राकेश सारंग

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे परदेशात प्रयोग होणार होते पण त्यावर शिवसेनेने बंदी आणली होती. बाळासाहेब ठाकरे  यांची मुंबईत ‘घाशीराम’विरुद्ध एक सभा होती. त्या सभेत जाऊन ‘घाशीराम’ची बाजू मांडायची कोणाची हिम्मत नव्हती. विजय तेंडुलकरांनी पप्पांना विनंती केली. त्या सभेत पप्पांनी एकटय़ाने ‘घाशीराम’ची बाजू मांडली. ते जेव्हा उठून म्हणाले, की ‘मला घाशीरामच्या बाजूने बोलायचंय’ तेव्हा उपस्थित शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावले, पण बाळासाहेबांनी त्यांना थांबवले. ‘‘तो कलाकार आहे. त्याला बोलायचा हक्क आहे.’’ त्यांनी पप्पांना बोलायला दिलं. पप्पांनी आपली आणि ‘घाशीराम’ची बाजू मांडली आणि सभेतून बाहेर पडले.. परिणामस्वरूप ‘घाशीराम’चे प्रयोग परदेशात पार पडले. ते ऐकल्यावर ‘भीती’ हा शब्द माझ्या शब्दकोशातून गायब झाला जो अजूनही गायबच आहे..  माझा बाप वाघ होता. त्यांना कळपात रहायला कधीच आवडलं नाही. ते या माणसांच्या जंगलात वाघासारखे राहिले, वाघासारखे जगले..’’ सांगताहेत राकेश सारंग यांच्या आठवणीतले त्यांचे पप्पा कमलाकर सारंग यांच्याविषयी..

‘सारंग हे आपलं खरं आडनाव नाही. आपले पूर्वज शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरदार. ‘सारंग’ ही आपल्याला महाराजांनी दिलेली पदवी आहे.’ हे पप्पा अभिमानानं सांगायचे. तसं बघायला गेलं तर मालवणमधला दशावतार बघायला जाणं सोडल्यास संपूर्ण सारंग घराण्याचा नाटकाशी काहीही संबंध नव्हता. पप्पांचाही नव्हता. बालपणी ते मलखांबपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धातून नाटकात काम करायला सुरवात केली आणि त्यांच्या नाटय़ प्रवासाला सुरवात झाली..

मम्मीची आणि त्यांची भेट पण यादरम्यानचीच. पप्पा सिद्धार्थ कॉलेजची एकांकिका बसवत होते. त्यात मम्मीपण होती. त्यांना ती खूप आवडत होती आणि हे तिलापण कळलं होतं, पण पप्पा तो विषयच काढत नव्हते. शेवटी त्यांनी एक कविता पाठवून तिला प्रपोज केलं. कवीचं नाव ‘सौमीत्र’. पप्पा त्यानंतर त्या टोपण नावानं कविता लिहीतच राहिले. दुर्दैवाची गोष्ट अशी, की त्या कवितांची पानं कधी संग्रहित झाली नाहीत. स्पर्धातून बाहेर पडल्यावर पप्पा ‘रंगायन’मध्ये गेले. पण फार काळ त्यांचं मन तिथे रमलं नाही. मी एकदा त्यांना त्याबद्दल विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले, की ‘जिथे एकटय़ा-दुकटय़ाची मक्तेदारी चालते तिथे फार काळ घालवू नये. कारण ते मोठे होतात आणि तुम्ही फक्त सावली म्हणून ओळखले जाता.’ नंतर पप्पा साहित्य-संघाची नाटकं करायचे. मला त्यातलं आठवणारं नाटक म्हणजे ‘पती गेले गं काठेवाडी’. साहित्य संघाच्या पिटात बसून मी ते नाटक वीस-एक वेळा तरी बघितलं असेल. त्यावेळी मी गिरगावात माझ्या आजीकडे म्हणजे मम्मीच्या आईकडे रहात होतो. मम्मी-पप्पा वांद्रे येथे ‘कलानगर’ मध्ये रहायचे. साहित्य संघात नाटक म्हणजे माझा त्यांना भेटण्याचा दिवस.

