News Flash

वेगळेपणाची मानसिकता

‘वेगळेपणाची मानसिकता’ म्हणजे आपण इतरांपेक्षा कुणी तरी विशेष किंवा श्रेष्ठ असल्याची भावना होय.

(संग्रहित छायाचित्र)

अंजली जोशी

‘वेगळेपणाची मानसिकता’ म्हणजे आपण इतरांपेक्षा कुणी तरी विशेष किंवा श्रेष्ठ असल्याची भावना होय. आपल्याला इतरांनी वेगळी वागणूक दिलीच पाहिजे; किंबहुना अशी वागणूक मिळणे, हा आपला हक्क आहे, अशी आजच्या पिढीतील मुलांची मानसिकता बनली आहे, मात्र त्यांच्या पालकांनीच त्यांच्या मनात कळत-नकळत ती रुजवली आहे. पण म्हणूनच वेगळेपणाची मानसिकता हा मुलांपेक्षाही त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे या पिढीत असमाधानी वृत्ती वाढत चालली आहे.. काय परिणाम होतोय त्याचा,  नात्यावर.. समाजावर..

समीर हा आजच्या पिढीतील एक तरुण आहे. त्याची शैक्षणिक कारकीर्द उत्तम आहे. नुकताच व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका प्रथितयश कंपनीत त्याला नोकरी लागली आहे. समीरच्या या वाटचालीत त्याच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे संगोपन त्यांनी अगदी सजगतेने केले आहे. पालकत्वासंबंधीची अनेक पुस्तके त्यांनी वाचलीत किंवा तत्संबंधींच्या व्याख्यानांना हजेरी लावलीय. लहानपणापासूनच समीरसाठी जे काही वेगळे करता येईल ते सर्व काही त्यांनी केलेय. प्रसंगी स्वत:ची महत्त्वाची कामे त्यांनी समीरसाठी बाजूला सारलेली आहेत. समीरला बुद्धिबळ शिकवायचे म्हणून त्याच्या वडिलांनी मुद्दाम स्वत: ते शिकून त्याचा सराव होण्यासाठी मदत केली आहे. समीरच्या परीक्षेच्या काळात त्याला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून घरातील कुणीही टीव्ही न बघण्याची सवय लावून घेतली. सुट्टीला बाहेरगावी फिरायला जायचे असेल तरी समीरचे आई-वडील समीरच्या आवडीच्या जागी जाणे पसंत करतात.

समीरकडे इतके जाणीवपूर्वक लक्ष देऊनही समीर त्याच्या करिअरबद्दल समाधानी नाही. त्याला नोकरी मिळाली असली तरी ही नोकरी आपला ‘ड्रीम जॉब’ नाही, हे त्याला सतत डाचते आहे. कंपनीत जेव्हा वरिष्ठांनी त्याला त्याचे काम सांगितले तेव्हा तर तो फारच नाराज झाला. आपण चांगल्या कामासाठी लायक असूनही आपल्याला वरिष्ठांनी मनाप्रमाणे काम दिले नाही, आपल्याला हवा असलेला ‘क्लायंट फेसिंग रोल’ दिला नाही, असे वाटून तो नाखूश झाला आहे. केवळ कार्यालयामध्येच नाही तर घरामध्येही तो चिडचिड करत राहतो. समीरच्या वरिष्ठांना विचारले तर त्यांचे म्हणणे वेगळेच आहे. ते म्हणतात, ‘‘ही ‘मिलेनियल पिढी’च वेगळी आहे. त्यांची कुठल्या गोष्टीशी जुळवून घेण्याची तयारी नसते. त्यांना सगळे भरभर पाहिजे असते. पहिल्याच नोकरीत ‘क्लायंट फेसिंग रोल’ कसा मिळेल? समीरला तशा प्रकारचे काम आपल्याला मिळावे एवढेच वाटत नाही तर तसा तो मिळणे हा त्याला त्याचा हक्क वाटतो. हा या पिढीचाच विशेष आहे. त्यांच्यात जो ‘सेन्स ऑफ एनटायटलमेंट’ आहे, त्याने आम्हाला प्रचंड त्रास दिला आहे. हातात नोकरी असो वा नसो, छोटय़ाशा कुरबुरीवरून ते झटकन राजीनामा देतात आणि भरती-प्रशिक्षणाची आमची प्रक्रिया संपतच नाही.

