01-badaltanaस्वत:ला बदलताना आपले शरीर-मन एकाच ठिकाणी असणे गरजेचे आहे. माणसाने आयुष्याचे प्राधान्यक्रम ठरवले तर शरीर-मनाने तो एकाच ठिकाणी असतो आणि साहजिकच त्याची कार्यक्षमता वाढते. त्यासाठी गरज आहे ती चित्तवृत्तीत बदल करण्याची. त्या चित्तवृत्ती आहेत, विक्षिप्त, क्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध वृत्ती.

माझे योगशिक्षक उदय पेंडसे हे अगदी साध्या भाषेत योग शिकवीत असत. ते सांगायचे, ‘योग म्हणजे युक्त होणं.’ आपण शरीराने जिथे असतो तिथेच मनाने असणे म्हणजे युक्त होणे. बऱ्याच वेळा असं होतं की शरीराने आपण एका ठिकाणी असतो, पण मन मात्र भलतीकडे कुठे तरी असतं. म्हणजेच शरीर जिथे आहे तिथे मन नाही आणि मन जिथे आहे तिथे शरीर नाही.
१९९१ मधली गोष्ट आहे. (आता परिस्थितीत चांगले बदल झाले असतील याची खात्री आणि आशा आहे.) मी त्यावेळी एका राष्ट्रीयकृत बँकेचे ऑडिट करायला गेलो होतो. त्या शाखेत अनेक कामे अपूर्ण होती, अनेक त्रुटी होत्या आणि शाखेचे व्यवस्थापक मला कळकळीने विनंती करीत होते की एक आठवडय़ाचा अवधी द्या, मी सगळे पूर्ण करतो. त्यांची अडचण त्यांनी सांगितली. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात भरती झाली होती. त्यांची शाखा महत्त्वाची होती. म्हणून वरिष्ठांनी त्यांच्या शाखेत नवीन तरुण स्त्रियांची नियुक्ती केली होती. त्यांचा आणि कामातील त्रुटींचा संबंध काय, हे मला कळेचना.
त्यांचे स्पष्टीकरण साधे होते. या तरुण मुली कामाला लागल्या तेव्हा लग्न व्हायच्या होत्या किंवा नुकतेच लग्न झालेल्या होत्या. ज्यांची नुकती नुकती लग्ने झाली होती त्यांच्या रजा, सण, डोहाळजेवण आणि पाठोपाठ बाळंतपणाच्या रजा यांनी ते वैतागले होते. ती रजा संपली तरी त्यांचे मन घरी-पाळणाघरात ठेवलेल्या मुलांमध्ये असायचे. मग मुलांची आजारपणे. पुन्हा रजा! ज्यांची लग्न व्हायची होती त्यांच्याही रजा सुरूच होत्या. वर्षांतला एकही दिवस असा जायचा नाही की चार-पाच जणी रजेवर नाहीत! कशी कामे वेळेवर व्हायची? पण पुढे ते हेही म्हणाले, की मी विचार करतो, माझी मुलगी असती तर तिने काय वेगळे केले असते? तिचाही जीव संसारात, मुलांत अडकलेला असता की! त्यामुळे मी जास्त वेळ बसतो आणि कामे करतो.
मध्यंतरी ते सकाळी फिरायला आले असताना भेटले. मला तेव्हा त्यांच्या अडचणीची आठवण झाली. ते आता निवृत्त झालेत. मी सहज त्यांना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझे शेवटचे पोस्टिंग हेड ऑफिसमध्ये झाले आणि माझ्या विभागात ७० टक्के महिला! जरा धाकधूकच होती. पण अगदी उलटा अनुभव आला. त्या विभागातल्या स्त्रिया इतके मनापासून कामे करायच्या की विचारू नका. कदाचित आता त्यांची घरातील जबाबदारी कमी झाली असेल, कदाचित आता त्यांच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटले असतील. पण हे मात्र नक्की की माझी भीती त्यांनी खोटी ठरवली. त्या काम करीत तेव्हा सगळे लक्ष कामावर असायचे. त्यामानाने पुरुषमंडळ पाटय़ा टाकायचे.’’
तर सांगायचे इतकेच की माणसाने प्राधान्यक्रम ठरवला तर शरीर-मनाने तो एकाच ठिकाणी असतो आणि साहजिकच त्याची कार्यक्षमता वाढते. भगवद्गीतेत म्हटलेच आहे, योग: कर्मसु कौशलम। थोडक्यात, स्वत:ला बदलताना आपले शरीर-मन एकाच ठिकाणी असणे गरजेचे आहे.