त्याकाळी पप्पा ‘बर्माशेल’ म्हणजे आताच्या ‘भारत पेट्रोलियम’मध्ये कामाला होते आणि मम्मी ‘टाटा’ मध्ये. नाटकावर घर चालावं असं त्याकाळी शक्य नव्हतं आणि त्यात पप्पांवर दोन घरं चालवायची जवाबदारी होती. एका बहिणीचं लग्न झालं होतं आणि तीन जण शिल्लक होते. पप्पांच्या बरोबरचे विजया मेहता, अरिवद देशपांडे, नंदकुमार रावते ही मंडळी फार पुढे निघून गेली होती. पण म्हणतात ना, की  प्रत्येकाचा दिवस येतो तसा पप्पांचाही आला.

विजय तेंडुलकरांनी एक नाटक पप्पांना वाचायला दिलं आणि पप्पा म्हणाले, ‘‘मी करतो हे नाटक.’’ ते नाटक म्हणजे ‘सखाराम बाइंडर’. या नाटकानं इतिहास घडवला आणि कमलाकर सारंगलाही घडवलं. हे नाटक जणू वाद घेऊनच जन्माला आलं होतं. तेंडुलकरांनी हे नाटक पप्पांना दिलंय हे कळल्यावर बऱ्याच दिग्दर्शकांनी तेंडुलकरांना तुम्ही चुकलात हे सांगायला सुरवात केली. पप्पांना ‘बाईंडर’साठी निर्माताही मिळत नव्हता कारण काही हितचिंतकांनी हे नाटक कसं लफडय़ाचं आहे हे पसरवायला सुरवात केली होती. शेवटी पांडुरंग धुरत (आताचे प्रसिद्ध निर्माते उदय धुरतांचे काका) आणि जयसिंग चव्हाण तयार झाले. नाटकातले कलाकार मिळाले, फक्त ‘चंपा’ आणि ‘सखाराम’ मिळाला नव्हता. तेंडुलकरांनी मम्मीने ‘चंपा’ करावी हा प्रस्ताव ठेवला. पण सखाराम कोण हा प्रश्न होताच. पप्पा डॉ. श्रीराम लागूंकडे गेले. (त्यावेळी ते पप्पांना काय म्हणाले ते पप्पांनी त्यांच्या ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकात सविस्तर लिहिलंय) डॉ. लागूंनी नकार दिल्यावर पप्पांना निळू फुले सापडले ते लोकनाटय़ातून. (निळू फुलेंच्या मृत्यूनंतर

डॉ. लागूंनी लिहिलेल्या एका लेखात, ‘निळू फुलेला सखाराम म्हणून घे, हे मी कमलाकरला सांगितलं’, असे जे विधान केले होते ते खरे नाही. असो) ‘बाईंडर’ उभं राहिलं. पहिले तीन-चार प्रयोग व्यवस्थित झाले आणि अचानक काही लोकांनी नाटकावर अश्लीलतेचा शिक्का मारला. वाद न्यायालयात गेला. आठ महिने पप्पा नाटकासाठी लढले. त्यात त्यांची नोकरी गेली. घरातला प नी प न्यायालयीन लढाईत कामी आली. घरावर दगडफेक झाली. कधी दारावर काहीबाही लिहिलेलं तर कधी गाडीचे टायर पंचर करून ठेवलेले. खूप त्रास सहन केला त्यांनी. त्याकाळी पप्पांच्या मागे उभे राहिले ते अरुण काकडे, श्रीकांत लागू, कुमुद मेहता सारखे मोजके लोक आणि मम्मी. ‘लालनने मला ताकद दिली’ हे ते आवर्जून सांगायचे. आजही ‘बाइंडरचे दिवस’ वाचताना अंगावर काटा येतो आणि ताकदही मिळते. पुढे न्यायालयाने नाटकाला परवानगी दिली आणि ‘बाइंडर’चे प्रयोग पुन्हा जोरात सुरु झाले.