नेहा आणि श्रेया यांची कथा समीरपेक्षा थोडी वेगळी आहे. त्या सख्ख्या बहिणी आहेत. नेहा आठवीत तर श्रेया सहावीत आहे. ‘आपल्याला दुसरीचे शेअर करायला लागत आहे,’ अशी भावना दोघींपैकी कुणाच्याही मनात येऊ नये म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच बिछान्यापासून ते खाण्याच्या पदार्थापर्यंत दोघींना वेगवेगळ्या वस्तू घेऊन दिल्या आहेत. असे असूनही नेहा आणि श्रेयात विस्तव जात नाही. एखादी वस्तू नेहाला आणली की, ‘नेहा मोठी आहे म्हणून तुम्ही तिच्यावरच विशेष प्रेम करता. माझ्यावर नाही,’ असे म्हणून श्रेया फुरंगटून बसते. श्रेयाला काही आणले तर, ‘लहान असल्यामुळे तुमची फक्त श्रेयावरच मर्जी आहे,’ म्हणून नेहा फुरंगटून बसते. दोन वेगळ्या वस्तू दोघींना आणल्या तरी भांडणे संपत नाही. दुसरीला आणलेली वस्तू जास्त चांगली आहे. ‘तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम करता म्हणून तुम्ही तिच्यासाठी चांगली वस्तू आणलीत,’ असे दोघी आई-वडिलांना बोलून दाखवितात. आई-वडिलांना वाटते की, पूर्वीच्या काळी भावंडे एकमेकांची काळजी घेत असत किंवा मोठे भावंडं लहानाचा सांभाळ करीत असे. काळजी तर दूर राहो, पण या दोघी एकमेकींशी स्पर्धा करीत राहतात. ‘असे का?’ हे त्यांच्या आई-वडिलांना कळत नाही.

समीर, नेहा, श्रेया यांच्या नाखुशीची कारणे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक धागा समान आहे. हे तिघेही ‘वेगळेपणाच्या मानसिकतेचे’ प्रतिनिधित्व करतात. ही मानसिकता म्हणजे आपण इतरांपेक्षा कुणी तरी विशेष किंवा श्रेष्ठ असल्याची भावना होय. या मानसिकतेमुळे आपण कुणी तरी वेगळे आहोत, एवढय़ावरच न थांबता आपण विशेष असल्यामुळे आपल्याला इतरांनी वेगळी वागणूक दिलीच पाहिजे; किंबहुना अशी वागणूक मिळणे, हा आपला हक्क आहे, अशी मुलांची मानसिक जडणघडण होत जाते. ही मानसिकता त्यांच्या पालकांनी त्यांच्या मनात कळत-नकळत रुजवली आहे. या घडणीची सुरुवात पालकांनीच लहानपणापासून त्यांना वेगळी वा विशेष वागणूक देऊन केलेली असते. तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तींपेक्षा वेगळे व विशेष आहात, हे नकळतपणे त्यांनी मुलांच्या मनात रुजवलेले असते.