इथे मला पेंडसे सरांची आठवण येते. ते म्हणतात, पतंजली सूत्रांचे अंतिम ध्येय समाधी असले तरी त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला सुरुवात मात्र मनाच्या वृत्तींना नियंत्रित करण्यापासून करायला हवी. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. केवळ मनाला नियंत्रित करणे पुरेसे नाही. मन:शक्ती पुरेशी नाही. मनाला आवरणे पुरेसे नाही. ‘मन पाखरू पाखरू’ असते, ‘मन वढाय वढाय असते.’ हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्या चंचल मनाची अवस्था ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ याचा अनुभव सगळ्यांचा आहे. म्हणून आपण आपले सगळे लक्ष मनाच्या नियंत्रणावर म्हणजेच मनोनिग्रह, मनाची एकाग्रता आणि मन:शक्ती वाढवण्यासाठी करीत असतो. परंतु आधुनिक मानसशास्त्र म्हणते, अ‍ॅटिटय़ूड मॅटर्स. म्हणजेच वृत्ती महत्त्वाची! आणि पतंजली म्हणतात, चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्यांना नियंत्रित केले तरच स्वत:मध्ये बदल करणे शक्य आहे’ मला हे मनोमन पटले आहे आणि आपल्यात बदल करायचा झाला तर आपल्या वृत्तींमध्ये बदल करण्याला पर्याय नाही, हे माझे ठाम मत झाले आहे. परंतु वृत्ती म्हटली की सकारात्मक वृत्ती आणि नकारात्मक वृत्ती इतकेच प्रकार आपल्याला नजरेसमोर येतात. मग ‘पेला अर्धा भरला आहे म्हणायचे का सरला आहे म्हणायचे’ इथपासून अनिल अवचट म्हणतात तसे ‘पेला भरलेलाच असतो. आपल्याला रिकाम्या दिसणाऱ्या भागात हवा भरूनच असते की’ इतपर्यंत सगळ्या गोष्टी आठवतात. परंतु हजारो वर्षांपूर्वीच पतंजलींनी सांगितलं की चित्ताच्या वृत्ती अशा दोन ढोबळ भागांत नाही वाटता येत. म्हणून त्यांनी वृत्तींच्या पाच अवस्था सांगितल्या आहेत. त्या जाणून घेतल्या तर आपल्या अवस्था कोणत्या हे स्वत:चे स्वत:ला समजेल आणि आपण त्यावर काम करू शकू- त्या चित्तवृत्ती म्हणजे विक्षिप्त, क्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध.
विक्षिप्त- त्याचा साधा सरळ मराठीत अर्थ चमत्कारिक, तऱ्हेवाईक अशी वृत्ती. तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही मी बराचसा या प्रकारातला माणूस आहे. कोणत्या वेळी मी नेमकी कोणती प्रतिक्रिया देईन याचा समोरचा माणूस खात्रीलायकरीत्या सांगू शकत नाही. अगदी जवळची माणसंसुद्धा ‘तू काय करशील याचा नेम नाही’, असे म्हणतात.
याच्या उलट वृत्ती म्हणजे क्षिप्त वृत्ती. यात माणूस बऱ्याच प्रमाणात निश्चित प्रकारच्या प्रतिक्रिया देतो. तो कोणत्या प्रसंगी कसा वागणार आहे याची आपण कल्पना करू शकतो. उदाहरण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे यशोदा. तिच्या लग्नाच्या वेळी तिने परागची निवड कोणत्या निकषावर केली असं विचारलं, तेव्हा तिने तीन इंग्रजी शब्द वापरले ते इतक्या वर्षांनंतरसुद्धा माझ्या लक्षात आहेत. ती म्हणाली होती, Dependability, Reliability and Predictability अर्थात अवलंबून राहता येईल असा, विश्वास टाकावा असा आणि ज्याच्या वागण्याचा निश्चित अंदाज बांधता येईल असा ‘पराग’ आहे म्हणून मी त्याची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. माझे वडील दिवंगत माधव कानिटकर याच जातकुळीतले होते. पण त्याचमुळे आम्हाला ते आदर्श अप्पा वाटत असत. रात्री खूप उशिरा आलो किंवा सिगरेट खिशात सापडली तरी त्यांची प्रतिक्रिया निश्चित असायची. ते ‘असं तू वागू नयेस. हे चांगले लक्षण नाही.’ इतकेच सांगायचे. पुन्हा चूक झाली तर दोन दिवस अबोला. त्यांच्या क्षिप्त वृत्तीचा मी फायदा करून घेतला ( आणि नुकसानच झाले) हे नक्की. परंतु अशा वृत्तीची माणसेसुद्धा काही वेळा त्रासदायक असतात. त्यांचे रुटीन इतके ठरलेले असते की त्यांना त्यात काही बदल झाल्यास तो बदलही जुळवून घेताच येत नाही. अगदी साधे उदाहरण सांगतो. त्यांना रात्री झोपताना ठरावीक उशी लागायची. एकदा आमच्याकडे एक वयस्कर पाहुणे आले होते. त्यांना एकदम पातळ, मऊ उशी हवी होती. मी त्यांना दिली. वयपरत्वे पाहुणे लवकर झोपी गेले. पण अप्पांनी इतकी चिडचिड केली की मी त्या पाहुण्यांना झोपेतून उठवून त्यांची उशी बदलून अप्पांची उशी अप्पांना दिली. ही क्षिप्त वृत्ती.
