02 July 2020

News Flash

स्वत:ला बदलताना : स्वत:ला ओळखायला शिकू या

फक्त मला माहिती असलेल्या गोष्टींचा कप्प्यात जितका साठा मोठा तितकं मनावर जास्त ताण असणे स्वाभाविक आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये, आपल्या चुकांचे, घोड्चुकांचे वमन- कन्फेशन देण्याची एक

| September 13, 2014 01:02 am

फक्त मला माहिती असलेल्या गोष्टींचा कप्प्यात जितका साठा मोठा तितकं मनावर जास्त ताण असणे स्वाभाविक आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये, आपल्या चुकांचे, घोड्चुकांचे वमन- कन्फेशन देण्याची एक चांगली प्रथा आहे. पण आपल्या संस्कृतीत लपवून ठेवण्याची परंपरा आहे. मी गेली काही वर्षे माझ्या गुप्त कप्प्यातील बऱ्याचशा गोष्टी निदान एका व्यक्तीशी तरी जशा होत्या तशा सांगितलेल्या आहेत. तरी साठा संपलेला नाही. पण ताण-तणाव कमी होत आहेत याचा मी अनुभव घेत आहे. आत्मशोधाच्या या प्रक्रियेमुळे माणूस मोकळा होतोच, पण त्याला ओळखणेही सोपे होते..
मध्यंतरी एका मनोविकारतज्ज्ञांचा लेख वाचनात आला. त्यात ते म्हणतात, ‘रुग्ण बदलतात पण सामान्य माणसे बदलायला वेळ घेतात. कारण रुग्णांनी चटके खाल्लेले असतात. ती गोष्ट सामान्य माणसांच्या बाबतीत संभवत नाही.’ त्याच धर्तीची दुसरी घटना. माझे एक मित्र त्यांचा अनुभव सांगत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुठलेसे अध्यात्म योग-आहार-विहार या सगळ्यात बदल घडवून आणण्याच्या हेतूने एक शिबीर केले. शिबिरात सांगतात ते सर्व मनाला पटत गेले. या पुढे आपण इथे शिकवल्याप्रमाणे वागायचे असा त्यांनी निर्धार केला. सकाळी प्राणायाम मग १५-२० मिनिटांसाठी ध्यान असे वर्तणुकीतील बदल चालू केले. ते बऱ्यापैकी सातत्याने चालू ठेवले.
 तिथेच एक शिकवण मिळाली होती की मुलं तरुण झाली की पाहुण्यासारखे घरात राहायचे. (आपल्याकडे पाहुणेच अनेकदा घोळ घालतात ते जाऊ  द्या). अर्थात त्यांचे जे चालले आहे ते चालू द्यावे. त्यांच्या वागण्याचा त्रास करून घेऊ  नये आणि ते त्यांना अगदी प्रामाणिकपणे पटले होते. सुरुवातीचे काही दिवस मुलांच्या रात्री-अपरात्री बाहेर फिरण्याच्या सवयीकडे, त्यांचे उशिरा उठणे, सतत मोबाइल चिकटलेलं असणे या गोष्टींकडे पाहुण्याच्या भूमिकेतून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु वरकरणी ते बोलून दाखवत नव्हते. पण मनोमनी चिडचीड होत होती, आणि हळूहळू याच मुद्दय़ावर घरात वाद सुरू झाले. पाहुणेपण संपले व ‘पिता’ बोलू लागला. मुलं उलटी उत्तरे देऊ लागली. सगळे पुन्हा पूर्वीसारखेच घडू लागले. घरात वादविवाद. आईची फुकाची मध्यस्थी वगैरे वगैरे. त्यांनी सहज विचारलं, ‘असं सगळ्यांचं होतं का?’ (अगदी ओठावर आलं होतं, तुम्ही सामान्य (नॉर्मल) आहात ना? पण आवरतं घेतलं. मी सामान्य आहे हा गुन्हा आहे का असं प्रश्न त्यांनी विचारला असता तर मी काय उत्तर देणार?)
आता हेच बघा ना -मधुमेह आहे आणि त्याकरता औषधेही चालू आहेत. अशी परिस्थिती असतानासुद्धा आंबा दिसला की तुटून पडणारे मधुमेही काही कमी नसतात. सरासरी ५० टक्के मधुमेहींना औषधं टाळण्यात बरे वाटते. ‘रोज उठून गोळ्या? घशाखालीच उतरत नाहीत. रोज ते इन्शुलीन घेणं नकोच वाटते. किती वेळा भोस्कायच्या त्या सुया? आणि सध्या माझी साखर नॉर्मल आहे.’ अशा तक्रारी करणारे पुष्कळ आहेत. मधुमेह आटोक्यात ठेवायचा असेल तर आहार-विहारात बदल करावा लागतो हे सत्य आहे. केवळ औषधांनी फरक पडत नाही. तुमचे खाण्याचे वेळापत्रक, त्यातील त्याज्य पदार्थ, कमी खायचे पदार्थ यांची यादी प्रत्येक डॉक्टर देतात. व्यायामाला पर्याय नाही. रोज किमान ४५ मिनिटे चाला असे सांगितलेले असते, पण-‘काय जोराचा पाऊस, रात्री जागरण झाले ना! मला नवीन शूज घ्यायला हवेत चपला घालून चाललं की घोटे दुखतात’ अशी कारणे सांगतातच ना माणसं.( मी स्वत: त्याला अपवाद नाही). काहीजण तर अशी कारणे सांगतात की माणसाने थक्कच व्हावे. आमची एक नातेवाईक सांगते, ‘मी रोज प्राणायाम करते. मग व्यायामाची गरज काय?’ हल्ली हे नवीन प्रस्थ झालं आहे, ‘सब बीमारीयों की दवा- प्राणायाम.’ याला काय म्हणावे ते समजत नाही. व्यायाम आणि योगाभ्यास ही स्वतंत्र शास्त्रे आहेत. त्यापैकी अनेक योग प्रकारांचा उपयोग आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो, हेही आता जगाच्या समोर आले आहे. मेडिकल योग ही स्वतंत्र शाखा विकसित होत आहे हे सगळे मान्य करूनही, औषधांना अनुलोम-विलोम, कपालभाती पूरक ठरू शकतात, पर्याय नाही.
हे त्या माणसाला पक्के माहिती असते. परंतु माणसाच्या मनात बचावाच्या विविध अस्त्रांचा वापर करण्याची देणगी दिलेली असते. निसर्गाने दिलेल्या अस्त्रांचा सढळ वापर आपण करत असतो. आणि हे अस्त्र अशासाठी की सामान्यपणे शस्त्रे अपुरी ठरली तर अस्त्र हा शेवटचा उपाय असतो. परंतु माझ्यासारखी थोडी अ‍ॅबनॉर्मल माणसापासून सर्व नॉर्मल माणसं ही अस्त्रे घेऊन सज्जच असतात. त्यांच्या वागण्याचे जितक्या प्रकारे समर्थन करता येईल तितक्या प्रकारे ते करीत राहतात. ते जमण्यातील नसेल तर पुढचं अस्त्र- माझ्या अशा वागण्याला तो किंवा ती किंवा परिस्थितीच जबाबदार असते. एकदा मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात काम करत असताना एका रुग्ण-मित्राने मला विचारले-‘महेंद्रसर, समजा. म्हणजे समजा. तुमची बायको मुलाबाळांना घेऊन माहेरी गेलेली, माझी नोकरी सुटलेली, आई-वडील म्हातारे आणि एक दोन महिन्यांच्या अवधीत आई आणि वडील वारले, जी एकुलती एक बहीण मला मदत करी तिने ‘माझ्या दारात पाऊल टाकशील तर पोलिसांना बोलावून हुसकावून लावीन’ असे निर्वाणीचे सांगितले आहे अशा परिस्थितीत तुम्ही प्रचंड निराश व्हाल की नाही? आणि मग दारू पिण्याला काही दुसरा पर्याय असेल तर सांगा’- हे ते इतरांवर जबाबदारी टाकायचे अस्त्र.
आणि शेवटचे ब्रह्मास्र म्हणजे -तो मी नव्हेच!
सारांश काय, माणसं नॉर्मल असू देत अथवा अ‍ॅबनॉर्मल. अस्त्रे कायम परजलेलीच!
तेव्हा स्वत:ला बदलण्याची क्रिया सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची क्रिया करावी लागते. ती म्हणजे आत्मचिंतन आणि स्वत:चा अभ्यास करण्याची.
  काल माझी समुपदेशक सहज बोलून गेली- ‘तुला नेमकं काय वाटते आहे हे आपण एकमेकांना १८ वर्षे ओळखत आहोत तरी मला अंदाज बांधता येत नाही!’ मला तरी- मी, नेमका कसा आहे ते १०० टक्के थोडेच ठाऊक आहे? माझ्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला आणि मला दोघांनाही ठाऊक आहेत. समाजाला ठाऊक आहेत. उदाहरणार्थ, मी ‘चतुरंग’मध्ये लिहितो, माझे नाव, फेसबुकसारख्या माध्यमामुळे अनेकांना माझा चेहेरा (भले तो तीन वर्षांपूर्वीचा असेना का!) वगैरे ठाऊक आहेत. माझ्याबद्दल काही गोष्टी अशा नक्की असणार आहेत की तुम्हाला माहिती आहेत, पण ती मते तुम्ही मला सांगितलेली नाहीत. उदाहरणार्थ, मलाच जे माहिती नाही ते मी काय सांगणार? तिसरा कप्पा अगदी माझा स्वत:चा आहे. ती माझी- ‘बंद मुठ्ठी सव्वा लाखकी’ अशी आहे. ते मी संपूर्ण तपशिलानिशी कोणालाच सांगितलेलं नाही. आणि आत्मचरित्र लिहीन तेव्हासुद्धा सांगेन की नाही हे मला निश्चितपणे सांगता येत नाही.  आणि माझ्यात असा  एक भाग आहे, जो तुम्हाला माहिती नाहीच पण मलाही त्याचा पत्ता नाही. हे  मी अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे.