अगदी लहानपणापासून पालक मुलांसाठी किती वेगवेगळ्या गोष्टी करत असतात ते पाहा. मुलांसाठी वेगळी छत्री आणली जाते, वेगळी खुर्ची आणली जाते, वेगळा बेड विकत घेतला जातो, त्यांच्या खोलीचा रंगही वेगळा निवडला जातो. मुलांसाठी पालक करत असणाऱ्या वेगळ्या गोष्टींची यादी बरीच लांबवता येईल. ही यादी केवळ वेगळ्या वस्तूंपुरतीच मर्यादित नसते, तर मुलांसाठी नोकरी सोडून त्यांचे पूर्णवेळ संगोपन करणे, स्वत:ची महत्त्वाची कामे मुलांसाठी बाजूला सारणे किंवा स्वत:च्या आवडीनिवडींना मुरड घालून मुलांच्या आवडीनिवडींशी जुळवून घेणे, अशा वैयक्तिक जीवनातील तडजोडींचाही त्यात समावेश असतो.

पालक असे का करतात, याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, समीरच्या आई-वडिलांना वाटत असते की, आपल्या लहानपणी आपल्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नव्हते. मग समीरला तरी आपण विशेष वागणूक आपण दिली पाहिजे. नेहा आणि श्रेयाचे आई-वडील पाहतात की, आजूबाजूचे अनेक पालक मुलांकडे वेगळे लक्ष पुरवत आहेत. तसे जर केले नाही तर आपण ‘पालक’ म्हणून कमी पडू असे त्यांना वाटते. आपल्याला दोन मुली असल्या तरी संगोपनात भागीदारी नको म्हणून दोघींकडेही विशेष लक्ष ते जातीने पुरवितात.

परंतु मुलांना अशी विशेष वागणूक देऊन पालक मुलांचे भले साधतात का? याचे उत्तर सामाजिक संशोधक नकारार्थी देतील. वेगळेपणाच्या मानसिकतेचा मुख्य तोटा म्हणजे समीरच्या वरिष्ठांनी वर्णन केल्याप्रमाणे या मानसिकतेची मुले इतरांशी जुळवून घेण्यात किंवा समायोजन करण्यात कमी पडतात. हे असमायोजन केवळ नोकरीपुरतेच मर्यादित नाही तर मित्र-मत्रिणी, जीवनसाथी या सर्वच आघाडय़ांवर ही मुले पुढे असमाधानी राहत जातात. कारण स्वत: इतरांशी जुळवून घेण्यापेक्षा इतर व्यक्तीच आपल्याशी जुळवून घेत असल्याची सवय त्यांना पालकांनी लावलेली असते. ‘इतरांनी माझ्या अपेक्षेप्रमाणे वागलेच पाहिजे,’ अशी मानसिकता तयार झाल्याने ते समीरप्रमाणे चिडचिड करतात किंवा ‘आपली लायकी खरे तर जास्त आहे; पण आपल्यावर अन्याय झाला आहे,’ अशा आत्मकरुणेला बळी पडतात. काही नेहा-श्रेयाप्रमाणे भांडत बसतात तर काही छोटय़ा अपेक्षाभंगामुळे कोलमडून पडतात. थोडक्यात, वैफल्य सहन करण्याची त्यांची क्षमता वाढीला लागत नाही.

वेगळेपणाच्या मानसिकेतेचा अजून एक परिणाम म्हणजे आत्मकेंद्रितता. ही मुले स्वत:मध्ये इतकी गुरफटलेली असतात, की स्वत:पेक्षा भिन्न असे काही जग आहे, याचा पत्ताच त्यांना नसतो. घरातील व्यक्ती आपल्याला सतत प्राधान्य देत असल्यामुळे एक प्रकारचा श्रेष्ठगंड त्यांच्यात निर्माण होतो. समाजऋण मान्य करण्यात हा श्रेष्ठगंड अडथळा उत्पन्न करतो. सामाजिक भानही आपसूक कमी होते. परिणामी त्यांची समाजापासूनची नाळ तुटते. आपण इतरांपेक्षा वेगळे, नव्हे श्रेष्ठ आहोत, असे वाटल्यामुळे ती इतरांशी तादात्म्य पावू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये  सहानुभवाची भावना (एम्पथी) पुरेशी विकसित होत नाही. समाजापासून तुटलेली व सामाजिक समस्यांशी देणेघेणे नसलेली अशी मुले ही सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते चिंतेची बाब तर आहेच, पण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही ते हानीकारक आहे.