त्यानंतर त्यांनी केलेलं नाटक म्हणजे ‘जंगली कबुतर’. लेखक वसू भगत यांचं ते पहिलंच नाटक. एका अभिनेत्रीने टाकून दिलेली तिची मुलगी तिच्याकडे परत येते जी आता वेश्या आहे. पुन्हा एक प्रक्षोभक नाटक. पण यावेळी त्यांना न्यायालयात खेचायला कोणी धजलं नाही कारण विरोधकांना त्यांची ताकद कळली होती. हे ही नाटक खूप चाललं. उषा नाईक या नाटकातून पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर आली. तिलाही पप्पांनी लोकनाटय़ातूनच हेरलं होतं.

त्या दरम्यान त्यांची ओळख झाली ती गुजराती निर्माते लालूभाई शहांशी. त्यांनी पप्पांना ‘जंगली कबुतर’ गुजरातीत करायची ऑफर दिली. पप्पांनी ते ही आव्हान स्वीकारलं. ‘कोठानी कबुतरी’ ने गुजराती रंगभूमीवर धुमाकूळ घातला. एक बंडखोर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. नंतर तेंडुलकरांनी ‘बेबी’ हे नाटक पप्पांकडे वाचलं. आणखी एक प्रक्षोभक नाटक. सिनेमातल्या एक्स्ट्रा म्हणून काम करणाऱ्या मुलीची गोष्ट. निळू फुले, अरिवद देशपांडे, मोहन गोखले आणि मम्मी अशी तगडी कास्ट. हे नाटकही गुजरातीत झालं.

यादरम्यान पप्पा आणि जयसिंग चव्हाण यांच्यामध्ये अनबन व्हायला सुरवात झाली होती. सगळी नाटकं तुफान चालली होती पण घरात तेवढा पसा येत नव्हता. पप्पा तसे खूप विश्वास टाकणारे, पण पसा कुठेतरी मुरतोय हे त्यांच्या लक्षात यायला लागला होतं आणि वेगळं व्हायचं ठरलं. नाटकांचे हक्क पप्पांकडेच होते पण कंपनी नव्हती. यावेळी लालूभाई शहा त्यांच्या मदतीला आले. त्यांची ‘अभिषेक’ नावाची एक कंपनी होती. त्यांनी ती पप्पांना चालवायला दिली. पप्पांनी दादा गोडकरांना व्यवस्थापक म्हणून नेमले. दादा त्यानंतर पप्पांच्या शेवटच्या नाटकापर्यंत त्यांच्या सोबत होते. त्यानंतर पप्पांनी दत्ता केशव यांचं ‘धंदेवाईक’ हे नाटक केलं.

यादरम्यान ‘हिट अँड हॉट’ नाटकांची लाट आली. त्यातल्या एका नाटकाच्या जाहिरातीत ‘कमलाकर सारंगच्या आशीर्वादाने सादर करीत आहोत’ अशी ओळ होती. पप्पा त्या दिवशी मनसोक्त हसले. पण मनात त्यांनी काहीतरी ठरवलं असणार कारण त्यानंतर पप्पांनी तेंडुलकरांचं ‘सूर्यास्त’, ‘कमला’ श्री. ना. पेंडसेंचं ‘रथचक्र’, जयवंत दळवींचं ‘लग्न’, खानोलकरांचं ‘देवाचे पाय’ आदी नाटकं केली. संस्था अर्थात ‘अभिषेक’.