तिसरी वृत्ती म्हणजे मूढ. ज्याला आपण मूर्खपणा समजतो. पण त्याचा खरा अर्थ अज्ञानी असा आहे. आणि तो जाणीवपूर्वक अज्ञानी राहणे पसंत करतो. त्याला अज्ञानात सुख वाटते. आणि हे सोयीस्कर अज्ञान असते. आमच्या कार्यालयात एक मुलगी होती. तिने हिशेबाची संगणक प्रणाली शिकून घ्यावी, असे तिला सुचवले. फीसुद्धा आम्ही भरू असे सांगितले. तिने साफ नकार दिला आणि तिच्याच एका सहकारीला तिने सांगितले, ‘मी एकदा का हे शिकले की तेच गळ्यात पडेल.’
एकाग्र आणि निरुद्ध या आणखी दोन वृत्ती आहेत. या दोन्ही वृत्ती महत्त्वाच्या आहेत. एकाग्रता ही कमावण्याची गोष्ट आहे. चित्त एकाग्र असेल तर नवीन ज्ञानग्रहण होईल. नव्या विचारांचा सारासार विचार करून निर्णय घेता येतील. कोणताही निर्णय उतावळेपणाने होणार नाही आणि प्रत्येक निर्णयाची काही तरी किंमत असते हे विसरले जाणार नाही. एकाग्र म्हणजे भानावर असणे. एकाग्र म्हणजे भवतालची जाणीव असणे. परिस्थितीची जाणीव असणे. अशी वृत्ती जास्तीत जास्त काळ राबवण्यात यशस्वी होणे हे आपल्या सगळ्यांचेच ध्येय असले पाहिजे.
शेवटची निरुध्द वृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीत स्वत:ला अडकवून टाकणे. आणि त्याच कोशात राहणे. असे झाले की वर्तमानाचे भान सुटते आणि नवा विचारच येऊ शकत नाही. स्वत:च स्वत:साठी निर्माण केलेल्या तुरुंगात अडकवून टाकणे. माझ्या पाहण्यात एक स्त्री आहे. तिच्या पतीच्या हातून एका अन्य स्त्रीच्या संदर्भात ‘भूल’ झाली आणि त्या निमित्ताने बरेच वाद झाले. प्रत्येक विवाहबाह्य़ संबंधांचा जसा शेवट होतो तसाच त्या संबंधांचाही झाला. पतीच्या प्रतारणेचा त्या स्त्रीला अतोनात त्रास झाला. तिचे मानसिक खच्चीकरण झाले. पतीलाही उशिरा का होईना शहाणपण सुचले. दुसऱ्या स्त्रीबरोबरचे संबंध संपूर्णपणे तोडले. अशी दोन वर्षे उलटली. पण ती स्त्री आपल्याशी प्रतारणा केलेल्या पतीच्या अपमानाच्या कृत्याच्या त्रासातून बाहेर पडत नाहीये. प्रचंड असुरक्षितता आणि संशय या पाठोपाठ येणाऱ्या भावनांतून तिला बाहेर पडता येत नाहीये. तिच्या निरुध्द वृत्तीचा त्रास तिला स्वत:ला होतोच, पण कुटुंब म्हणून ते उभे राहू शकत नाहीये. तिला या वृत्तीवर काम करणे हाच पर्याय उपलब्ध आहे. सारांश, वृत्तीत बदल हे स्वत:तील बदलांचे लक्ष्य ठरायला हवे!

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

तळटीप- वर विशद केलेल्या वृत्ती रामदेवबाबा यांच्या ‘योगसाधना एवं योग चिकित्सा रहस्य’ या पुस्तकातील योग परिचय या प्रकरणातील पृष्ठ एकनुसार आहेत. त्या केवळ लेखनाच्या सोयीने आणि लेखकाच्या त्या संकल्पनांच्या त्याला उमगलेल्या अर्थाप्रमाणे घेतल्या आहेत. प्रत्यक्ष पतंजली सूत्रात त्यांचा उल्लेख प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्र आणि स्मृती असे मराठी भाषांतर आहे. कोल्हटकर, प.वि. वर्तक आणि ओशो यांनी आपापल्या प्रकारे सूत्रांचे विवरण केले आहे. हा लेख म्हणजे पतंजली सूत्रांचा लेखकाला भावलेला अर्थ इतकाच घ्यावा, अशी लेखकाची भूमिका आहे. पतंजली वृत्तींची क्लिष्ट आणि किंवा त्रासदायक आणि काही न त्रास देणाऱ्या अशी प्राथमिक विभागणी केली आहे. परंतु प्रस्तुत लेखक प्रत्येक चांगली वृत्ती ही मर्यादा असते आणि प्रत्येक मर्यादा हेच सामथ्र्य ठरू शकते यावर भर देणाऱ्या गटातील असल्याने दोन्ही बाजूंचा विचार केला आहे. हे पतंजली सूत्रावरचे भाष्य नसून केवळ संदर्भ म्हणून याचा उपयोग केला आहे.