पालक मुलांना देत असलेली ही वेगळेपणाची वागणूक हा मुख्यत्वे अलीकडील पिढय़ांतील पालकांचा विशेष आहे. आधीच्या पिढीतील अनेकांना लहानपणी पालकांकडून अशी वेगळी वागणूक मिळालेली नाही. जे घरी असेल ते पालक-मुलांना समान असायचे. सणासुदीचा किंवा वाढदिवसाचा अपवाद वगळता मुलांसाठी वेगळ्या वस्तू आणण्याची पद्धत नव्हती. मुलांच्या व पालकांच्या उठण्या-झोपण्यापासून ते खाण्यापिण्याच्या वेळा सारख्याच असायच्या. मुले म्हणून या वेळांत विशेष सवलत नसायची. दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रमही एकत्र बसून पाहिले जायचे. पत्त्यांसकट बुद्धिबळापर्यंत करमणुकीची साधने एकत्र बसून खेळली जायची.

हल्लीचे चित्र उलटे आहे. पालकांची झोपण्याची वेळ ही मुलांची कमाल कार्यक्षमतेची वेळ असते. मुलांचे टीव्ही/वेबसिरीजचे कार्यक्रम पालकांच्या टीव्ही कार्यक्रमांपेक्षा वेगळे असतात. ‘पबजी’सारखी त्यांच्या करमणुकीची साधने तर कित्येक पालकांच्या आकलनाबाहेरची असतात. एकत्र बसून जेवणे तर फारच दुर्मीळ झाले आहे. हे सांगण्यामागे कुठली पिढी चांगली किंवा वाईट हे ठरवणे नाही तर, मुलांच्या संगोपनाच्या पद्धतीतील दोन पिढय़ांमधील भिन्नता अधोरेखित करणे हा उद्देश आहे. थोडक्यात, वेगळेपणाची मानसिकता हा मुलांपेक्षाही पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे.

भौतिक सुबत्ता, उंचावलेले राहणीमान, वस्तूंची मुबलकता, अनेक पर्यायांची उपलब्धता अशी कारणे पालकांच्या या मानसिकतेमागे असावीत का याचा विचार सामाजिक संशोधक करीत आहेत. अर्थात ही कारणे वेगवेगळी असली तरी पालकांनी या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे, हे मात्र नक्की. तसे करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही. किंबहुना मुलांसाठी वेगळे किंवा विशेष काही न करणे हाच त्यावरचा उपाय आहे.

वर उल्लेख केलेल्या समीर व नेहा-श्रेयाच्या पालकांनी जर त्यांना सर्वसामान्य वागणूक दिली व त्यांना घरातील अनेक व्यक्तींप्रमाणे एक असे वागवले, तर या मानसिकतेतून ते बाहेर येऊ शकतील. प्रत्येक व्यक्ती जशी काही बाबतीत इतरांपेक्षा भिन्न असते, अन्योन्य असते, तसे समीर व नेहा-श्रेयाही इतरांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत भिन्न असतील. परंतु तसे असणे म्हणजे विशेष किंवा श्रेष्ठ असणे नव्हे, तर भिन्नता हीसुद्धा सर्वसामान्य असण्याचाच भाग आहे, हे त्यांच्या मनात रुजेल व अधिक सुसंस्कृत समाजाकडे त्यांची वाटचाल होऊ शकेल.

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत)

anjaleejoshi@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 1:55 am

Web Title: mindset of separation dissatisfaction attitude abn 97
Next Stories
1 अवघे पाऊणशे वयमान : रंगभूमीची निरलस सेवा
2 आरोग्यम् धनसंपदा : आरोग्यपूर्ण उपवासासाठी..
3 तळ ढवळताना : आऊटसायडर
Just Now!
X