सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची असते – सगळ्यांसाठीच पण जास्त करून ज्येष्ठांसाठी. कारण गेल्या शनिवारी म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी भूक जास्त मंदावलेली असते, मग त्याची कसर भरून काढण्यासाठी नाश्ता- मस्ट, पण पौष्टिक. काही सोप्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या ‘आहार- त्रिसूत्री.’
१. चहा- बिस्कीट / टोस्ट / फरसाण नाश्ता असू शकत नाही.
२. चहा / कॉफी जास्त उकळलेली (कडक) नसावी. – सवय असेल तर ती मोडावी.
३. सकाळी उठल्यानंतर साधारण दोन-तीन तासांच्या अंतराने नाश्ता करावा. योग्य वेळ आठ ते नऊ दरम्यान. पूजा-पाठ करण्यात वेळ नाही म्हणून दहा-अकरा नंतर नाश्ता करणं पचन-आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
काही पौष्टिक नाश्त्याची उदाहरण :
सोमवार- तांदूळ / नाचणीची / ज्वारीची उकड
मंगळवार- सातूची पेज
बुधवार- जिरेसाळ-मेतकूट भात
गुरुवार- लापशीची / अळिवाची खीर
शुक्रवार- राजगिरा लाडू – दूध किंवा राजगिरा लाही – ताक
शनिवार- शाकाहारी उपमा / पोहे
रविवार- धान्य – कडधान्याच्या पिठाची धिरडी
कोणताही नाश्ता घेतला तरी दूध / ताक / दही / मोड आलेले मूग प्रथिनांसाठी बरोबरीने जरूर घ्यावे. एक लक्षात घ्या की नाश्ता योग्य वेळेवर आणि पोटभर घेतला की दिवसभर तरतरी तुम्ही टिकवू शकता.