‘देवाचे पाय’च्या वेळची एक गोष्ट. त्या नाटकात संजीवनी बिडकर नावाची अभिनेत्री काम करत होती. त्याआधी ती तमाशात होती. नाटकाच्या प्रयोगादरम्यान तिचा नवरा दारू पिऊन यायचा. तिचं प्रयोगाचं मानधन खेचून घेऊन जायचा. पप्पांनी एक दिवस तिला सरळ विचारलं, ‘‘सहन करत रहाणार आहेस का सोडायचंय त्याला?’’ ती म्हणाली, ‘‘सोडायचंय पण रहाणार कुठे?’’ पप्पांनी ताबडतोब तिचा तो प्रश्नही मिटवला. मम्मीच्या माहेरी, तिची व्यवस्था केली. पण तिचा नवरा आता पप्पांना त्रास द्यायला लागला. रात्री अपरात्री घरी येऊन धमक्या देणे सुरु झाले. पप्पांनी त्याला बराच समजवला पण त्याला ते समजावणे म्हणजे घाबरणे वाटले आणि तिथेच तो चुकला. त्याला बिचाऱ्याला काय माहित की कमलाकर सारंग, भायखाळ्यात लहानाचा मोठा झालेला आहे आणि खादीच्या कुडत्याआतील शरीर एका मलखांबपटूचं आहे. एके दिवशी समजवण्याची जागा कुदवण्याने घेतली आणि परत त्याने कधी तोंड दाखवलं नाही.

त्यानतर पप्पांनी आणखी एक संस्था काढली. ‘कलारंग.’ मम्मी पप्पांच्या नावातील पहिला शब्द आणि सारंग मधला रंग. या संस्थेतर्फे त्यांनी जरा वेगळ्या धाटणीची नाटकं केली. शफाअत खानचे ‘पोलिसनामा’ सुरेश खरे यांचं ‘आरोप’ सागर सरहद्दींचं स्वत: अनुवादित केलेलं ‘पारध’, रत्नाकर मतकरी यांचं ‘खोल खोल पाणी’ आणि काही बालनाटय़ंही केली. सतत काहीतरी वेगळं करत रहायचं या ध्यासापायी त्यांनी आत्माराम भेंडेंचं ‘आगन्तुक’ हे विनोदी नाटक आणि मधुकर तोरडमलांचं ‘मगरमिठी’ हे गव्यवसायिक नाटकही तेवढय़ाच ताकदीनं केलं.

एकदा ते काही दिवसांसाठी मालवणला जाऊन येतो म्हणून गेले आणि परत आले ते एक नाटक लिहून, ‘सहज जिंकी मना’. आईवडिलांच्या घटस्फोटानं मनावर आघात झालेल्या लहान मुलाची कथा. त्यांच्या पिंडाच्या अगदी विरुद्ध जाणारं नाटक. हे त्यांनी पहिल्यांदा मला आणि मम्मीला वाचून दाखवलं. आम्ही पण चकित झालो होतो. ‘‘तुझा बाप वरून कठोर वाटला तरी आतून किती इमोशनल आहे हे कळलं का?’’ मम्मीचा मला खोचक प्रश्न. पण मला माहित होतं ते. पप्पा कुठलीच भावना चेहऱ्यावर आणत नसत, पण त्यांच्या मनात, खोलवर काय चाललंय हे कळायचं मला.

पप्पांना नवीन नवीन कलाकारांबरोबर काम करायला आवडायचं. निळू फुले, उषा नाईक, संजीवनी, उर्मिला मातोंडकर, जयदेव हट्टंगडी, जयराम हर्डीकर, विवेक लागू, प्रिया तेंडुलकर असे बरेच कलाकार आहेत ज्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं पदार्पण पप्पांच्या नाटकांतून झालय.

