चुकीचे

३) दोन्ही विधाने अचूक

४) दोन्ही विधाने चूक

हे सगळे संबंधित घटकविषयाच्या एखाद्या पलू किंवा आयामाबाबतचे प्रातिनिधिक प्रश्न आहेत. तरीही केवळ या काही प्रश्नांवरून या पेपरच्या तयारीबाबत चौकट आखून घेता येणे शक्य होणार नाही. तयारी करताना इतर पेपर आणि या पेपरमध्ये काही मूलभूत फरक आहेत हे लक्षात घेणे आणि पुढील मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे.

*  कोणत्याही विषयाच्या तयारीमध्ये आवश्यक मूलभूत संज्ञा आणि संकल्पना इथेही समजून घ्यायच्या आहेत. मात्र या संकल्पना आणि संज्ञांबाबत स्वत:चे मत (योग्य व स्वीकारार्ह) बनवणे महत्त्वाचे आहे.

*  कायदे, कालक्रम, आंतरराष्ट्रीय ठराव व करार, संस्था याबाबतची तथ्ये नेमकेपणाने लक्षात ठेवावी.

*  अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकामध्ये समाविष्ट प्रत्येक मुद्दय़ाचा मूलभूत आणि आकलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

*  मानवी हक्क घटकातील मुद्दय़ांबाबत कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे.

*  मनुष्यबळ विकासामधील सर्व घटकांबाबत सद्य:स्थिती, महत्त्व, सामाजिक आयाम व शासकीय प्रयत्न, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम समजून घेणे आवश्यक आहे.

*  शासकीय योजना तसेच नेमलेले आयोग हे कल्याणकारी शासनाचे उपक्रम असतात. त्या दृष्टीने त्यांच्या तरतुदी, मूल्यमापन व इतर संबंधित महत्त्वाचे मुद्दे नेमकेपणाने माहीत असायला हवेत.

या विश्लेषणाच्या आधारावर पेपर तीनच्या तयारीबाबत चर्चा पुढील लेखापासून करण्यात येईल.