माझ्या मनातल्या तिसऱ्या कप्प्यात -फक्त मला माहिती असलेल्या गोष्टींच्या कप्प्यात जितका साठा मोठा तितकं मनावर जास्त ताण असणे स्वाभाविक आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये, आपल्या चुकांचे,घोडचुकांचे वमन- कन्फेशन देण्याची एक चांगली प्रथा आहे. पण आपल्या संस्कृतीत लपवून ठेवण्याची परंपरा आहे. म्हणूनच अनेक गुरूंनी आपल्या ज्ञानाचे काही भाग आपल्या सर्वोत्तम शिष्यालासुद्धा दिलेच नाहीत. पोरगा आपल्या पुढे गेला तर पित्याची किंमत काय राहणार ही वृत्ती. त्यामुळे विमानाचे ज्ञान आपल्या पूर्वजांकडे होते असे लेख लिहून आपली संस्कृती ५००० वर्षे पुराणी होती असं अभिमानाने नुसतं सांगण्यात काय अर्थ आहे. तसे झाले नसते तर राईट बंधूंना श्रेय देण्याची वेळ आलीच नसती.
मी गेली काही वर्षे माझ्या गुप्त कप्प्यातील बऱ्याच गोष्टी निदान एका व्यक्तीशी तरी जशा होत्या तशा सांगितलेल्या आहेत. तरी साठा संपलेला नाही. पण ताण-तणाव कमी होत आहेत याचा मी अनुभव घेत आहे. आत्मशोधाच्या या प्रक्रियेमुळे माणूस मोकळा होतोच, पण त्याला ओळखणे सोपे होते. नाही तर-‘ हे काय म्हणतील कुणास ठाऊक? किंवा आता हे ऐकल्यावर ते काय करतील ते भगवंतच जाणे -अशी वाक्ये अनेकदा कानावरून जातात. आपल्याकडे पूर्वी नवऱ्याचे खरे उत्पन्न काय ते पत्नीला ठाऊक नसे. हल्ली दोघांचे उत्पन्न माहिती असते पण खर्च? तो गोपनीय असतो. असो. हे काही वेळा बोलून दाखवणे अवघड जाते. कधी लाज वाटते, कधी माझ्याबद्दल त्याला हे समजले तर? काय कहर होईल? अशी भीती वाटते. तर काही वेळा आपला प्रामाणिकपणा कमी पडतो तरी जे वास्तव आहे ते लिहिण्या-बोलण्याचे धैर्य नसते. हे करणे त्रासदायक आहे, परंतु हा टप्पा जर आपण गाठू शकलो तर शांतीचे रस्ते खुले होतात.
आपण समाजात जगताना वेगवेगळ्या भूमिका करीत असतो आणि काही वेळा ती आपली भूमिका आहे, त्या प्रसंगापुरती मर्यादित आहे हेच काहीजण विसरतात. आमच्या पाहण्यात एक ब्रिगेडियर क्ष (रिटायर्ड) आहेत. ते एका शैक्षणिक संस्थेत सरव्यवस्थापक म्हणून काम करू लागले. दोन्ही कामांच्या संस्कृती भिन्न, संस्थेत निर्णयाला विरोध होणार, वाद-विवाद होणार, राजकारण असणार हे त्यांना कधी समजलेच नाही. ते संस्थेतही ब्रिगेडियरसारखेच वागत. ‘ऑर्डर मिन्स ऑर्डर’ हा खाक्या ते सोडू शकले नाहीत. परिणाम त्यांच्याकडे राजीनामा मागण्यात आला. आपण भूमिका बदलली की पटकथा बदलते, संवाद बदलतात, दिग्दर्शकही वेगळा असतो, कार्य-संस्कृतीही वेगळी असते, हे भान नसणे ही गोष्ट आत्मपरीक्षणात महत्त्वाची असते.
प्रत्येक माणूस सातत्याने भूमिका आणि परिस्थितीनुसार बदलता असतोच. समाज व्यवहारात त्याला पर्याय नाही. पण जर स्वत:ला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या प्रत्येक भूमिकेतला मी कसा आहे, हे जाणून घ्यायला हवं.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2014 1:02 am

Web Title: learn to recognize yourself
टॅग Chaturang
Next Stories
1 वळसा वयाला : ‘मधु’र योगदानाची पंचविशी
2 सेलिब्रेशन
3 हृदयाचे गणित!
Just Now!
X