पप्पा तसे अस्सल मालवणी. रोजच्या जेवणात मासे मस्ट. त्यात मम्मी सुग्रण. दोघांनाही पाहुणचाराची आवड. आठवडय़ाला दोन-तीन दिवस तरी जेवायला पाहुणे असायचेच. तशी पप्पांची बऱ्याच राजकारण्यांशी पण दांडगी ओळख होती. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवारसाहेबांपर्यंत सगळे मित्र. पण त्यांनी त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. त्यावेळी अरुण मेहता महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ते घरी आले की त्यांना म्हणायचे, ‘‘तुझ्याकडे यायला, भेटायला भीती वाटत नाही कारण तू काही मागत नाहीस.’’ (त्यावेळी सरकारी कोटय़ातून कलाकारांना १० टक्केवाली घरं मिळायची आणि त्यासाठी भलेभले राजकारण्यांचे तळवे चाटत असत. असो)

त्यांना मुळात रस वेगळ्याच गोष्टीत होता. एकदा आमचे जुने पडदे काढून नवे लावण्यात आले. मम्मी ते पडदे फेकून देणार होती. पण पप्पांनी त्या कापडातून गणपती बनवला. आम्ही वांद्रे येथून माहीमला स्वत:च्या घरात रहायला आलो तेव्हा घराचं इंटेरिअर त्यांनी स्वत: केले. हॉल तसा छोटा होता म्हणून फोल्डिंग डायिनग टेबल. त्या भिंतीला एक मोठी रिकामी चौकट उभारली  जिथून मम्मीला स्वयंपाकघरातून थेट टेबलावर जेवण ठेवता यायचं. माझ्यासाठी भिंतीतून बाहेर येणारा बेड. त्यातून बाहेर येणारं अभ्यासाचं टेबल. म्हणजे दिवसभर जो हॉल असायचा तो रात्री माझी बेडरूम बनायचा. भिंतींना छान रंगसंगती. नाटकांच्या बठकीसाठी हॉलच्या एका बाजूला लाकडी प्लॅटफॉर्म. त्याच प्लॅटफॉर्मवर बसून तेंडुलकर, दळवी, पेंडसे, खरे, मतकरी अशा अनेक मात्तबर नाटककारांच्या नाटकांचे वाचन झाले होते. मी आजही स्वत:ला भाग्यवान समजतो कारण मी त्या सगळयांना ‘याची देही याचि डोळा’ बघितलंय आणि ‘याचि काना’ ऐकलंय. ‘नाटकाचं वाचन, मग त्यावर चर्चा आणि मग मम्मीच्या हातचं जेवण’ हा जणू नियमच होता त्या घराचा.

‘सखाराम’नंतर बंदीच्या वाटेवर गेलेलं तेंडुकरांचं नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. त्या नाटकाचे परदेशात प्रयोग होणार होते आणि त्यावर शिवसेनेने बंदी आणली होती. पण ‘घाशीराम’वाले प्रयोग करणार यावर ठाम होते. पण त्याकाळी परदेशात जायचं तर मुंबईहूनच जावं लागायचं आणि ‘हे लोक मुंबईत आले तर त्यांना सोडू नका’ असा आदेशही निघाला होता. बाळासाहेबांची शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहात ‘घाशीराम’विरुद्ध एक सभा होती. त्या सभेत जाऊन ‘घाशीराम’ची बाजू मांडायची कोणाची हिम्मत नव्हती. विजय तेंडुलकरांनी पप्पांना विनंती केली. मग काय, ते तडक निघाले. मम्मी टेन्शनमध्ये. माझ्यासाठी वेगळीच अडचण. बाळासाहेब आमचं दैवत. त्यात माझा बाप त्यांच्याशीच वाद घालायला गेलेला. तिथे काय झालं हे त्यांनी तेंव्हा सांगितलं नाही पण ‘घाशीराम’चे प्रयोग परदेशात पार पडले. त्या सभेला मोहन गोखले आणि मंगेश कुलकर्णी लपून गेले होते. त्यांनी नंतर मला सांगितले की त्या सभेत पप्पांनी एकटय़ाने ‘घाशीराम’च्या बाजू मांडली. ते जेव्हा उठून म्हणाले, की ‘मला घाशीरामच्या बाजूने बोलायचंय’ तेव्हा उपस्थित शिवसैनिक त्यांच्या अंगावर आले, पण बाळासाहेबांनी त्यांना थांबवले. ‘‘तो कलाकार आहे. त्याला बोलायचा हक्क आहे.’’ म्हणून त्यांनी पप्पांना बोलायला दिलं. पप्पांनी आपली आणि ‘घाशीराम’च्या बाजू मांडली आणि सभेतून बाहेर पडले. ते ऐकल्यावर ‘भीती’ हा शब्द माझ्या शब्दकोशातून गायब झाला जो अजूनही गायबच आहे. आजही मंगेश भेटला आणि पप्पांचा विषय निघाला की तो, त्या दिवशीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा करतो और अपनी भी छाती ५६ इंच की हो जाती है.

पण असा हा माणूस खूप मनानं खूप प्रेमळ होता हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मला पप्पांनी मारलं किंवा माझ्यावर ओरडले हे कधी झालंच नाही. समोर बसवायचे आणि कमीत कमी शब्दात समजावून सांगायचे हे त्यांचं वैशिष्टय़. मी काय करायचं हे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही पण ‘जे काय करशील ते प्रामाणिकपणे कर’ हे मात्र माझ्याकडून गिरवून घेतलं आणि त्यांचीच शपथ घेऊन सांगतो आजवर, कोणत्याही बाबतीत किंवा कामात, मी अप्रामाणिकपणा केलेला नाही कारण ते मला अजूनही वरून बघताहेत हे मला माहितीय.

आणीबाणीच्या वेळेला ते परत एका वादात अडकले. ‘किस्सा खुरस्सीका’ या हिंदी नाटकावरच्या चित्रपटावर काँग्रेस सरकारनं बंदी आणली होती. पप्पांना हे कळलं आणि त्यांनी ते नाटक करायचं ठरवलं. एका गुजराती निर्मात्याकडे या नाटकांचे हक्क होते. तो हक्क द्यायला तयार झाला, पण ‘नाटक गुजरातीत करायचं’ हा हट्ट पण धरला. पप्पा तयार झाले. नाटकाचे पाच प्रयोग झाले आणि आणीबाणी लागू झाली. तो निर्माता इतका घाबरला की भारतातला गाशा गुंडाळून तो परदेशात पळाला. पप्पांच्या पोलीस मित्रांनी त्यांना सांगितलं, ‘‘तुलापण अटक होणार. अंडरग्राउंड हो.’’ पण सारंग आणि पळणार? शक्यच नव्हतं.

चुकीच्या गोष्टींविरुद्ध भांडताना परिणामांची त्यांनी कधी काळजी केली नाही. पप्पा जेव्हा ‘निर्माता संघा’चे अध्यक्ष होते तेव्हा सरकारनं प्रभादेवीचं ‘रवींद्र नाटय़ मंदिर’ पाडायचा घाट घातला होता. पप्पांनी ते होऊ दिलं नाही. मराठी माणूस तेव्हा मुंबईबाहेर जायला सुरवात झाली होती. त्यात नाटय़गृह पाडलं तर परत उभं करायला ४ ते ५ वर्ष जाणार आणि प्रेक्षकांची तिथे येण्याची सवय मोडणार हे ते जाणत होते. आज त्यांचं म्हणणं खरं होतंय. पुढे जाऊन रवींद्र पाडण्यात आलं, नव्यानं उभारलं गेलं पण आज तिथे प्रेक्षक फिरकत नाहीयत.

त्यांची नाटकं जशी काळाच्या पलीकडली होती तसे विचारही. ‘पाहिजे जातीचे’ हे  तेंडुलकरांचं नाटक अरिवद देशपांडे प्रायोगिक रंगभूमीवर करणार होते. पप्पांना ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर चालेल असे वाटत होते. त्यांनी अरिवद काकांशी बोलून ते नाटक व्यावसायिकवर आणलं. ‘शिवाजी मंदिर’ मध्ये त्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकात पंचवीस एक जण होते. मुख्य भूमिकेत विहंग नायक, सुषमा तेंडुलकर आणि नाना पाटेकर. आजही नाना मी बरोबर असताना समोरच्याला सांगतो, ‘‘याच्या बापाने मला पहिलं मानधन दिलं.’’

पप्पांचा आणखी एक किस्सा सांगतो. आमच्या घरात पारु आणि राणी या दोन पॉमेरिअन कुत्र्या होत्या. पप्पांच्या त्या जीव की प्राण. पारू गरोदर होती तेव्हा पप्पा नाटक संपले की क्षणाचाही विलंब न करता घरी यायचे. एकदा ते घरी आले तर पारू त्यांच्या कुशीत शिरली आणि तिने पहिल्या पिल्लाला जन्म दिला. पप्पांनी भराभर ऑर्डर दिल्या. गॅसवर पाणी उकळायला ठेव. त्यात कातर टाक. स्वच्छ टॉवेल आण. पारूने एका पाठोपाठ एक पाच पिल्लांना जन्म दिला. त्यांची नाळ कापण्यापासून त्यांना कोमट पाण्याने पुसून काढण्यापर्यंत सगळं पप्पांनीच केलं. पारू शांतपणे त्यांना हे करताना बघत होती. तिला खात्री होती की तिची पिल्लं त्या माणसाकडे सुखरूप आहेत.

पप्पांनी पुढे जाऊन मालिकाही केल्या. ते क्षेत्र त्यांच्यासाठी नवं होतं पण त्यांनी ते आव्हानही सराईतपणे झेललं. ‘झोपी गेलेला जागा झाला’ ‘रथचक्र’ आणि शेवटची ‘आनंदी गोपाळ’. त्यांना चित्रपटही करायचा होता, पण ते स्वप्न मात्र पूर्ण झालं नाही.

यादरम्यान त्यांना पार्किन्सन आजारानं गाठलं होतं. ते मुंबई सोडून पुण्याला शिफ्ट झाले. तिथेही थांबले नाहीत. आजारपणातही तिथे दळवींचं ‘लग्न’ नाटक बसवलं. एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते. एवढय़ा कामानंतरही त्यांना शासनाचा एकही पुरस्कार मिळाला नाही. याने हेच सिद्ध होतं, की पुरस्कार मिळत नाहीत, मागावे लागतात आणि ज्याच्याकडे देण्याची कुवत असते तो मागत नसतो.

जाता जाता एकच सांगतो, माझा बाप वाघ होता. त्यांना कळपात रहायला कधीच आवडलं नाही. ते या माणसांच्या जंगलात वाघासारखे राहिले, वाघासारखे जगले आणि शेवटच्या दुर्धर आजारालाही वाघासारखे सामोरी गेले. आय लव यू पा..

आमच्या घरात पारू आणि राणी या दोन पॉमेरिअन कुत्र्या होत्या. पप्पांच्या त्या जीव की प्राण. पारू गरोदर होती तेव्हा पप्पा नाटक संपले की क्षणाचाही विलंब न करता घरी यायचे. एकदा ते घरी आले तर पारू त्यांच्या कुशीत शिरली आणि तिने पहिल्या पिल्लाला जन्म दिला. पप्पांनी भराभर ऑर्डर दिल्या. गॅसवर पाणी उकळायला ठेव. त्यात कातर टाक. स्वच्छ टॉवेल आण. पारूने एका पाठोपाठ एक पाच पिल्लांना जन्म दिला. त्यांची नाळ कापण्यापासून त्यांना कोमट पाण्याने पुसून काढण्यापर्यंत सगळं पप्पांनीच केलं. पारू शांतपणे त्यांना हे करताना बघत होती. तिला खात्री होती की तिची पिल्लं त्या माणसाकडे सुखरूप आहेत.

rakeshsarang@gmail.com

chaturang@expressindia.com